भारतीय ध्यानपद्धतीतही तसे बरेच प्रकार आहेत. पण सर्वात माहितीतील ध्यानपद्धतीबद्दल बोलू. वेदांतामधील ही सर्वात सोपी ध्यानपद्धती आहे. सर्वप्रथम पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे. यानंतर दोन्ही हात ज्ञानमुद्रेत ठेवून गुडघ्यांवर ठेवावे.
यानंतर “ओम’चा उच्चार करावा. थोड्या वेळाने ओमच्या उच्चारामुळे मन शांत होते व त्या उच्चारांच्या कंपनामुळे डोकेही शांत होते. भारतीय संस्कृतीत ध्यानाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. ध्यान करण्यामुळे होणारे अमाप फायदे आता आधुनिक वैद्यकशास्त्रानेही मान्य केले आहेत व ध्यानाला उच्च स्थान दिले आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ध्यान करण्यासाठी एखाद्या निर्जन ठिकाणी जात असत.
ध्यानाचा खरा अर्थ आहे स्वतःच्या अस्तित्वाचा खोलवर जाऊन विचार करणे. आपल्या मनात काय चालले आहे ते लक्षपूर्वक पाहून त्यातील उपयुक्त विचारांना योग्य दिशा देणे, म्हणजे ध्यान होय! ध्यानामुळे असंख्य फायदे होतात. एकाग्रता वाढणे, मन शांत राहणे, मनावर नियंत्रण येणे हे त्यांपैकी काही फायदे आहेत. भारताप्रमाणेच जगभरातील विचारवंतांनी व आरोग्यतज्ज्ञांनी संशोधन व चिकित्सा करून ध्यानाच्या अनेक पद्धती प्रगत केल्या आहेत. या सर्व पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्या सर्वांचा उद्देश मनःशांती मिळवणे हाच आहे.
विपश्यना
विपश्यना ही ध्यानपद्धती भगवान गौतम बुद्धांनी प्रगत केली आहे. जगभरातील सर्वात लोकप्रिय ध्यानपद्धतींपैकी ही एक पद्धत आहे. बौद्ध विहारांद्वारे भारतातही अनेक ठिकाणी विपश्यना केंद्रे चालवली जातात. याठिकाणी मोफत प्रवेश दिला जातो व 10 दिवसांचे प्रशिक्षण देऊन मनःशांती व रोगमुक्ती मिळवण्याविषयी ज्ञान दिले जाते. या ध्यानाद्वारे मिळणारे फायदे अचंबित करणारे आहेत.
विपश्यना करण्यासाठी प्रथम एका शांत जागी बसावे. बसतानाही शरीराला कुठल्याही प्रकारचा ताण न देता सहज बसावे. यानंतर आपल्या नाकातून येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे व खासकरून त्या श्वासाच्या नाकपुडीला होणाऱ्या स्पर्शाकडे आपले लक्ष केंद्रित करावे. पण श्वास घेताना तो जाणून-बुजून दीर्घ घेण्याचा प्रयत्न करू नये.
याचे कारण आपण जशा अवस्थेत असतो, तशाच अवस्थेत स्वतःकडे पाहण्यास विपश्यनेत महत्त्व आहे. श्वास उथळ असल्यास तशाच अवस्थेत श्वास घेत राहावे व श्वासाकडे लक्ष केंद्रित करावे. थोड्या दिवसांच्या सरावानंतर आपले संपूर्ण लक्ष बाहेरच्या गोष्टींवरून हटून श्वासावर केंद्रित होऊ लागते.
झाझेन पद्धती
पुरातन झाझेन ध्यानपद्धती ही बौद्ध ध्यानपद्धतीचाच एक भाग समजली जात होती, पण काळानुरूप यात बदल होत गेला व नवीन झाझेन ध्यानपद्धती प्रगत झाली. सध्याच्या झाझेन ध्यानपद्धतीचे तत्त्व आहे, फक्त बसणे, यात फक्तताठ बसणे याशिवाय बाकी काही नियम नाहीत. दीर्घ श्वास घेणे किंवा विचारांवर लक्ष ठेवणे इत्यादी कसलेही नियम झाझेन ध्यानपद्धतीस लागू होत नाहीत. झाझेन ध्यानपद्धतीत मांडी घालून किंवा वज्रासन घालून बसावे व दोन्ही हात एकावर एक ठेवून अंगठे जोडावेत आणि मांडीवर ठेवावेत. यानंतर आपल्या आसपास काय चालले आहे, आपण कुठे आहोत, आपल्या आसपास चाललेले आवाज, मनातील विचार या कशाच्याही मागे न धावता त्रयस्थ भावनेने त्याकडे फक्त पाहात बसून राहणे म्हणजे झाझेन ध्यानपद्धती.
कुंडलिनी
कुंडलिनी ही वेदांतामधीलच आणखी एक ध्यानपद्धती आहे. मानवामध्ये आधीपासूनच असणारी अनंत शक्ती जागृत करणे हे कुंडलिनी ध्यानपद्धतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या मनातील स्वतःबद्दलचे संकुचित विचार काढून टाकून स्वतःच्या अमर्याद शक्तीशी ओळख करून देण्यासाठी कुंडलिनी ध्यानपद्धती प्रगत करण्यात आली. कुंडलिनी ध्यानपद्धतीने ध्यान करताना प्रथम श्वासावर लक्ष केंद्रित करावे व त्यानंतर हळूहळू शरीरावरील सर्व ऊर्जाकेंद्रांवर लक्ष केंद्रित करावे. पण ही ध्यानपद्धती योग्य मार्गदर्शनाखालीच करावी. अन्यथा याचे दुष्परिणाम होतात.
क्वी गॉंग
क्वी गॉंग चिनी ध्यानपद्धती आहे. या ध्यानपद्धतीनुसार श्वासाचा वापर करून ऊर्जा शरीराच्या सर्व ऊर्जाकेंद्रांमध्ये भरली जाते. यादरम्यान संपूर्ण लक्ष ऊर्जाकेंद्रे व श्वास यांवर केंद्रित केले जाते. या ऊर्जाकेंद्रांमध्येही बेंबीच्या खालील ऊर्जाकेंद्र, छातीच्या मधोमध असलेले ऊर्जाकेंद्र व दोन्ही भिवयांच्या मध्ये असलेले ऊर्जाकेंद्र इत्यादींवर लक्ष केंद्रित केले जाते. यासोबत श्वास घेत राहिल्यास आपले लक्ष जाईल त्याप्रमाणे आपली ऊर्जा शरीराच्या त्या त्या भागात फिरते. क्वी गॉंग ही पद्धती ऊर्जेचे विकेंद्रीकरण वितरण या गोष्टींवर भर देते.