मन म्हणजे नेमके काय हो? विचार, भावना आणि कृती या तिघांची सांगड म्हणजे मन.
बघा; आधी एखादा विचार आपल्या मेंदूत डोकावतो, त्यानंतर तो विचार सकारात्मक, नकारात्मक किंवा तटस्थ या पैकी ज्या प्रकारचा असेल तशा भावना आपल्या मनात निर्माण होतात आणि त्यानुसार आपल्याकडून कृती घडते. उदाहरणार्थ, आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला घरी यायला खूप उशीर झाला, त्याच्याशी संपर्क होऊ शकत नाही, अशा वेळी आधी नकारात्मक विचार येतो, त्यानंतर चिंता व भीतीची भावना निर्माण होते व या भावनांमुळे हात पाय थरथरणे, हातातील एखादी गोष्ट खाली पडणे, घाम येणे अशी अनेक शारीरिक लक्षणे जाणवतात.
मानसिक ताण हा विचार, भावना व कृती यांवरच अवलंबून असतो. ताण म्हणजे एक प्रकारचा मानसिक दबाव, एखाद्या गोष्टीची चिंता वाटून मनावर आलेले दडपण किंवा ओझे.
ज्यावेळी एखादी असुखाकारक, चिंतात्मक भावना निर्माण होते व त्यातून अत्यंत मानसिक थकवा जाणवतो त्यावेळी आपण प्रचंड ताणातून जात आहोत असे समजावे.
आयुष्यात काही अंशी ताण हा गरजेचा असतो; उदा. मुलांना परीक्षेचा ताण आलाच नाही तर मुले अभ्यासच करणार नाहीत. हा ताण परीक्षा होईपर्यंतच टिकून राहतो व त्यानंतर निघून जातो. परंतु जर हा ताण दीर्घकाळ टिकून राहिला तर त्यातून चिंता विकार, नैराश्य अशा अनेक मानसिक समस्या निर्माण होतात.
एका नंतर एक ताण निर्माण होत जाऊन एकाही ताणाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन न होऊ शकल्याने भविष्यात मानसिक आजार उद्भवू शकतात; त्यामुळे ताणाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करावा. कोणताही ताण हा चिंतेच्या भावनेतून येत असल्याने बरेचवेळा अनेक जण ताणाचा सामना करून तो कमी करण्यापेक्षा त्याला टाळण्यासाठी त्याच्यापासून लांब पळतात व त्यातून अजून ताण निर्माण होतो.
ताण हा अगदी रबरासमान असतो जितका गरजेचा तितका ताणल्यास उपयोगी परंतु जास्त ताणल्यास ज्या प्रमाणे रबर तुटून बोटाला लागते तसेच ताणही जास्त काळ राहिल्यास भावनांचा कडेलोट होतो व त्यातून आत्महत्येसारखे गंभीर पाऊल व्यक्तीकडून उचलले जाऊ शकते.
ताणाची लक्षणे
पसतत चिंतेची भावना प चीडचीड प अस्वस्थता प चलबिचल प नकारात्मक विचार प सतत एखाद्या गोष्टीची अकारण भीती वाटत राहणे प घाम येणे प छातीत धडधडणे प हात पाय थरथरणे प निद्रानाश किंवा अति झोप प भूक कमी होणे किंवा अति खा खा प डोके दुखणे प मणक्याचे आजार उद्भवणे.
ताणाचे व्यवस्थापन व त्यावरील उपाय
आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप ताण आला आहे हे स्वीकारा व त्याला सामोरे जा. स्वतःकडून अवाढव्य अपेक्षा ठेवू नका. सकारात्मक विचार करा व नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा. कोणतीही अप्रिय घटना अथवा वेळ ही आपल्याला अधिक सक्षम बनविण्यासाठी आलेली असते यावर विश्वास ठेवा. अंतिम ध्येयं गाठण्यासाठी आधी छोटी छोटी ध्येयं बनवा व ती गाठण्याचा प्रयत्न करा. ताणाचे मूळ शोधून काढा. नियमित व्यायाम करा. ध्यान धारणा व दीर्घश्वसन करा आपल्याला नेमका कोणकोणत्या गोष्टींचा ताण येत आहे याची वहीत नोंद करा व एक एक समस्येवर मार्ग काढा. छंद जोपासा. सतत कामात न राहता पुरेशी विश्रांती घ्या. योग्य आहार घ्या. अमली पदार्थांचे सेवन टाळा.
छोट्या गोष्टींमधून आनंद शोधा ताण हा चार ते सहा महिन्यांपर्यंत सतत टिकून राहिल्यास त्वरित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला व समुपदेशन घ्या. मानसिक ताणातून जात असताना अनेक नकारात्मक विचार मनात येत असतात; ज्या प्रमाणे रस्त्यावरून जात असताना आपल्या आजूबाजूने असंख्य गाड्या, वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जात असतात, अशा वेळी आपण प्रत्येकाकडे थांबून लक्ष देत नाही; अगदी त्याचप्रमाणे मनात आलेल्या विचारांना येऊ द्या. पण त्यांवर लक्ष केंद्रित करू नका, ते विचार जसे आलेत तसेच ते निघूनही जाणार. त्यामुळे त्या विचारांकडे दुर्लक्ष करणे फायद्याचे ठरते.