दवाखान्यात अनेक वेगवेगळे पेशंट येत असतात . त्यांचे स्वभाव वेगळे असतात. त्यांच्या मानसिकता वेगवेगळ्या असतात. त्यांच्याशी बोलताना त्यांची सुखदुःख कळत असतात. त्याचबरोबर लक्षात येतं की त्यांना शारीरिक वेदनेपेक्षा मानस वेदनाच जास्त त्रास देत असतात. व्यसनी लोकांची संख्या त्यात कमी असते असे नाही. त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना विचारलं एखादं व्यसन आहे का? तर लगेच सांगतात, तंबाखू खातो किंवा रोज संध्याकाळी थोडी दारू पिण्याची सवय आहे.
आणि मग त्यांना सांगितलं हे सोडून द्या. त्यामुळे हे दुखणं तुम्हाला लागलं आहे. तर लगेच म्हणतात कालपासून बंदच केली. पण पुढेही बंद करणार, असे ते क्वचितच म्हणतात. मग आपण सांगितलं की इथून पुढे दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, तर मग म्हणतात आता बंदच करणारे.
हा त्यांचा संकल्प फारसा टिकत नाही, शक्यतो नव्याण्णव टक्के लोकांचा तर टिकत नाही, दुखणं कमी झालं की परत दारू तंबाखू चालूच होते. सर्वसामान्य माणूस सतत काही ना काही संकल्प करत असतो. ठरवत असतो. पण परिस्थिती आणि काही इतर अडचणी यातून त्याचे संकल्प फारसे सिद्धीला जात नाहीत. अर्थात सगळा दोष त्याला देता येत नाही. कारण संकल्प पूर्ण व्हायला एक संयम आणि चिकाटी लागत असते. जगणं पेलत असताना ही चिकाटी आणि संयम राखणं ही अत्यंत अवघड गोष्ट असते.
आमची आजी म्हणायची ‘अशी काही गोष्ट ठरवू नका किंवा संकल्प करू नका जेणेकरून त्याचा इतरांना त्रास होईल.’ वर्षामागून वर्षे जातात. असं काही मार्गदर्शन करणारी माणसेही जातात. पण माणसाचा संकल्प करणं संपत नाही. कोणत्या तरी आशेला लागून तो हे संकल्प करतोच. वर्ष संपताना बरेच जण मनात काही ना काही संकल्प करत असतात. यावर्षी वाचन वाढवेन, यावर्षी पर्यटनाला जाईन, यावर्षी घराचे बांधकाम करेन किंवा घराचे कर्ज फेडेन किंवा मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाईन, या वर्षात मटण खाणार नाही, या वर्षात दारु सोडेन.
एक ना दोन अनेक संकल्प असतात. वर्षाअखेरीला मग शेवटचंच म्हणून मग ती लोक मटण, मासे भरपूर खातात. पोटभर दारूही पितात. वर्षाअखेर साजरी केली जाते. हल्ली तर तो एक उत्सवच बनला आहे. चौकाचौकांत केक कापण्याचा कार्यक्रम चालतो. हुल्लडबाजी चालते. हॉटेलतर फुल्ल पॅक असतात. काही मोठ्या हॉटेलमध्ये खास सेलिब्रिटींना बोलावले जाते. ३१ डिसेंबर जवळ आला की मग तरुणाई चेतवल्यासारखी वागते. दुपारपासून रस्त्यावर दुचाकीवरून डब्बल कधी तिब्बल सीटवर फिरून रात्रीच्या पार्टीची तयारी चालू होते. दारुच्या दुकानावर हल्ली रोषणाई होते. अगदी नाही केली तरी तिथल्या खपावर परिणाम होत नाही. रात्री उशीरापर्यत दुकानातली गर्दी हटत नाही. सरकारही दारूवर थोडे मेहेरबान असतेच. त्यातून भरपूर टॅक्स सरकारलाही प्राप्त होतो. अगदी करोना काळातही आतल्या अंगानं मुबलक दारु विकली गेली. मग पुढच्या वर्षीपासून बंद करायचे म्हणून सगळे वर्षाअखेरीस पोटभर पार पाडायचे.
अर्थात सगळे संकल्प वाईट असतात असे नाही. काही युवा किल्ल्यावर जाऊन साफसफाई करण्याचा संकल्प करतात. काही तलावाजवळपासचे प्लॅस्टिक, पाण्याच्या- दारुच्या बाटल्या गोळा करून तो परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात व तो पुरा करतातही. अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या संघटना वर्षाअखेरीस चौकाचौकांत दूध वाटतात. दारुऐवजी दुग्ध प्राशन करायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. तरुणाई चांगल्या मार्गाला वळवण्याचे प्रयत्न वर्षाअखेरीला होतात .
नवीन वर्षाला सामोरे जाताना चांगले संकल्प केले जातात. काही जण इतरांना ‘तुम्ही काय संकल्प केला.’ हा प्रश्न विचारायचाच संकल्प केला असल्यासारखे नवीन वर्षात भेटेल त्याला विचारत असतात. स्वतःच्या संकल्पाविषयी मात्र काहीच बोलत नाहीत हा भाग वेगळा.
जुन्या नात्यांना उजाळा मिळावा. दुरावलेली नाती जुळावीत म्हणून माणसाने मनात ठरवावं. मैत्र अखंडीत राहवं म्हणून प्रयत्न करावेत. जाती धर्मापलिकडे जाऊन मानवता निर्माण व्हावी असे कर्म हातून व्हावे असे ठरवावे. नवीन वर्षाचा उंबरठा ओलांडताना इतके जरी करता आले तरी खूप झाले. आमची आजी म्हणायची, ‘इतरांनी आपल्याला काय दिले याचा विचार करण्यापेक्षा आपण इतरांना काय देतो याचा विचार करावा.’ आठवलं की कधी कधी वाटतं या छोट्या छोट्या विधानातही खूप अर्थ सामावलेला आहे.
नेहमी सरकारनं पर्यायानं देशानं आपल्याला काय दिलं याचा विचार करण्यापेक्षा आपण समाजाला, देशाला काय देतो हा विचार नवीन वर्षापासून मनात रुजवायला हरकत नाही. याला संकल्प वगैरे म्हणायचं की नाही ही ज्यांचं त्यानं ठरवावं. प्रत्येक संकल्पाचा मार्ग सिद्धीपर्यंत पोहोचेलच याची खात्री नसली तरी निष्ठेने त्या मार्गावरून चालायला काहीच हरकत नाही. आयुष्यातली वर्षे संपत जातात. कॅलेंडरचे उलटलेले पान मागे करून दिवस वार तारीख येते पाहता पुन्हा पुन्हा पण…
आयुष्याचं नाहीच तसं, पान उलटलं की उलटलंच. मागे वळून येतं पाहता, पण मागे पुन्हा नाही येत चालता. सुटलेले हात जातात सुटूनच… पुढे असतातच नवीन वर्षात काही ग्रहणे, आमावस्या, पौर्णिमाही, शुभ- अशुभ दिवस. आणि चालण्यासाठी नेहमीच एक वाट धुक्यात हरवलेली… वर्षोनुवर्षे याच वाटेवरून चालताहेत माणसे आयुष्याची वारी.
सुख दुःखाची पताका घेऊन खांद्यावर, मनातला सांभाळत विठ्ठल… हा मनातला विठ्ठल सांभाळत नवीन वर्षात सर्वांचे सर्व चांगले संकल्प पूर्णत्वास जावोत याच नवीन वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा .
The post मनापासून : संकल्पाकडून सिद्धीकडे … appeared first on Dainik Prabhat.