
म्युकर मायकोसिसनंतर पोस्ट कोविड रुग्णांपुढे नवे संकट
आता मणक्यातही बुरशीचा धोका
October 14th, 9:30amOctober 14th, 9:30am
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
पुणे – काही करोनामुक्त नागरिकांना म्युकरमायकोसिसनंतर आता मणक्यात बुरशी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. असा संसर्ग झालेले चार रुग्ण आढळल्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग यांनी सांगितले.
करोना झाल्यानंतर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झालेल्या, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन लावण्यात आलेल्या रुग्णांना या बुरशीचा सामना करावा लागला आहे. यामध्ये मधुमेह आदी सहव्याधी असलेल्या रुग्णांना याचा सामना करावा लागत आहे. नाकात निर्माण झालेली ही बुरशी जबड्यात आणि मेंदूपर्यंत पसरल्याने अनेकांचा मृत्यूही झाला आहे. यामध्ये केवळ काळीच नव्हे तर पिवळी आणि पांढरी बुरशीही आढळून आली होती.
मध्यंतरी फुफ्फुसात ही बुरशी आढळली होती. मात्र, आता थेट मणक्यात ही बुरशी दिसल्याने चिंता वाढली आहे. करोनानंतर आरोग्य समस्या घेऊन आलेल्या रुग्णांमध्ये सौम्य ताप, तीव्र पाठदुखी अशी लक्षणे होती. त्यांच्यावर उपचार केले असता कोणताच गुण आला नाही. त्यामुळे त्यांच्या मणक्याचा “एमआरआय’ केला असता मणक्यामध्ये एकप्रकारच्या बुरशीची वाढ झाल्याचे दिसून आले. हा प्रकार दुर्मिळ असून, यावर उपचार करणे कठीण असल्याचे मत डॉ. प्रयाग यांनी व्यक्त केले आहे. ही बुरशी मणक्याच्या पोकळीत वाढत असल्याने, शस्त्रक्रिया आणि उपचार करणे अवघड असल्याचे ते म्हणाले.