परदेशात शिकणाऱ्या सुमित (नाव बदललेले आहे) ला ब्रेन कॅन्सर झाला आणि अनेक उपचारानंतरही त्याचा जीव वाचला नाही. मात्र परदेशात असताना त्याने त्याचे वीर्य, तेथील वीर्य बॅंकेत सुरक्षित ठेवले होते. भारतात राहत असलेल्या आणि पेशाने शिक्षिका असलेल्या त्याच्या आईने केंद्र सरकारच्या मदतीने अनेक प्रयत्नांती ते वीर्य भारतात आणले आणि सरोगसीच्या माध्यमातून आपल्या मुलाचे अपत्य मिळवले. सरोगसीतून जुळ्या मुलींचा जन्म झाला; परंतु आपल्या मुलाचेच रूप त्या त्यांच्यामध्ये पाहत होत्या. हे शक्य झाले केवळ या “फ्रीज’ केलेल्या वीर्यामुळे. हाच प्रकार स्त्रीबीजाबाबतही होताना दिसतो आहे.
अनेक कलाकार, सेलिब्रेटींसह अनेकजण “एग्ज फ्रीजींग’चा पर्याय निवडताना दिसत आहेत. करिअरच्या उभरत्या काळात मातृत्त्वाची संधी ते मिळवू इच्छित नाहीत आणि नंतर उतरत्या वयात नैसर्गिक गर्भ राहण्यात अडथळे येऊ शकतात, या काळजीपोटी खबरदारी म्हणून त्यांनी “एग्ज फ्रीजींग’चा पर्याय निवडल्याचे ते स्पष्टपणे माध्यमांसमोर सांगतात.
लग्न आणि मूल झाल्यानंतर करिअर संपते अशी अनेकांची धारणा असते. त्यात कलाकार आघाडीवर आहेत. याशिवाय अनेक करिअर ओरिएंटेड महिला आहेत ज्यांना लग्न करायचे आहे; परंतु त्यानंतर लगेचच मुलांची जबाबदारी नको असते. अशावेळी गर्भनिरोधक साधने वापरताना पुढे जाऊन गर्भधारणेत काही समस्या निर्माण झाल्या, तर घातक ठरू शकतात. म्हणून हा पर्याय अनेकजण निवडतात.
अंडी गोठवणे किंवा उसाईट क्रायोप्रिझर्व्हेशन हे विशेषत: वय झालेल्या, एंडोमेट्रिओसिस, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा कोणत्याही प्रकारचा कर्करोग असलेल्या स्त्रिया घेतात. आई होण्याचे योग्य वय हे 20 ते 30 या कालावधीत आहे. परंतु या वयात आई बनू इच्छित नाही आणि जर आपल्या करिअरमुळे किंवा अन्य कारणांमुळे तिला 30 वयानंतर आई बनायचे असेल तर एग्ज फ्रीजिंग पद्धतीचा वापर करून ती आई होण्याचे आपले स्वप्न साकार करू शकते.
एग्ज फ्रीझिंग म्हणजे काय?
एकदा तुम्ही अंडी गोठवण्याचा निर्णय घेतला की, तुमच्या अंडाशयातील अंडी काढून ती गोठवली जातात. ही अंडी नंतरच्या टप्प्यात वापरण्यासाठी साठवली जातात. मात्र कालांतराने अंड्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते हा त्यातील धोका आहे. यामध्ये अंडी गोठवण्याक्षम आहेत का, याच्या चाचण्या केल्या जातात. त्यानंतर अनेक अंडी फलीत होण्यासाठी कृत्रिम संप्रेरक इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जातात. त्यानंतर ही अंडी काढून ती गोठवली जातात. या माध्यमातून उतारवयातही प्रजनन सल्लागाराच्या माध्यमातून ही अंडी गर्भाशयात फलित केली जाऊ शकतात किंवा बाहेर फलित करून आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ती गर्भाशयात ठेवली जातात. रजोनिवृत्तीनंतर नैसर्गिक गर्भधारणा शक्य नसते, परंतु या माध्यमातून ते होऊ शकते. मात्र या प्रक्रियेसाठी तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन आवश्यकच आहे.