हम दो हमारे दो’ पासून ‘डबल इन्कम नो किड्स’ पर्यंत झालेल्या वाटचालीतून आता गेल्या 30 ते 35 वर्षांपासून एकलकोंडा समाज निर्माण होत चाललाय. माणूस हा एकटा जन्मला आणि एकटाच मरणार हे शाश्वत सत्य करोनानी फार प्रखरपणे दाखवून दिलं. पण फार पूर्वीपासूनच हळूहळू आपल्या समाजातली माणसं एकटी पडू लागली आहेत. वाढत्या आयुर्मानाबरोबर नव्वदीतल्या आई-वडिलांना खांदा द्यायला साठीतली मुलं उपस्थित आहेत पण या साठीतल्या पिढीला मात्र त्यांचेच साठीतले मित्र व भावंडे खांदे देणार आहेत. कारण त्यांची पुढची पिढी ऑनलाइन भरपूर पैसे पाठवू शकते परदेशातून पण ऑनलाइन खांदे देऊ शकत नाही.
आनंद, मायेचा ओलावा, कणव, भूतदया इत्यादी अनेक भावना मेसेजेसच्या इमोजींमध्ये बंदिस्त झाल्या असल्याने त्यांची अंतस्थ जाणीव आपण आजकाल विसरूनच गेलोय. गप्पागोष्टी करत भरवले जाणारे चिमणीचे घास आता मोबाइल स्क्रीनकडे टक लावून पोटात शिरले तर नक्कीच स्क्रीन डी-सडिक्शनची गरज भासणारच या पिढीला.
स्वतः तयार करून दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्राची जागा केकचे चित्र व टाळ्यांच्या इमोजीने घेतली आहे. धावणाऱ्या लोकांना बसण्यासाठी उसंत नाही. हत्या, खून पूर्वीही होत असत पण माणुसकीला काळिमा फासत आज-काल शंभर तुकडे करत विल्हेवाट लावण्याची प्रकरणे वाढीला लागलेत. किती राग, द्वेष कोंडून पडलाय या समाजात. पेशन्सचं तर दुकानच बंद झालंय. भौतिक तांत्रिक प्रगत होत जाणाऱ्या समाजाचा मानसिक विकास मात्र खुंटत चाललाय.
‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणताना आपलं कुटुंब कुठे आहे? लहान मुलांचा प्रज्ञावान ग्रहणक्षम मेंदू हा टीप कागदासारखा असतो त्याला जे पुढे द्याल ते आत्मसात करणारा, पण टीप कागदाला जशी समज नसते काय टिपायचं- काय नाही तसंच मुलांचं आहे. आपली ही जबाबदारी आहे आपण त्यांना काय काय देतोय. तेवढे जागरूक पालक आपण आहोत का? आपल्याकडे त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का?
मानसिक व शारीरिक त्रास होत असताना ममतेचा स्पर्श औषधाचे काम करत असतो.आपल्या निराश भावना, उद्विग्नता ऐकून घेणारा माणूस समोर प्रत्यक्षात असणं ही निकोप समाजाची गरज आहे .त्या ऐवजी ‘वी आर वि थ यू’ चा मेसेज किती उपयोगाचा? आत्महत्या, डिप्रेशन इत्यादी मनोविकार यातूनच बळावत चाललेत.
पूर्वीपेक्षा आज-काल याचं प्रमाण 43% इतकं प्रचंड झालंय. पैसा महत्त्वाचा आहे पण फक्त पैसाच महत्त्वाचा नाही तर माणूसही महत्त्वाचा आहे हे पुढच्या पिढीत जर आपण बिंबवू शकलो तर नक्कीच आशेला जागा आहे.आत्मिक आनंद भौतिक चंगळवादामधे शोधणे हे सोनेरी उन्हाचे कवडसे मुठीत बंद करू पाहण्यासारखे आहे. सेकंदात उत्तर देणारी अलेक्सा आणि मिनिटांमध्ये येणारा पिझ्झा मग कसा आपल्याला वाट पाहण्याची, स्वतः शोधण्याची शिकवण मिळणार. पट्कन आणि सहज मिळणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित होणं हा मनुष्याच्या स्वभाव आहे. बरं “कष्टेविण फळ नाही” म्हणायला हल्ली रामदास स्वामीही जन्म घेत नाहीत. मनोविकार तज्ज्ञ तर त्यांचं काम चोख पार पाडतीलच पण आपणच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाचे समुपदेशक बनू शकणार नाही का? एकमेकांसाठी! निरोगी शरीरातल्या निरोगी मनासाठी!
The post रिलेशनशीप : हरवलेले आनंदाचे झाड appeared first on Dainik Prabhat.