
मधुमेहाविषयी बोलू काही…
Let’s talk about diabetes …
June 22nd, 9:16amJune 22nd, 9:16am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
मधुमेह… सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्यांमधील प्रमुख घटक असून, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेह हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा एक प्रदीर्घ आजार आहे.
यावर फक्त नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यात रक्तातील दीर्घकालीन वाढलेल्यासाखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतात. मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व, वंध्यत्व, सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, पायात रक्तपुरवठा न होणे, जखमेत संसर्ग, जखमा बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे, पाय सडणे, असा त्रास यामध्ये होतो.
मधुमेहाची लक्षणे
अनेक व्यक्तींमध्ये मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, तर काहींना खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, भूक जास्त लागणे, वजन घटणे आणि अशक्तपणा जाणवणे, अशा तक्रारी असतात. निरनिराळ्या अवयवांचा जंतुसंसर्ग उदा. त्वचा (पुरळ, गळवे, खाज), मूत्रमार्ग (लघवीला जळजळ / आग, लघवीच्या जागी खाज येणे, जागा लाल होणे), सायनसचे विकार व क्षयरोग जाणवू लागतात.
मधुमेहाच्या परिणामांची लक्षणे
अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका, कमजोर नजर, अंधत्व, वंध्यत्व, मुत्रपिंड निकामी झाल्यामुळे होणारी विविध लक्षणे आहेत. महिलांबाबत गर्भपात, अर्भकाचा गर्भाशयातच मृत्यू, मुलांमधे विकृती यांनी मधुमेह अस्तित्व दाखवतो.
मधुमेहाचे निदान
उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवरून मधुमेहाचे निदान होते. रक्तातील साखर तपासण्यासाठी व्यक्तीने किमान आठ तासांपूर्वी अन्न ग्रहण केलेले असावे. रक्तातील साखरेचे सामान्य प्रमाण 80 ते 100 मिलिग्रॅम एवढे असते. उपाशीपोटी साखर 126 मिलिग्रॅमपेक्षा जास्त असेल, तर मधुमेह झाला आहे, असे खात्रीलायकपणे म्हणता येते. रक्तातील सामान्य साखर 200 मिलिग्रॅमपेक्षा जास्त आणि मधुमेहाची लक्षणे असतील, तरीही मधुमेहाचे निदान होते. रक्तातील साखर जेवणानंतर दोन तासांनी 150 मिलिग्रॅमहून अधिक असेल, तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. रक्तातील ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन 6.5 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर मधुमेह असतो.
ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन काय आहे?
आपल्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये
हिमोग्लोबिन असते. त्याचा संयोग रक्तातील साखरेबरोबर होऊन ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन तयार होते. तांबड्या पेशीचे आयुष्य तीन महिने असते. त्यामुळे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन मागील तीन महिन्यांची साखरेची मात्रा दाखविते. या टेस्टने मागील तीन महिन्यांतील साखरेचे नियंत्रण कसे आहे, ते कळते. ही तपासणी कोणत्याही वेळी केली जाऊ शकते.
जीटीटी (ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट)
मधुमेहाचे निदान करण्याची ही एक विश्वासार्ह चाचणी आहे. ती उपाशीपोटी करावयाची आहे. ग्लुकोमीटर हे ग्लुकोजची रक्तातील साखर त्वरित मोजण्याचे छोटे सुटसुटीत यंत्र आहे. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी गरजेनुसार कधीही मोजता येते.
मधुमेहातील इतर तपासण्या
बॉडी मास इंडेक्स, पोटाचा घेर, रक्तदाब, त्वचा, पायच्या संवेदना, थायरॉइड ग्रंथीची तपासणी, डोळ्यांचा पडदा, रक्तातील साखर नियंत्रणात असेल, तर दर तीन महिन्यांनी रक्तातील साखर उपाशीपोटी आणि जेवणानंतर तपासावी, रक्तातील चरबी ट्रायग्लिसेरॉइडची तपासणी महत्त्वाची आहे. किडनी फंक्शन टेस्ट
किडनीच्या प्रकृतीसाठी लघवीमधील मायक्रोअल्बुमिनची तपासणी, हृदयविकारासाठी ईसीजी, कलर डोप्लर, स्ट्रेस टेस्ट, दातांची तपासणी आणि गरजेनुसार इतर तपासण्या. या चाचण्या ठराविक कलांनातराने पुन्हा करणे गरजेचे असते.
उपचार
सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल, असे एकही औषध उपलब्ध नाही. तो आटोक्यात ठेवता येऊ शकतो. योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये वजन कमी करण्यानेसुद्धा मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.
मधुमेही व्यक्तीचा आहार काय असावा?
साखर, गूळ, मिठाई, चॉकलेट पूर्ण बंद करावे.
फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, शिळे अन्नपदार्थ टाळावे.
तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ बंद करावे. दूध, साय, लोणी, नारळ, अंडी, पामतेल, शुद्ध तूपही यांमुळे हृदयरोगालाही आमंत्रण मिळते.
प मोनो अनसॅचुरेटेड नावाची चरबी शेंगदाणा, मोहरी, तीळ यांपासून बनलेल्या तेलात आणि फिश ऑइल यामध्ये जास्त असते. यांचे सेवन फायदेशीर असते. जवस, अक्रोड, बदाम, मासे, बीन्सही फायदेशीर असते.
ट्रान्सफॅटी ऍसिड्स घातक असतात. वनस्पती तूप, वारंवार तळलेले पदार्थ, चीज, पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी यात हे प्रमाण जास्त असते.
मैदा, ब्रेड, भात, बटाटा, रताळे बंद करावे.
आंबा, केळी, चिक्कू, द्राक्षं ही फळे बंद करावीत.
पालेभाज्या, कोबी, गवार, दोडके, कारले, शेवगा या भाज्या खाव्यात.
मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो हे जास्त खावे.
टरबूज, पपई, बोर, पेरू, जांभळे, सफरचंद, करवंदे इत्यादी फळे घ्यावीत. रोज एक फळ खाणे रोग्यासाठी चांगले असते.
तंतुमय पदार्थांचे सेवन करावे जसे रागी, बाजारी, मका, गहू इत्यादी.
द्रव पदार्थ उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी घ्यावेत.
मधुमेहाच्या रुग्णाने उपवास टाळावेत. रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्धवस्था येण्याची शक्यता असते. प्रवास करतानाही जेवणाच्या वेळा पाळाव्यात.
व्यायाम
मधुमेहींसाठी व्यायाम हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. व्यायामामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. अशा रुग्णांनी मध्यम प्रतीचा व्यायाम करावा. रोज 20 मिनिटे मध्यम किंवा तीव्र गतीने चालण्याचा व्यायाम हा सर्वांत उत्तम व्यायाम आहे. व्यायामापूर्वी 10 मिनिटे वार्मअप होणे गरजेचे आहे.
योगासने, प्राणायाम, ध्यान यांचाही शरीरावर चांगला परिणाम होतो. मधुमेही व्यक्तींनी डॉक्टरच्या सल्ल्याने व्यायाम करावा. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगसाधना, ध्यान, व्यसनमुक्त जीवन, योग्य औषधोपचार आणि मधुमेह शिक्षण याद्वारे या आजारावर मात करता येऊ शकते.