यशस्वी वैवाहिक जीवनासाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा
April 23rd, 7:33amApril 23rd, 9:03am
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
पौर्णिमाला घेऊन तिचे आई-वडील स्वतःहून भेटायला आले. आल्यावर पौर्णिमाच्या आईने भेटीला येण्यामागील कारण सांगितले. “”आमच्या पौर्णिमाचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं. लग्नानंतर दोघं खूप आनंदात होते. छान फिरून आले. नंतर दोघं कामावरसुद्धा जायला लागले. पहिले 6-7 महिने दोघं खूप आनंदात होते, पण नंतर मात्र घरात खटके उडायला लागले. नवरा-बायकोमध्ये खूप भांडणं व्हायला लागली. छोट्या छोट्या कारणांवरूनसुद्धा मोठे-मोठे वाद व्हायला लागले म्हणून रागाच्या भरात ती ते घर सोडून आमच्याकडे महिनाभर येऊन राहिली आम्ही तिला आणि जावयाला सुद्धा बोलावून घेऊन दोघांना खूप समजावून सांगितलं.
दोघांनी परत भांडणार नाही असं सांगितलं आणि पौर्णिमा आनंदाने पुन्हा सासरी गेली. काहीच दिवस बरे गेले. पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू झाले. भांडणं वाढायला लागली आणि पौर्णिमा पुन्हा घरी आली. यावेळी ती अगदी गप्प गप्प आणि शांत झाली आहे. आमच्याशीसुद्धा मोकळेपणाने बोलत नाही. काय झालंय सांगत नाही. नुसती उदास बसून असते कधीकधी कामावर सुद्धा जात नाही. सारखी रडत राहते. तिच्या सासरी फोन केला तर ते लोकही काही बोलायला भेटायला तयार नाहीत. नुसती रडते नाहीतर उदास बसून राहते.
आम्ही तिच्या सासरी तिच्या सासू, सासरे, नवरा सगळ्यांना भेटून देखील आलो. ते म्हणतात तिला घरात काही काम करायला आवडत नाही. नुसती आळशीपणा करते. तिला नीट काम करता येत नाहीत. काही सांगायला गेलं तर तिला राग येतो. पण माझी पौर्णिमा अशी नाहीये. उलट नोकरीपेक्षासुद्धा तिला घरकामाची जास्त आवड आहे. नवऱ्याने प्रोत्साहन दिले, पाठिंबा दिला म्हणून उत्साहाने तिने नोकरी करायला सुरुवात केली, पण त्यालाही सासुबाईंनी विरोध केला. आता ती तिकडे जायचेच नाही असे म्हणते. काय करावे ते आम्हाला कळेना म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो.
काकुंचं बोलणं झाल्यावर पौर्णिमाला खूपच रडू आलं. काकुंनी तिला सावरलं. पौर्णिमा खूपच अस्वस्थ झाल्याने या सत्रात तिच्याशी फारसे काही बोलता आले नाही. त्यामुळे हे सत्र थांबवून पौर्णिमाला शांत करून पुढील सत्र निश्चित केले व पौर्णिमाला बाहेर बसवून तिच्या आई-वडिलांकडून तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ज्याचा उपयोग पुढील सत्रात करता आला. पुढील सत्रासाठी पौर्णिमाला एकटीला बोलावण्यात आले. या सत्राला पौर्णिमा आली तेव्हा तणावाखाली असल्याचे जाणवत होते. त्यामुळे प्रथम विश्वास संपादनाच्या दृष्टीने संवाद साधून त्यानंतर मुख्य विषयावर चर्चा केली.
“मी घरात खूप आणि आवडीने काम करते. कामावरून आल्यावर कितीही दमले असले तरी घरच्या कामांचा मला कधीही कंटाळा येत नाही. मी सगळ्यांच्या आवडी निवडीसुद्धा जपते. सगळं घर स्वच्छ ठेवणं हे तर माझं अगदी आवडीचंच काम आहे. रोज कामावर जायच्या आधी मी लवकर उठून सगळी कामं करते, पण मी केलेलं कोणतंच काम माझ्या सासुबाईंना अजिबात आवडतच नाही. प्रत्येक कामात त्या सतत चुका काढतात. माझ्या नवऱ्याचे कान भरवतात. त्यामुळे तोही माझ्यावर चिडतो. मग आमच्यात भांडणं होतात. मी सांगते ते त्याला पटत नाही. माझ्यापेक्षा त्याचा आईवरच जास्त विश्वास आहे. आई सांगेल तसंच मी वागलं पाहिजे हा त्याचा हट्ट असतो. त्यामुळे आमच्यात भांडणं होतात.
मला नाही जायचं परत तिथे.” तिच्या या बोलण्यात तिने अनेक उदाहरणे व संदर्भ दिले. त्यानंतर पुन्हा पौर्णिमाच्या आई-वडिलांना बोलावून या समस्येची कल्पना देऊन तिच्या नवऱ्याला समुपदेशनासाठी बोलावले. तिचा नवरा भेटीसाठी आल्यावर त्याला विश्वासात घेऊन पौर्णिमाची बाजू तिला मोकळेपणाने त्याच्यासमोर मांडण्यास सांगितले. त्याप्रमाणे पौर्णिमानेही आपली बाजू मोकळेपणाने मांडली. या एक दोन सत्रात पौर्णिमाची नक्की समस्या, येणाऱ्या अडचणी त्याच्या लक्षात आल्या व त्याने पौर्णिमाला पुन्हा असा त्रास होणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे पौर्णिमाला आश्वासन दिले.
घरातले हे वातावरण बदलण्यास, पौर्णिमाच्या सासूने प्रतिसाद देण्यास अर्थातच तसा बराचसा वेळ लागला. पण पौर्णिमाच्या नवऱ्याने तिला उत्तम साथ दिल्याने त्यांच्यातले वाद, भांडणे पूर्ण थांबली. त्यांचे नाते पुन्हा एकदा खुलून आले व घरातले वातावरणही हळूहळू बदलत गेले. त्यामुळे पौर्णिमा खूपच आनंदली. असं तिचे आई-वडील नुकतेच भेटून सांगून गेले.
(केसमधील नाव बदलले आहे.)
– मानसी चांदोरीकर