[[{“value”:”
न्यूयॉर्क: मेंदूशी संबंधित आजार, मग तो ट्यूमर असो वा अल्झायमर, त्याचे नाव काढताच डोळ्यांसमोर मोठी शस्त्रक्रिया आणि त्यातील धोके उभे राहतात. मात्र, आता हे चित्र कायमचे बदलण्याची चिन्हे असून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ देबलिना सरकार यांनी ‘सर्कुलेट्रॉनिक्स’ नावाचे एक क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे मेंदूची कोणतीही चिरफाड न करता, केवळ एका इंजेक्शनद्वारे गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.
आतापर्यंत मेंदूच्या उपचारांसाठी इलेक्ट्रोड्स किंवा उपकरणे बसवण्यासाठी मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागत असे. मात्र, सर्कुलेट्रॉनिक्समध्ये तांदळाच्या दाण्याच्या अब्जाव्या भागाएवढ्या सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक चिप्सचा वापर केला जातो. या चिप्स थेट इंजेक्शनद्वारे रुग्णाच्या शरीरात सोडल्या जातात आणि त्या रक्ताभिसरण प्रक्रियेतून संपूर्ण शरीरात फिरतात. रक्ताच्या प्रवाहासोबत प्रवास करत असताना, या चिप्स स्वतःहून मेंदूतील अशा भागापर्यंत पोहोचून तिथे स्थिरावतात जिथले न्यूरॉन्स कमकुवत किंवा निकामी झाले आहेत.
या प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या चिप्सना कवटीच्या वरून ‘इन्फ्रारेड लेझर’च्या मदतीने सक्रिय केले जाते. लेझरचा स्पर्श होताच या चिप्स मेंदूमध्ये अत्यंत अचूक इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवतात, ज्यामुळे खराब झालेले न्यूरॉन्स पुन्हा कार्यरत होण्यास मदत होते. या संपूर्ण प्रक्रियेत आजूबाजूच्या निरोगी ऊतींना कोणताही धक्का लागत नाही. हे तंत्रज्ञान अल्झायमर, पार्किन्सन, ब्रेन ट्यूमर आणि दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक वेदनांवर अत्यंत प्रभावी ठरू शकते. विशेषतः शस्त्रक्रिया सहन न होणाऱ्या वृद्ध रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान एक मोठे वरदान ठरणार आहे.
या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या देबलिना सरकार या मूळच्या कोलकाता येथील असून त्यांनी आयआयटी धनबाद येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून नॅनोइलेक्ट्रॉनिक्समध्ये पीएचडी मिळवल्यानंतर, सध्या त्या एमआयटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील ही शोधमोहीम भविष्यात मेंदूच्या आजारांवरील उपचार अधिक सोपे, सुरक्षित आणि वेदनामुक्त करेल, अशी आशा जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
The post मेंदूच्या शस्त्रक्रियेची भीती संपली! आता केवळ एका इंजेक्शनने होणार ट्यूमरवर उपचार; भारतीय शास्त्रज्ञाचा चमत्कार appeared first on Dainik Prabhat.
“}]]
