वरुण ग्रामोपाध्ये
असाध्य रोगाने जर्जर जीवन जगणाऱ्या पाळीव प्राण्यांना “मेडिकल डेथ’ अर्थात “युथनेशियाचा’ पर्याय सर्वत्रच कायदेशीर मानला गेला आहे. मात्र, हाच कायदा असाध्य व्याधींनी त्रासलेल्या आणि कोणत्याही उपचारांविना आपले कष्टप्रद जीवन, अखेरच्या श्वासापर्यंत रखडत नेणाऱ्या रुग्णांना दिलासा देत नाही. “इच्छामरण’ अथवा “मेडिकली टर्मिनेशन ऑफ लाईफ’ इतक्या सोप्या शब्दांत हा विषय संपवता येणार नसला, तरी आजच्या काळात माणसालाही “युथनेशिया’ची गरज भासू शकते, यावर कोणीच विचार करताना दिसत नाही. इच्छामरण आणि त्याच्याशी निगडीत विविध पदरांचा वेध येथे कायद्याचे युवा अभ्यासक वरुण ग्रामोपाध्ये यांनी घेतला आहे. वाचकांनीही या विषयावर आपले मतप्रदर्शन अवश्य करावे, ही विनंती.
कोमलच्या तेराव्या वाढदिवसाला तिच्या आईने एक छानसे कुत्र्याचे पिल्लु आणुन दिले. कोमलने आनंदाने हे गिफ्ट स्विकारले. कोमलने पिल्लाचे नाव सोनू ठेवायचे ठरवले. सोनू अत्यंत खेळकर आणी खोडकर होता. जरा कोणाचे लक्ष नाही असे दिसले की, कोमलच्या खुर्चीवर जाउन बसणे, आणि कोमलला घाबरवणे हा त्याचा आवडता उद्योग. घरातले कोणीही बाहेर जायचे म्हणाले की, सोनू लगेच तयार. शिवाय कोमलच्या मित्रमैत्रिणींना घरात येऊ द्यायचे की नाही, हेही सोनूच ठरवायचा. कोमल मोठी झाली तरी सोनूच्या दिनक्रमात तिची खोडी काढणे अत्यंत महत्वाचे कार्य होते.
एक दिवस कोमलने कॉलेज हुन आल्यावर पाहिले, सोनु कारपेट वर शांत झोपला होता. “सोनु दादा, आज खोडी मी काढणार,’ असे म्हणून ती सोनूच्या जवळ गेली, तेव्हा तिला विचित्र उग्र वास आला. जोरजोरात हलवूनदेखिल सोनू उठत नसल्याने तिने सोनूच्या डॉक्टरला फोन केला. डॉक्टरांनी ऍम्ब्युलन्स पाठवली आणि तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचायला सांगितले. डॉक्टरांनी कोमलच्या आईलाही बोलवून घेतले.
सोनूला “मेलानोमा’ या दुर्मिळ आणि असामान्य प्रतिचा कर्करोग झाला होता. डॉक्टरांनी कोमलला थोडासा धीर दिला आणि म्हणाले “कोमल, आता तू मोठी झालेली आहेस, व तुला सत्य समजणे आवश्यक आहे. सोनू या आजारातून बरा होणे अशक्य आहे. आपल्या तपासात त्याच्या अंगावर सापडलेले सूजेचे ठिपके हेच सांगतात की, आता खूपच उशिर झाला आहे. आपण केमोथेरपी देऊन फार फार तर एखादं वर्ष त्याला जिवंत ठेवू. पण त्याचा मृत्यु अटळ आहे.’
कोमलच्या पायाखालची जमिन सरकली होती. ती तिथेच खर्चीवर शून्यात हरवून गेली. तिचा या सर्व गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता. मग आईनेच पुढाकार घेतला आणि विचारले, “आम्हाला आमच्या सोनूला केमोथेरपीच्या वेदना द्यायच्या नाहीत. आमच्याकडे काय पर्याय आहे?’ या प्रश्नावर डॉक्टरांनी टेबलाच्या कप्प्यातुन एक फाइल काढली. कोमल व तिच्या आईपुढे ठेवली, आणि खोल श्वास घेत म्हणाले, “युथनेशिया.’
कोमलला आता सगळेच स्पष्ट झाले होते, पण आईला हे युथनेशिया प्रकरण काय आहे काही समजेना. तिने डॉक्टरांना हि शंका विचारली, तेव्हा डॉक्टर म्हणाले, “युथनेशिया’चा शब्दश: अर्थ सुखाचे मरण. ज्या वेळेला आपल्या पाळिव प्राणिमित्राला आजार किंवा इजा या प्रतीची होते की, त्या पाळीव प्राणीमित्राच्या उर्वरित आयुष्यात वेदनाच राहतात, तेव्हा युथनेशिया- अर्थात एक सुखाचे मरण हा उपाय अनेक प्राण्याचे कुटुंबिय आज निवडतात.’
आईच्या मनात अजुनही अनेक प्रश्न होते. चेहेऱ्यावरील गोंधळ, आणि हतबलतेची झलक पाहुन आता कोमलने विचारायला सुरुवात केली…
“म्हणजे मी त्याला मारायचे का? मला त्याला वेदना द्यायच्या नाहीत, पण म्हणून मी त्याला मारुन माझी जबाबदारी झटकायची का? माझ्या सोनुला समजले की, मी त्याला मारण्याचा विचार करत आहे, तर त्याला काय वाटेल? केमोथेरपीने वेदना होतील, मग आपण आपल्या हाताने मारल्यावर होणार नाहीत काय?’
डॉक्टरांनी कोमलचे सर्व प्रश्न ऐकुन घेतले आणि कोमलला आधार देत म्हणाले, “आपण कोणत्याही युथनेशियामध्ये कोणत्याही प्राण्याला हाताने मारत नाही, बाळा. युथनेशिया हा कायमच इंट्राव्हेनस इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या ऍनेस्थेटिक ड्रगचा डोसेज़ हळुहळू वाढवूनच दिला जातो. आपल्या सोनूला आपण शांत झोप येऊन बेशुद्धीकडे नेणार, आणि त्याच्या सर्व संवेदना, त्याच्या सर्व जाणिवा नाहीश्या झाल्याची खात्री करुन मगच आपण डोसेज़ हळुहळू वाढवत प्राणघातक प्रमाणापर्यंत (लिदल लेव्हल) नेणार. सोनूला त्या इंजेक्शनची सुई सोडून कोणतीही वेदना होणार नाही.’
केबिनबाहेर बसुन कोमल आणी आई विचार करत होते. सगळे अगदी सुन्न झालेले. तेवढ्यात कोमलचे वडिलही आले. त्यांनी कोमलकडून सगळे जाणुन घेतले, आणि एक क्षणापुरते हतबलतेच्या वेढ्यात ओढले गेले. पण सावरल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारला,”आमच्या सोनूला हे जग सोडून जाताना आणखी वेदना होणार नाहीत ना?’
डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या सोनुचा “वेदनाशुन्य मृत्यु’ होईल असे वचन दिले.
हृदयावर दगड ठेवुन कोमल व तिच्या कुटुंबियांनी सोनुसाठी युथनेशियाचा निर्णय घेतला. युथनेशियाच्या प्रक्रियेला जेमतेम 45 मिनिटे लागली. मग कोमलच्या वडिलांनी डोळ्यांतील अश्रू आवरत अगदी मानाने दफन केले. काही दिवस कोणासही हे दु:ख विसरता येत नव्हते, पण लवकरच सावरल्यावर त्यांना सोनूला वेदनांच्या आयुष्यात न ढकलल्याबद्दल खुप हायसे वाटले. सोनूला या युथनेशिया संकल्पनेमुळे अनेक वेदना न सोसता मरण आले. खऱ्या अर्थी त्याच्या मालकांकडून भले झाले.
पण समजा, सोनू हा कुत्रा नसुन माणुस असता तर? तो कोमलचा पाळीव प्राणी नसुन तिचा भाऊच असता तर? मिळाले असते का त्याला असे सुखाचे इच्छा मरण. आज युथनेशिया पाळीव प्राण्यांसाठी पूर्णपणे कायदेशीर आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून माणसांसाठी युथनेशिया भारत व इतर अनेक देशात अद्याप बेकायदेशीर आहे.
मग कोठेही माणसासाठी युथनेशिया कायदेशीर नाहीच का? तर नेदरलॅंड्स, बेल्जियम, कोलंबिया आणि लक्झेंबर्ग युथनेशियास कायदेशीररित्या परवानगी देतात. वर्ष 2016 च्या फेब्रुवारी पासून कॅनडाने युथनेशियाला कायदेशीर करण्याचे जाहीर केले आहे.
युथनेशिया आजही अनेक देशात बेकायदेशीर का आहे?
युथनेशिया आज अनेक देशात बेकायदेशीर असण्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे की, जगभरातील अनेक धार्मिक संस्था असे मानतात की, जीव हा देवानेच दिलेला आहे, व तो घेण्याचा अधिकारही देवालाच आहे. या धार्मिक संस्था प्राण्यांच्या युथनेशियाबद्दल मात्र असे काहीच बोलत नाहित.
युथनेशिया आजही बेकायदेशीर असण्याचे दुसरे कारण हे, की इच्छामृत्यूच्या विरोधकांचा या गोष्टिवर विश्वास नाही की कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन इच्छामृत्यूचा गैरवापर रोखता येईल.
मग युथनेशियाच्या बाजुने बोलणाऱ्याचे मत काय आहे?
युथनेशियाच्या बाजूने असणारे लोक विचार करतात की, योग्य नियमन तयार करून युथनेशिया नियंत्रित होऊ शकत नाही, असे कोणतेही कारण नाही. परंतु त्यांना भीती ही वाटते की, जे लोकांवर वाईट हेतूने युथनेशियाची अंमलबजावणी करू इच्छितात अशा लोकांवर फक्त नियम नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. तथापि, लोक घाबरतात की, जे काही नियम ठेवले आहेत, ते गैरवापर थांबवणार नाहीत. विशेषत: संवेदनशील व्यक्तींना, आणखी काही आठवडे जगण्याऐवजी मृत्यूचा निर्णय घेण्यावर दबाव आणला जाऊ शकतो.
कायद्यात हत्येवर बंदी आहे, यामुळे लोकांनी एकामेकांची हत्या करणे पूर्णपणे बंद केले आहे असे नाही. म्हणून कायदेशिर मृत्युसंबंधी काहीच तरतुदी न करणे
दूरदृष्टीचा अभाव दर्शवते. युथनेशियाबाबत कोणतेही नियम नसण्यापेक्षा काही नियम असणे केव्हाही चांगलेच. शिवाय, युथनेशिया नियंत्रित करण्यासाठी नियम तयार केल्याने नियमच नसण्याच्या परिस्थितीपेक्षा कोणतेही वाईट परिणाम होतील, असे दिसत नाही.
युक्तिवाद असा आहे की सुखाचे मरण कायमच चालूच राहिल, जरी ते बेकायदेशीर असले तरी, त्यास कायदेशीर ठरविणे आणि दुरुपयोग कमी करण्यासाठी नियम तयार करणे अधिक चांगले.
– वरुण ग्रामोपाध्ये, सातारा