[[{“value”:”
Pune News : या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. जे झोपण्यापूर्वी आणि झोपून उठल्यावर बिछाना व्यवस्थित करतात आणि दुसरे म्हणजे जे बिछाना व्यवस्थित न करता आहे तशा स्थितीत झोपतात. जेव्हा मुले सैनिकी स्कूलमध्ये किंवा स्काऊट मध्ये दाखल होतात. तेव्हा निवासी शाळा किंवा शिबिरांमध्ये त्यांना सगळ्यात पहिली गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे स्वतःचा बिछाना व्यवस्थित अंथरण्याची आणि हा शिस्तीचा गुण मग त्या व्यक्तीला आयुष्यभर उपयुक्त ठरतो.
जेव्हा झोपण्याची वेळ होते तेव्हा स्वाभाविकपणे माणूस थकलेला असतो आणि कधी एकदा पाठ टेकतो असे त्याला झालेले असते त्यामुळे बिछाना असेल त्या परिस्थितीत तो त्यावर झोपतो. मात्र बिछाना व्यवस्थित न करण्यासाठीची ही एक पळवाट असते. कारण बिछाना व्यवस्थित करण्यासाठी केवळ 30 ते 60 सेकंदाचा वेळ लागत असतो.
जेव्हा तुम्ही बिछाना व्यवस्थित करून त्यावर झोपता, तेव्हा त्याचे आश्चर्यकारक फायदे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होतात. ज्या व्यक्तींना कायम बिछाना व्यवस्थित करून मग झोपण्याची सवय असते, अशा व्यक्ती नेहमीच त्यांची उद्दिष्टे आणि हेतू हे योग्य त्या ऑर्डरने ठेवत असतात. अशा व्यक्ती विचारी, जबाबदार ,संतुलित आणि आयुष्यात यशस्वी असतात.
रात्री झोपताना ज्याप्रमाणे बिछाना व्यवस्थित करणे अपेक्षित असते. तसेच सकाळी उठल्यावर देखील पहिले काम म्हणजे बिछाना व्यवस्थित करणे हेच असले पाहिजे. त्या उलट ज्या व्यक्ती बिछाना तसाच टाकून दिवसभराची कामे आटोपण्यासाठी घाईघाईने पळत सुटतात. त्या व्यक्तींमध्ये आपल्याला कुठल्याही कामासाठी पळवाट शोधण्याची वृत्ती दिसून येते.
अशा व्यक्ती दिवसभराच्या अनेक कामात पळवाट शोधतात. त्यामुळे अंतिमतः दिवसाच्या अखेरीस त्यांच्याकडून अनेक कामे झालेली नसतात. तुम्ही जेव्हा सकाळी उठल्यावर बिछाना व्यवस्थित करण्याचे एक छोटेसे काम करता, त्यातून तुमचा दिवस कसा जाणार आहे याची दिशा ठरत असते.
2014 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना नौदलातील एडमिरल विल्यम मॅकरेव्हन यांनी देखील बिछाना व्यवस्थित करण्याच्या सवयीचा उल्लेख केला होता. त्यांनी तर मेक युवर बेड – लिटिल थिंग्स दॅट कॅन चेंज युवर लाईफ अँड मे बी द वर्ल्ड या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे.
त्यावेळी त्यांनी भाषणात म्हटले की तुम्ही जर का दिवसाच्या सुरुवातीचे पहिले काम म्हणजेच बिछाना नीट करण्याचे काम केले तर दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या मनात स्वतःविषयी अभिमानाची भावना निर्माण होते आणि मग नंतर समोर येणारी प्रत्येक कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळत जाते.
ते म्हणतात, दिवसाच्या शेवटी तुमच्या लक्षात येते, की तुम्ही सकाळी एक छोटेसे काम पूर्ण केल्यामुळे दिवसभरात तुमच्याकडून अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण झालेली आहेत. त्यातून तुमच्या लक्षात येते, की कुठलेही छोटेसे काम देखील अतिशय महत्त्वाचे असते.
जेव्हा तुम्हाला सकाळी बिछाना व्यवस्थित करण्याची सवय लागते तेव्हा आपोआपच स्वतःची खोली नीटनेटकी व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळते आणि तुम्ही आपोआपच खोलीची स्वच्छता ठेवू शकता.
सगळ्यात महत्त्वाचे ठरते ते जेव्हा तुम्ही संध्याकाळी थकून तुमच्या खोलीत येता तेव्हा नीटनेटकी व्यवस्थित खोली बघून तुमच्या मनावरील ताण थकवा निघून जातो. एका अर्थाने तुमचे व्यक्तिमत्व कसे असावे, यासाठीचे बीजारोपण यातून होत असते.
म्हणजेच जेव्हा तुम्हाला बिछाना व्यवस्थित करण्याची छोटीशी सवय लागते. तेव्हा पुढे जाऊन तुम्ही रूम व्यवस्थित ठेवता आणि मग आपोआपच तुमचे मन आणि शरीर देखील अनेक चांगल्या सवयी आत्मसात करू लागते. जशी रुम तसेच तुमचे मन काम करत राहते.
द पावर ऑफ हॅबिट या पुस्तकाचे लेखक चार्ल्स दुहीग यांच्या मते रोज सकाळी तुम्ही जेव्हा बिछाना व्यवस्थित करून ठेवता, तेव्हा त्यातून दिवसभर चांगले आणि योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढीस लागते. कारण जेव्हा तुम्ही बिछाना नीट करून ठेवता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये जी किंचितशी ऊर्जा तयार होते जी तुम्हाला दिवसभरात अनेक चांगले निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
अर्थातच या छोट्याशा सवयीमुळे तुमच्या मूड सुधारण्यास मदत होते आणि मनावरील ताण कमी होण्यासही मदत होते. द हॅपिनेस प्रोजेक्ट या पुस्तकाचे लेखक ग्रेशन रुबीन यांच्या मते रोज सकाळी बिछाना व्यवस्थित करण्याची सवय ही कृती अतिशय प्रभावी ठरते आणि त्यातून माणूस आनंदी होण्यास मोठा हातभार लागतो. नॅशनल स्लिप फाउंडेशनच्या बेडरूम सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 70 टक्के अमेरिकी नागरिक सकाळी उठल्यावर स्वतःचा बिछाना व्यवस्थित करून ठेवतात.
The post रात्री झोपण्यापूर्वी बिछाना व्यवस्थित करणे का महत्त्वाचे ठरते? तुमच्या आयुष्यावर काय परिमाण घडतो, पाहा…. appeared first on Dainik Prabhat.
“}]]