महिला त्यांच्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतात. त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी एकापेक्षा एक महागडी उत्पादने वापरण्यास अजिबात संकोच करत नाहीत. घरगुती उपायांचा अवलंब करण्यातही त्या मागे नसतात. पण रनिष्काळजीपणामुळे बहुतेक महिलांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येने त्रस्त केल्याचे दिसते. त्यामुळे चेहऱ्यासोबतच पायांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहुयात.
खोबरेल तेल
टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी खोबरेल तेल खूप प्रभावी आहे. रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर एक चमचा खोबरेल तेल लावून चांगली मसाज करा. पावसाळ्याचा हंगाम आहे, अशा परिस्थितीत खोबरेल तेल थोडे गरम करून लावू शकता. मसाज केल्यानंतर पायात मोजे घालून झोपा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुवा. असे सलग 10 दिवस केल्याने टाचांच्या भेगा दूर होऊ शकतील.
केळीची पेस्ट
केळीच्या साह्याने तुम्ही भेगा पडलेल्या टाचांनाही बरे करू शकता. एक पिकलेले केळं घ्या आणि ते चांगले मॅश करा. ते तुमच्या पायांना, भेगा पडलेल्या टाचांवर लावा. 15 मिनिटे असेच राहू द्या, त्यानंतर पाय धुवा. भेगा पडलेल्या टाचांच्या त्रासातून सुटण्यासाठी ही एक सोपी कृती आहे.
कडुलिंब आणि हळद
कडुलिंब आणि हळदीच्या मदतीने भेगा पडलेल्या टाचांना बरे करता येते. कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे टाचांच्या भेगा पडण्याची समस्या दूर होते. काही कडुलिंबाची पाने घेऊन पेस्ट बनवा. त्यात हळद पूड चांगली मिसळा. हे मिश्रण एका बॉक्समध्ये ठेवा आणि दररोज टाचांवर लावा. काही दिवसांत तुम्हाला फरक दिसेल.
गुलाब पाणी, लिंबू आणि ग्लिसरीन
एका मोठ्या भांड्यात किंवा बादलीत कोमट पाणी घ्या, त्यात एक चमचा मीठ, 2 चमचे ग्लिसरीन, 8 ते 10 थेंब लिंबाचा रस आणि 2 चमचे गुलाबजल घालून चांगले मिसळा. या पाण्यात 15-20 मिनिटे पाय व्यवस्थित भिजवा. यानंतर पायाच्या स्क्रबरने टाच स्क्रब करा आणि पाण्याने धुवा. स्वच्छ टॉवेलने पाय पुसून घेऊन पाय वाळवा. यानंतर एक चमचा ग्लिसरीन, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करा. भेगा पडलेल्या टाचांवर लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी पाय धुवा.