”मला आई व्हायचंय” ही निसर्गदत्त स्त्रीसुलभ हाक बहुतांश स्त्रियांमध्ये ऐकू येतेच. काही जणी ती काना आड करतात -करिअरच्या मागे लागून, आणि मग चाळीशी नंतर आई होण्याची आस लागते; पण कधीकधी तीशी मध्ये सहज असलेलं आई पण चाळीशी नंतर अवघड होऊन जातं. स्त्रीबीजांचा साठा संपत आलेला असतो. संप्रेरकांचा अभाव जाणवू लागतो, वाढलेला रक्तदाब किंवा मधुमेह ठाण मांडून बसतात.
बदलत्या जीवनशैलीमुळे नाईलाजाने आलेले आणि काही ओढवून घेतलेले ताण आपलं अस्तित्व दाखवायला लागतात. तर मैत्रिणींनो वेळी जाग्या व्हा. पाश्चात्य जीवनशैली ‘दुरून डोंगर साजरे’ म्हणून कौतुक करून सोडून द्या आणि आपल्या आई आणि आजींनी पूर्वापार सांगितलेल्या काही सात्विक खाण्याच्या आणि जगण्याच्याही सवयी आपण वेळीच अंगीकारू या! फास्ट फूडचे गल्लोगल्ली उघडू लागलेले स्टॉल त्यामुळे तरुण आणि बालकांमधला लठ्ठपणा .कोपऱ्यांवरच्या टपऱ्यांवर मुलांबरोबरीने सिगरेटचे झुरके मारणाऱ्या तरुण मुली .”आम्हाला जगण्याचा स्ट्रेस किती आहे!” असं म्हणत बदल म्हणून मग सवय म्हणून चालू झालेलं स्त्रियांमधलं अपेयपान. मैदानी खेळांची मोबाईल गेम नी बळकावलेली जागा, या अनेक घातक सवयींचा एकत्रित दुष्परिणाम म्हणजे भारतीय समाजात वाढत चाललेलं वंध्यत्वाचे प्रमाण. दहा वर्षांपूर्वी असलेलं चार ते सहा टक्के आता 10 ते 14 टक्क्यांवर पोहोचलं आहे. आजकाल अजून एक नवीन कल्पना आकारू लागलीये. स्त्रीबीजं गोठवून ठेवायची आणि पन्नाशीला आई व्हायचं.
एखादा टक्के स्त्रियांमध्ये हे बरोबर असेलही पण अंधानूकरण करीत जर हा निर्णय अनेक जण घेऊ लागले तर मात्र समाज घातक प्रथा जन्मा येऊ पाहतेय असंच म्हणावं लागेल .उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या लहान मुलांना पन्नाशीची आई किती पुरे पडणारे? कुरकुरणाऱ्या गुडघ्यांनी किती मागे पळणारे? की आता आपण आपल्या वर्षा दोन वर्षाच्या बाळा कडूनही म्हाताऱ्यांसारख्या संथ जीवनशैलीची अपेक्षा धरणार आहोत? की झेपत नाही म्हणून पगारावरच्या मावशींनाच आपल्या छकुल्याशी खेळण्याचा आनंद उपभोगू देणार आहोत? बाळाला गुरगुट्या भात भरवताना स्वतः मात्र रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या गोळ्या खाणार आहोत.
The post ”मला आई व्हायचंय” appeared first on Dainik Prabhat.