पुणे – एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये महिलांना ५० टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, ही सवलत दि.१ ते ८ मार्च २०२४ या कालावधीत असणार आहे. एमटीडीसीची रिसॉर्ट ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण ३४ पर्यटन निवासे, २७ उपहारगृहे असून, निवास व न्याहारी , कलाग्राम, अभ्यागत केंद्र, इको टुरिझम यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत.
तसेच अलीकडेच जबाबदार पर्यटनअंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरू केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्ट, हिल रिसोर्ट, जंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लब, स्कूबा डायविंग आदी जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
या उपक्रमामुळे महिलांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला जाईल आणि महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. एमटीडीकडून ही ऑफर केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील आणि परदेशातील सर्व महिलांसाठी एक खास भेट आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीकडून करण्यात आले आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या https://www.mtdc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रात पाहण्यासारखे
महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. राज्यामध्ये ६ जागतिक वारसा स्थळे, ८५० हून अधिक लेण्या, ४०० च्या जवळपास दुर्ग व गडकिल्ले आहेत. तसेच महाराष्ट्र विविध पर्वत रांगा, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य, समुद्रकिनारे, नद्या, सांस्कृतिक वारसा, रुढी, परंपरा, वेशभूषा, सण, उत्सव यांनी समृद्ध आहे. महाराष्ट्रातील ही प्रेक्षणीय, निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळे देशी आणि विदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.
The post महिलांच्या पर्यटनाला मिळतेय प्रोत्साहन appeared first on Dainik Prabhat.