अनेक मुले स्वभावाने लाजाळू असतात आणि बाहेरील जगापासून दूर राहतात. कित्येक मुलं मोबाईल आणि लॅपटॉपलाच आपलं जग मानतात आणि त्यांना त्यांच्या शेजाऱ्याचं नावही माहीत नसतं. मोबाईलच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाशी सामाजिक किंवा सोशल आहोत असे त्यांना वाटते. जेव्हा मुले मित्र बनवू शकत नाहीत किंवा त्यांना समाजात वावरताना अडचणी येतात तेव्हा पालकांसाठी हे एक आव्हान असू शकते. अभ्यास आणि खेळासोबतच मुलांना सामाजिक संस्कार देणेही गरजेचे आहे.
ते गप्प राहिल्यास त्यांचा विकास खुंटतो. सामाजिक संवादामुळे त्यांची प्रेरणा वाढते, त्यांचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे मोबाईलच्या बाहेरही एक जग आहे, जो जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, हे मुलांनी समजून घेणे आवश्यक आहे. सामाजिक संबंध आत्मसन्मानासाठी महत्वाचे आहेत, परंतु मुलासाठी नवीन लोकांशी सामाजिक संबंध आणि संवाद साधणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय करायला हवे? चला तर, जाणून घेऊया.
* आजूबाजूचे भान मुलांना समजायला हवे
बरीच मुले आधीपासूनच सोशल असतात. त्यांना लोकांना भेटायला आवडते. तर अनेक मुले नातेवाईक घरी येताच खोलीत जातात. अशा परिस्थितीत, पालकांनी त्यांना घरगुती कामात सामील केले पाहिजे, जसे की त्यांना पाण्याचा ग्लास आणण्यास सांगणे किंवा मोठ्यांना नमस्कार करण्यास, बोलण्यास शिकवले पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे हे कळेल. सामाजिक राहिल्याने, मुले स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्यास सक्षम राहू शकतात, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालचे लोक त्यांच्यासोबत नेहमी खुश राहतील.
* नवीन लोकांशी मुलांना बोलायला लावा
अनेक मुले त्यांचे पालक किंवा जवळच्या व्यक्तींशिवाय इतर कोणाशीही फारसे मोकळे होत नाहीत. अशा परिस्थितीत ते अंतर्मुख होत राहतात आणि बाहेरील जगाशी संपर्क साधू शकत नाहीत. आजच्या काळात मुलांनी कृतीशील आणि संवादी असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनो, मुलांना बोलायला शिकवा. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि एकटेपणा दूर होईल. मुलांना मित्र बनवायला आणि इतर नवीन लोकांसमोर मोकळे व्हायला शिकवा. यासाठी त्यांना सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करा.
* शेअरिंग- केअरिंग शिकवा
मुलांचं मन निष्पाप आणि साधं असतं, पण अनेक मुलांमध्ये शेअरिंग आणि केअरिंग करण्याचा किंवा काळजी घेण्याचा स्वभाव नसतो. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांना मित्रांमध्ये गोष्टींचं, वस्तूंचं तसंच भावनांचं शेअरिंग करणं आणि इतरांची काळजी घेणं शिकवले पाहिजे. मित्रांना वाईट काळात मदत केल्याने मुलांमध्ये सहकार्याची आणि सद्भावनाची भावना निर्माण होईल. मुलांना मैत्रीच्या प्रेरणादायी कथा सांगा.
* प्रश्न विचारणं आवश्यक
अनेक मुले शांतपणे ऐकून घेत राहतात. पण त्यांनी प्रश्न विचारले नाहीत तर त्यांचा विकास थांबेल. तेव्हा पालकांनो, तुमच्या मुलांना प्रश्न करायला शिकवा. यामुळे त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण होईल आणि ते नवीन गोष्टी जाणून घेऊ शकतील आणि कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
* मुलाची ताकद ओळखा
प्रत्येक मुलामध्ये एक विशेष गुणवत्ता असते. हीच त्याची ताकद आहे. म्हणूनच मुलांना काहीही करण्यास भाग पाडू नका. त्यांची प्रतिभा समजून घेऊन आणि मुलांची बलस्थाने काय आहेत हे जाणून घेऊनच पुढे जा. पालकांनी मुलाचे गुण ओळखले पाहिजेत.
* मुलांसाठी आदर्श बना
पालकांनी प्रथम स्वतः सामाजिक होणं गरजेचं आहे. पालकांनी कामाव्यतिरिक्त वेळ काढावा, मुलांसोबत बसावे, सामाजिक राहावे, जेणेकरून मुले त्यांच्याकडे पाहून हे सर्व गुण शिकतील. खरंतर, मुलांइतकेच पालकही त्यांची मुले सामाजिक नसण्यासाठी जबाबदार असतात. कारण विभक्त कुटुंबात पालकांना मुलांसाठी वेळ नसतो, ते स्वतः मुलांसोबत वेळ घालवू शकत नाहीत. दुसरीकडे, मोबाईल फोनने मुलांना अक्षरशः आभासी सामाजिक (व्हर्च्युअल सोशल) बनवले, परंतु त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून दूर ठेवले. पालकांनी आपल्या मुलांसाठी आठवड्यातून एक दिवस काढणे आणि त्यांना बाहेरील खऱ्या जगाची ओळख करून देणे महत्वाचे आहे. यामुळे त्यांची नातेसंबंधांची समज वाढेल आणि ते सामाजिक बनतील.
The post मुलांना मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढायचंय? त्यांना सामाजिक संस्कार देण्यासाठी तुम्ही काय करायला हवे? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat.