पुणे – भारतातील उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील 11 टक्क्यांहून अधिक प्रौढ व्यक्ती या मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा एक चयापचय यंत्रणेशी निगडित दुर्धर आजार आहे, जो इन्सुलिनद्वारे ग्लुकोजला ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम करतो. यामुळे व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, जे मानवी हृदयासाठी अत्यंत धोकादायक आहे.
ताणतणाव आणि जीवनशैली यांची स्थिती अधिकाधिक बिकट होत चालल्याने मधुमेहाचा वाढणारा भार अनेक नव्या समस्यांना जन्म देत आहे. पूर्वी युवाप्रौढ वयोगटामधील व्यक्तींना हृदयाशी संबंधित दुखणी उद्भवण्याची समस्या लक्षणीयरित्या कमी होती, आता मात्र अधिकाधिक युवा व्यक्ती मधुमेहाचे शिकार बनत आहेत व त्यातून हृदयविकारग्रस्त लोकसंख्या गटही बदलत आहे.
ही गोष्ट काहींना काळजीची वाटू शकते, पण मधुमेह असलेल्या काही व्यक्तींच्या बाबतीत हृदयाची समस्या उद्भवण्याची शक्यता ही आधी हार्टऍटॅक येऊन गेलेल्या व्यक्तींइतकीच असते. मधुमेहाच्या रुग्णांना हार्टऍटॅक येण्याची शक्यताही दोन ते तीन पट अधिक असते.
मधुमेहग्रस्त रुग्णांमधील एकूण मृत्यूंपैकी 2/3 मृत्यू हे कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांमुळे होतात.
याचे कारण मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते व त्यामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाला नियंत्रित करणाऱ्या मज्जारज्जूंना हानी पोहोचू शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब, एलडीएलच्या पातळीत मोठी वाढ, ट्रायग्लिसराइड्सचे वाढलेले प्रमाण अशाप्रकारच्या हृदयविकाराचा धोका वाढविणाऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
मधुमेह व लठ्ठपणासारख्या इतर धोकादायक समस्या एकत्रितपणे असल्यास हृदयाच्या संरचनेत काही बदल घडून येऊ शकतात. या बदलांमुळे रुग्णांमध्ये कोरोनरी आर्टरी डिजिज, हार्ट फेल्युअर आणि कार्डिओमायोपथी यांसारखे आजार विकसित होऊ शकतात.
भारत हा मधुमेही तसेच हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेला प्रमुख देश आहे.
या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये केव्हाही, आहे त्याहून प्रचंड वाढ होऊ शकते. मात्र, आपण स्वत:ला योग्य माहितीच्या मदतीने सुसज्ज केले तर कोणत्याही आजाराचा प्रतिबंध करता येतो. मधुमेहाच्या बाबतीत प्रतिबंध आणि लक्षणांचे व्यवस्थापन हे त्यावरील उत्तर आहे.
एक तर कोणत्याही प्रकारचा आजार दूर ठेवण्याच्या दृष्टीने आपले शरीर कार्यरत असावे याची खबरदारी घेण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीची सवय लावून घेतली पाहिजे. आपल्या जीवनशैलीमध्ये करता येतील असे काही उपयुक्त बदल पुढीलप्रमाणे:-
ताणतणावांचे व्यवस्थापन :
ताणतणावांचे प्रमाण वाढले की त्यातून उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते, जी मानवी हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. योगासने, व्यायाम, समुपदेशन, ध्यानधारणा, गटचर्चा, समाजात मिळूनमिसळून राहणे, वर्तणुकीतील सुधारणा यांसारखे ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठीचे उपाय म्हणजे हृदयरोगाच्या रुग्णाचे स्वास्थ जपण्यासाठीची गुरुकिल्ली आहे.
धूम्रपान टाळा :
धूम्रपानामुळे मानवी हृदयासाठी सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होतात, धूम्रपानाची सवय सोडून दिणे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.
आरोग्यपूर्ण संतुलित आहार :
आरोग्यपूर्ण आहारामुळे शरीरातील पोषक घटकांचे प्रमाण शरीराच्या गरजेनुसार नियंत्रणात ठेवले जाते व त्यामळे हृदयदोषासह इतर गुंतागुंतींना प्रतिबंध होतो. फायबर्स, प्रथिनांची रेलचेल असलेले पदार्थ खाणे, कॅलरींचे प्रमाण कमीत-कमी ठेवणे, नियमितपणे व्यायाम करणे,
साखरेच्या पातळीवर देखरेख ठेवणे यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मधुमेह ही एक अशी वाढती समस्या आहे, जिचा ना अंत आहे ना इलाज आणि अशा स्थितीत आपले आरोग्य जपण्यासाठी आपण हुशारीने वागले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला फारशा गुंतागुंतीशिवाय चांगली जीवनशैली सांभाळण्यास मदत होऊ शकेल.