सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये शिक्षण, करिअर यासाठी घराबाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहावे लागते. अशा वेळी नवीन ठिकणी कोणी तरी आपल्याला सांभाळून घेणारे असावे, असे वाटते. संवाद करण्यासाठी, आधार मिळविण्यासाठी मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. अनेक वेळा भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर असणाऱ्या मैत्रीची सुरुवात वैचारिक समानतेमधून होते. बोलणं, भेटणं वाढतं. एकमेकांचा एकमेकांना आधार वाटतो आणि हेच प्रेम आहे असे वाटून फसवणूक होण्याची शक्यता वाढते. बऱ्याच वेळा हे प्रेम एकतर्फी असण्याची शक्यता जास्त असते.
सध्या एकतर्फी प्रेम, आकर्षण यामुळे मुलींवर होणारे हल्ले, हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. याविषयीच्या बातम्या सतत माध्यमांमधून येत असतात. कोणत्याही कारणाने मिळालेला नकार पचविण्याची, स्वीकारण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हे फक्त मुलींच्या वाट्याला येतं असं नाही तर काही मुलांच्या बाबतीत अशा घटना घडताना दिसतात. त्याचं प्रमाण कमी असलं तरी ते विचार करायला लावणारे आहे. नात्यांमध्ये होणाऱ्या हिंसेचं प्रमाण वाढलं आहे. खरं तर याला प्रेम म्हणायचं, आकर्षण की विकृती !
टीव्हीवरील मालिका, फिल्म, वेब सिरीज यांच्या माध्यमातून महिलांवर होणारे अत्याचार दाखविले जातात. त्याचे परिणाम काय होतात याचे चित्रण बहुधा केलेले दिसत नाही. त्या मुलीलाच कसा त्रास सहन करावा लागतो हेच दाखविले जाते. जसं या माध्यमाद्वारे दाखवलं जातं तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न सध्याच्या युवा पिढीकडून होताना दिसतो. यासाठी बऱ्याच वेळा व्यसनांचा आधार घेतलेला असतो. या स्वरूपाची मानसिकता समाजामध्ये वाढायला लागली आहे. पूर्वीपासूनच महिलांना समाजामध्ये दुय्यम स्थान आहे.
बाईनं आपलं ऐकलंच पाहिजे, मला नाही म्हणू शकत नाही या पुरुषी मानसिकतेतून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. खरं प्रेम म्हणजे काय हेच लक्षात येत नाही. प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. प्रेम हे कोणावरही होऊ शकते. ते ठरवून होत नाही. एकाने ते व्यक्त केल्यानंतर दुसऱ्याच्या होकाराशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. काही कारणांनी प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं नाही तरी प्रेमाचा आदर करून प्रेम हृदयात ठेवून पुढे जाणं म्हणजे खरं प्रेमच आहे. प्रेमामध्ये एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला जातो, दुसऱ्याच्या सुखासाठी त्याग, समर्पण करण्याची तयारी असते. पण अशा स्वरूपाचं प्रेम हे दिवसेंदिवस कमी व्हायला लागलं आहे.
कोणत्याही हिंसेला बळी पडायचं नसेल तर त्यासाठी स्वतःच्या सुरक्षिततेची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांचा वावर कमी आहे अशा ठिकाणी एकटं भेटणं टाळायला हवं, स्वभाव जाणून घेतला पाहिजे, रागामध्ये कोणतही टोकाचं पाऊल उचललं जाऊ शकतं. अशा वेळी राग हाताळायला शिकायला हवा. व्हॉटस् ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमातून मैत्री करताना सावधानता बाळगली पाहिजे. आपली फसवणूक होत नाही ना हे बघायला हवं, यासाठी कुटुंबामध्ये संवाद ठेवायला हवा. वेळीच मदत मागितली पाहिजे. आपल्या आयुष्यातील प्राधान्य काय आहे, हे ठरवून त्याप्रमाणे वागायला हवं. आपण ज्या गोष्टीसाठी घराबाहेर पडलो आहे त्याला प्राधान्य द्यायला हवं. आपलं व दुसऱ्या व्यक्तीचा आयुष्य खूप अनमोल आहे, ते आपण आनंदाने जगलं पाहिजे.
The post मनाविषयी… : मैत्री, प्रेम की आकर्षण… appeared first on Dainik Prabhat.