वाशिंग्टन – गेली सुमारे दोन वर्षे संपूर्ण जगाला सतावून सोडणाऱ्या करोना महामारी मुळे जागतिक स्तरावर लोकांचे आयुर्मान दोन वर्षाने कमी झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात प्रथमच अशा प्रकारे लोकांचे आयुर्मान कमी झाले आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीने या संदर्भातले संशोधन केले असून सर्वात जास्त फटका अमेरिकेतील पुरुषांना बसला असून त्यांचे आयुर्मान 2.2 वर्षाने घटले आहे.
या संशोधनात जगातील 29 देशांची पाहणी करण्यात आली त्यापैकी सत्तावीस देशांमध्ये 2019 च्या तुलनेमध्ये लोकांचे आयुर्मान घटल्याचे लक्षात आले. महामारीमुळे आत्तापर्यंत जगात 50 लाख पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. अमेरिकेमध्ये सात लाख लोकांपेक्षा जास्त लोकांचा बळी महामारीने घेतला आहे.
याबाबतचे संशोधन इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपीडिओमोलॉजी या नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनातील एक सहलेखक डॉक्टर रिद्धी कश्यप यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुर्मान घटण्याचे प्रमाण जास्त आहे.
दहा देशांमध्ये पुरुषांचे आयुर्मान एक वर्षापेक्षा जास्त कालावधीने घटले असल्याचेही या संशोधनात समोर आले तर जगातील अकरा देशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुर्मान कमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. या संशोधनात युरोप-अमेरिकेतील देशांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता.