मेंदूत ट्युमर (गाठ) कशी होते आणि त्याचे वेळेवर निदान करण्याची आणि तातडीने बहुआयामी उपचार करण्याची गरज याविषयी इथे माहिती घ्यायचा प्रयत्न करुया…
मेंदू हा प्रमुख अवयव आहे, जो स्मरणशक्ती, वाचा, जाणीव, विचार, हालचाली आणि जिवंत राहण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. ट्युमर ही संज्ञा सामान्यपणे मेंदूसारख्या जिवंत पेशीचा पाया असलेल्या पेशींच्या अनियंत्रित गुणाकारातून झालेल्या असंबद्ध वाढीसाठी वापरली जाते. कर्करोगामध्ये या असंबद्ध पेशींची वाढ इतकी अनियमित असते की, त्या जवळपासच्या सामान्य संरचनेला धोका पोहोचवतात व कित्येकदा आजाराच्या उगमापासून दूर असलेल्या ठिकाणापर्यंत पसरतात.
पसरणारी कर्करोगक्षम गाठ घातक समजली जाते. तर न पसरणारा ट्युमर हा सौम्य समजला जातो. ब्रेन ट्युमर जीवाला घातक असतो, पण सुदैवाने ते दुर्मीळ असतात व प्रत्येक ट्युमर हा कर्करोगक्षम नसतो. मेंदू आणि पाठीच्या कण्यातून तयार होणारे हे ट्युमर प्रायमरी म्हणून ओळखले जातात. फुप्फुसासारख्या दूरवरच्या अवयवापासून मेंदूपर्यंत आलेला ट्युमर सेकंडरी किंवा मेटास्टॅटिक समजला जातो.
अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की, ब्रेन ट्युमर हा 15 वर्षांच्या खाली आणि 60 वर्षांपासून पुढे दिसून येतो. 15 ते 60 वर्ष या सर्वात उत्पादनक्षम असलेल्या कालावधीत मेंदूत ट्युमर आढळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी नोंदवण्यात आलेल्या केसेसच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 55 टक्के जण 15 ते 60 वर्ष वयोगटातील होते. तर 10 टक्के 15 वर्षांखालील होते.
या वयोगटांत ब्रेन ट्युमर होण्याची कारणे अद्याप स्पष्ट नाहीत. मात्र, काही कौटुंबिक आणि आनुवंशिक घटकांमुळे एखाद्या व्यक्तीस ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता जास्त असते. रेडिएशन थेरपी ही मेंदूचा कर्करोग होण्यामागचे प्रमुख कारण समजले जाते. अमेरिका आणि युरोपमध्ये मोबाइल फोनचा वापर आणि मेंदूचा कर्करोग यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात आले आहे. मात्र, त्यात अद्याप काही निष्पन्न झालेले नाही.
ब्रेन ट्युमर आहे का?
ब्रेन ट्युमर असल्यास डोकेदुखी, उलट्या, दृष्टी धूसर होणे, वागण्यात बदल होणे, फिट्स येणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, हात / पाय कमकुवत होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. सामान्यपणे अशी लक्षणे डोक्यातील वाढत्या दाबामुळे किंवा मेंदूच्या एका भागात त्रास असण्याने किंवा ट्युमरमुळे त्याचे कार्य बिघडण्यामुळे दिसून येतात. मात्र, काही केसेसमध्ये कोणतीही लक्षणे मोठया प्रमाणात दिसून येत नाहीत. मेंदूचा एमआरआय किंवा सीटी स्कॅनच्या मदतीने त्याचे निदान करता येते. दुर्दैवाने ब्रेन ट्युमर होऊ शकत असल्याचा अंदाज लावता येत नाही. मात्र, त्याचे वेळेवर निदान झाल्यास दीर्घकाळाकरिता ट्युमरला प्रतिबंध करता येऊ शकतो.
ब्रेन ट्युमर उपचाराअंती परिणाम?
ब्रेन ट्युमरचे उपचार विविध घटकांवर अवलंबून असतात. त्यामध्ये वय, ट्युमरचे स्वरूप (सौम्य/घातक), त्याचे ठिकाण यांचा समावेश असतो. उपचारांच्या पर्यायांमध्ये बारकाईने निरीक्षण, एका पाठोपाठ एक एमआरआय करणे, बायोप्सी, शस्त्रक्रियेने ट्युमर काढणे, रेडिओ सर्जरी, रेडिओपॅथी, किमोथेरपी इत्यादींचा समावेश होतो. या सर्व पर्यायांसाठी न्यरोसर्जरी, रेडिएशन आँकोलॉजी, मेडिकल आँकोलॉजी, नेचरोपॅथी, न्यूरिहॅबिलिटेशन, मानसोपचार इत्यादींची गरज असते. रेडिओथेरपी अतिशय नेमकी, शस्त्रक्रियेची गरज नसलेली आणि दर्जेदार आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी आहे.
मेंदूच्या कर्करोगावर कायमस्वरूपी उपाय
मेंदूत गुठळ्या झाल्या आणि त्यावर शस्त्रक्रिया केली तरीही कालांतराने विषाणू पुन्हा आक्रमण करतात आणि गाठी तयार होतात. अशा गाठींवर कायमस्वरूपी उपाय शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. अचानक उद्भवणारी डोकेदुखी, अशक्तपणा, बधिरपणा, लिहिण्यात अडथळा येणं, आकडी यांसारख्या समस्या ज्या व्यक्तीला जाणवतात त्यांना मेंदूचा कर्करोग असल्याचं डॉक्टरांकडून कळतं. ही मेंदूच्या कर्करोगाची सर्वसामान्य लक्षणं आहेत. मेंदूच्या कर्करोगाचं त्वरित निदान झालं नाही तर मृत्यूही होऊ शकतो.
अशा या कर्करोगाचं वाढतं प्रमाण बघता हॉर्वर्ड स्कूलमधील संशोधकांनी स्टेमसेलच्या (स्कंधकोशिका) मदतीने मेंदूचा कर्करोग बरा करण्याची पद्धती शोधून काढली आहे. आपल्या मेंदूतील ज्या भागात कर्करोग झाला आहे त्या भागातला कर्करोग पूर्णपणे काढून त्यात स्टेमसेलचं रोपण केल जाईल. या स्टेमसेलमुळे कर्करोगाच्या पेशी या सेलमुळे नष्ट करता येणार आहेत. विशेष म्हणजे ही प्रक्रिया केल्यावर फक्त कर्करोगाच्याच पेशी नष्ट पावतात, मेंदूतील इतर पेशींवर याचा कोणताही परिणाम होत नाही.
स्टेमसेलच्या साहाय्याने कर्करोगाला मारणारं विष बाहेर टाकलं जातं. या प्रकियेमुळे कर्करोगाला आळा बसतो. यासाठी संशोधकांनी जनुकीय अभियांत्रिकीचा उपयोग केला.
गेली कित्येक वर्षे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हॉर्वर्ड स्टेमसेल इन्स्टिटटूटमधील संशोधक स्टेमसेलचा उपयोग कसा करता येईल याचा शोध लावत होते. एका उंदरावर ही प्रक्रिया प्रथम केली आणि त्यात संशोधकांना यश मिळाल्यानंतर त्यांनी याचा खुलासा केला. ज्यांना हा रोग बळावतो त्यांना या नवीन शोधाचा नक्कीच फायदा होईल असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
असं असलं तरी प्रत्येकाने हा रोग बळावू नये याची काळजी घेतली पाहिजे. सरकारनेसुद्धा या रोगाचं गांभीर्य समजून व्यसन करणाऱ्यांवर दंड आकारण्याचा नियम केला. सरकारने कितीही नियमावली किंवा दंड आकारला तरी व्यसनाधीन असलेला माणूस व्यसनापासून दूर जात नाही.
परिणामी, कर्करोगाचा सामना करावा लागतो. व्यसनांमुळे रक्ताचा प्रवाहीपणा कमी होतो व रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या हृदय, मूत्रपिंड, मेंदू इत्यादींच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतात. सरकारच्या या प्रयत्नाला व्यसनाधीन व्यक्तीने सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरं जायला हवं.
नवी उपचार पद्धती
कर्करोगाचे प्रमाण जगभरात वाढत आहे. या दुर्धर आजारावर जगभरात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. हा आजार शरीराच्या कोणत्याही अवयवाला होतो. यातील सर्वात घातक प्रकार म्हणजे मेंदूचा कर्करोग. मेंदू हा संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा अवयव आहे. त्यामुळे मेंदूला कर्करोग झाल्यास संपूर्ण शरीरातील विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कर्करोगाविरोधात लढणारी नवीन उपचार पद्धती विकसित केली आहे. शरीरातील प्रतिकार शक्ती अधिक सक्षम करून कर्करोगाच्या विरोधात त्याचा वापर करण्याची नवी उपचार पद्धती शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.
ग्लिओब्लास्टोमा हा सर्वाधिक घातक ब्रेन
ट्यूमरच्या (मेंदूतील गाठ) प्रकारांपैकी एक आजार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपीचा वापर केल्यानंतरही रुग्णाचा जीव वाचत नाही. मात्र, कर्करोग पहिल्या टप्प्यात असल्यास त्याच्यावर यशस्वी उपचार करता येतात, हे प्राण्यांवर केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले. मात्र, कर्करोग अधिक वाढल्यास त्याच्यावर उपचार करणे कठीण बनते. मेंदूच्या कर्करोगावर उपचार करताना सर्वात मोठे आव्हान असते टी पेशींचे. कारण या पेशी मेंदूत पसरलेल्या असतात. या पेशी व्यक्तीची प्रतिकार शक्ती नाहीशी करतात.
झुरिक विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल इम्युनॉलॉजीतील बुरखर्द बेकर्स यांनी नवीन औषध आणि उपचार पद्धती तयार केली आहे. या उपचार पद्धतीमध्ये शरीराची स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढवली जाते व त्यानंतर रोगप्रतिकारक्षम प्रणाली ब्रेन ट्युमरच्या पेशी ओळखते व त्या मारून टाकू लागते. महत्त्वाचे म्हणजे या कर्करोगाच्या विकसित झालेल्या स्थितीतही हे औषध प्रभावी ठरू शकते.
या औषधातील इंटरल्युकिन-12 हा घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. ज्यावेळी टयुमरमध्ये इंटरल्युकिन-12 सोडले जाते त्यावेळी मेंदूतील रोगप्रतिकार करणाऱ्या पेशींची ताकद वाढते आणि त्या ट्युमरवर हल्ला करतात आणि त्याला निष्प्रभ करतात. आजाराच्या पहिल्या टप्प्यात या प्रक्रियेचे चांगले परिणाम दिसून आल्यावर शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेचा वापर दुसऱ्या म्हणजे अधिक मोठ्या झालेल्या ट्युमरवर केला. या टप्प्यातील टयुमर असलेल्या प्राण्यांचे आयुष्य तीन आठवड्यांपेक्षाही कमी होते. या स्थितीमधील उपचार म्हणजे खूपच उशिरा केलेले आणि त्यातून यशाची हमी नसलेले उपचार समजले जातात.
या स्थितीत आम्ही त्या प्राण्याच्या मेंदूत अतिशय मोठ्या झालेल्या ट्युमरमध्ये इंटरल्युकिन-12 टोचले.
त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढली. परंतु केवळ एक तृतीयांश भागातील ट्युमरवरच त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्वचेच्या कर्करोगात वापरल्या जाणाऱ्या एका नव्या उपचार पद्धतीचा इंटरल्युकिन-12 सोबत वापर करण्यास शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. धमन्यांमधून दिल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या औषधाचा वापर करण्यास सुरुवात केल्यावर त्या औषधाने टी पेशींचा नायनाट केला आणि चांगले परिणाम दाखवले. सुमारे 80 टक्के प्राण्यांवरील उपचारात ट्युमर बरा झाल्याचे दिसून आले. हे संशोधन जर्नल ऑफ एक्सपिरिमेंटल मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
रेडिओथेरपी
कर्करोग असलेल्या ब्रेन टयुमरमध्ये ऍस्ट्रोसायटोमा या प्रकारचा कर्करोग 60 टक्के इतक्या म्हणजे सर्वाधिक प्रमाणात आढळतो. ऍस्ट्रोसायटोमाच्या चार अवस्था सांगितल्या जातात. या अवस्थांपैकी चौथी अवस्था म्हणजे ग्लायोब्लास्टोमा ही अवस्था ऍस्ट्रोसायटोमाच्या रुग्णांत आढळते. ऍस्ट्रोसायटोमा पहिल्याच अवस्थेत असताना त्याचे निदान झाल्यास रुग्ण उपचाराने पूर्ण बरा होतो. चौथ्या अवस्थेतही रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो; परंतु या अवस्थेत पुढे ब्रेन टयुमरचा पुनरुद्ङव होण्याची शक्यता जास्त असते. ब्रेन टयुमरवर त्रिकोणी उपचारपद्धती प्रचलित आहे. यामध्ये प्रामुख्याने शल्यचिकित्सा (ऑपरेशन) आणि त्यानंतर साधारण 70 टक्के रुग्णांमध्ये रेडिओथेरपी (किरणोपचार) द्यावी लागते.
रेडिओथेरपी ही उच्च दर्जाच्या क्ष-किरणांद्वारे दिली जाते. रेडिओथेरपी देताना रुग्णाला काहीही जाणवत नाही पण त्याद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असते. किरणोपचार हा लिनिअर ऍक्सलरेटरद्वारे (लिनॅक) दिले जातात. लिनॅकद्वारे थ्री-डी सी आर टी/ आय. एम. आर. टी./ आय. जी. आर. टी. या आधुनिक तंत्रज्ञानाने किरणोपचार दिला जातो. यामध्ये कॅन्सरग्रस्त भागाला अधिकाधिक किरणोपचार आणि कॅन्सरविरहित भागाला कमीतकमी किरणोपचार देतात.
यामुळे किरणोपचाराचे दुष्परिणाम (साईड इफेक्टस्) खूप कमी होतात. ऍनाप्लास्टीक ऍस्ट्रोसायटोमा किंवा ग्लायोब्लास्टोमा या प्रकारच्या ब्रेन टयुमरमध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि औषधोपचार (किमोथेरपी) ही त्रिकोणी उपचारपद्धती प्रभावी ठरते. लवकरात लवकर निदान आणि अचूक व संपूर्ण उपचारांनी मेंदूचा कर्करोग बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल अधिक माहिती करून घेऊन आपल्या मनातील कर्करोगाची भीती दूर करणे आवश्यक आहे.
-डॉ. ऋषीकेश सरकार