भूल देणं हा कुठल्याही शस्त्रक्रियेआधीचा अविभाज्य भाग असतो. आता वाचताना नवल वाटतं, की सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीपर्यंत युरोपात शस्त्रक्रिया व्हायच्या त्या भूल दिल्याशिवाय. म्हणजे रुग्णांना किती वेदना सहन कराव्या लागत असतील त्याची कल्पनासुद्धा करणं कठीण.
ख्रिस्तपूर्व काळात रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी सुमेरियन, भारतीय आणि चिनी डॉक्टर्स शस्त्रक्रियेआधी अफू, चरस, गांजा किंवा इतर काही वनस्पतींच्या अर्काचा उपयोग करत होते. कधी कधी दारू पाजून रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी घेत असत, जेणेकरून रुग्णांना झोप येई आणि वेदनांची जाणीव कमी होई. सुश्रुतसंहितेतही अफू आणि दारूचे उल्लेख आहेत. पण वेदना कमी करणं आणि भूल देणं यात फरक आहे. तसाच झोप आणि भूल यात फरक आहे. भूल देतात तेव्हा वेदनाच काय, स्पर्शाची जाणीवच संपते काही काळासाठी. त्याचप्रमाणे दारू किंवा इतर वनस्पतींच्या अर्कामुळे येणारी झोप हलकी किंवा सावध झोप असते तर भूल देताना येणारी झोप अधिक गाढ झोप असते. त्या अर्थाने भूल देण्यासाठी कुठलंही औषध वापरात नव्हतं ख्रिस्तपूर्व काळात सुद्धा. इथर आणि नायट्रस ऑक्साइड (हास्यवायू) ही भूल देण्यासाठी वापरलेली पहिली औषधं होती.
इथर हे संयुग रसायनशास्त्रज्ञांनी तेराव्या शतकातच तयार केलं होतं. इथरच्या गुणधर्मांचा अभ्यास करून या संयुगामुळे झोप येते आणि वेदनाही कमी होतात असं तेराव्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध झालं खरं पण शस्त्रक्रियेसाठी इथरचा वापर करण्याचा विचारही डॉक्टरांनी पुढची साडेचारशे वर्षे केला नाही. इथरचा काय किंवा हास्यवायूचा काय, वैद्यकीय कारणांसाठी उपयोग व्हायला पन्नास साठ वर्षे जावी लागली. भूल देण्याची गरजच शल्यचिकित्सकांना वाटत नव्हती.
अठराव्या शतकाचा उत्तरार्ध गाजला तो निरनिराळ्या वायूंच्या शोधामुळे. ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड आणि नायट्रस ऑक्साइड या आणि इतर काही वायूंचा शोध या सुमारास लागला. त्यापैकी ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साइड या वायूंच्या शोधाचं श्रेय जातं जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाला. इतके वायू शोधले गेले तेव्हा त्यांच्या वैद्यकीय वापराची शक्यता तपासून पाहण्यासाठी न्यूमॅटिक इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेत प्रयोग करून पाहण्यासाठी हम्फ्रे डेव्ही या तरुण शास्त्रज्ञाची नेमणूक झाली. 1799 साली प्रसिद्ध केलेल्या अहवालात डेव्हीने नायट्रस ऑक्साइड या वायूच्या वेदनाशामक आणि उत्तेजित करणाऱ्या गुणधर्माचा उल्लेख केलाय.
हा वायू हुंगल्यावर त्या माणसाला खूप हसू लोटतं आणि एक सुखद अनुभूती मिळते अशी नोंद डेव्हीनं केलीय. याच गुणधर्मामुळे नायट्रस ऑक्साइड या वायूला डेव्हीने हास्यवायू असं नाव दिलं. आपल्याच कोषात राहणारी माणसेही हास्यवायूमुळे अतिशय उत्तेजित होत असत. शिवाय वेदनाशामक गुणांमुळे या वायूचा वापर शस्त्रक्रियांमध्ये होऊ शकतो अशीही नोंद डेव्हीनं केली. पण परत इतिहासाची पुनरावृत्ती झाली. रसायनशास्त्रज्ञ डेव्हीचं म्हणणं कुणीच वैद्यकीय व्यावसायिकाने मनावर घेतलं नाही. हास्यवायूच्या माणसाला उत्तेजित करण्याच्या गुणधर्मामुळे पार्ट्यांमध्ये मात्र त्याचा वापर अंमली पदार्थाप्रमाणे होऊ लागला.
खुद्द डेव्हीलाही हास्यवायूची चटक लागली होती. हास्यवायूला नशा आणणाऱ्या पदार्थाचं स्वरूप प्राप्त झालं तेव्हा डेव्हीचा साहाय्यक होता मायकेल फॅरॅडे. फॅरॅडेनं मग हास्यवायूचा नाद सोडला आणि इथरवर लक्ष केंद्रित केलं. 1818 मध्ये फॅराडेनं इथरवर प्रयोग करून, परत एकदा इथरचे वेदनाशामक आणि गुंगी आणणारे गुणधर्म सिद्ध केले. पण त्या प्रयोगांमध्ये सहभागी झालेल्या एका माणसाची गुंगी उतरण्यासाठी जवळ जवळ 24 तास लागले. त्यामुळे सगळेच घाबरले आणि परत इथरचा वापर शस्त्रक्रियांमध्ये फार झाला नाही. हास्यवायूच्या उत्तेजित करण्याच्या गुणधर्माचा वापर मात्र पार्ट्यांखेरीज इतर प्रकारेसुद्धा होत असे. म्हणजे काय तर एखाद्या माणसाला हास्यवायू हुंगायला लावायचा आणि मग त्याला रस्त्यावर सोडून द्यायचं.
तो उत्तेजित होऊन इकडेतिकडे सैरावैरा पळू लागला की जणू डोंबारी खेळ करत आहे अशा प्रकारे बघे गर्दी करत. अमेरिकेतील अशाच एका खेळाच्या दरम्यान एक माणूस हास्यवायू हुंगल्यामुळे उत्तेजित होऊन इकडे तिकडे धावत होता. या धडपडीत त्याच्या पायाचं हाड मोडलं तरीही हास्यवायूच्या प्रभावामुळे त्याला वेदना झाल्या नाहीत. बघ्यांमध्ये वेल्स नावाचा एक दंतवैद्य होता. दात काढताना रुग्णाला होणाऱ्या वेदना त्याला नित्य परिचयाच्या होत्या. त्यामुळेच हास्यवायूच्या वेदनाशामक गुणधर्माचा वापर दात काढताना करण्याची कल्पना त्याला सुचली. हे वर्ष होतं 1844.
दुसऱ्या दिवशी वेल्सने हास्यवायूचा वापर स्वतःचाच दात काढण्यासाठी करायचं ठरवलं. आदल्या दिवशी खेळ दाखवणाऱ्या कोल्टनला त्याने बोलावून घेतलं. कोल्टननं वेल्सला हास्यवायू हुंगायला दिला आणि वेल्सच्या एका दंतवैद्य मित्राने वेल्सचा दात काढला तेव्हा त्याला वेदना जाणवल्या नाहीत. या यशामुळे उत्साहित होऊन वेल्सने हास्यवायू कसा तयार करायचा आणि कसा वापरायचा हे कोल्टनकडून शिकून घेतलं आणि त्याचा वापर आपल्या रुग्णांचे दात काढतेवेळी सुरू केला. त्याकाळी दात काढताना अगदी असह्य वेदना व्हायच्या. वेल्सची वेदनारहित पद्धतीने दात काढायची कीर्ती मॉर्टन या वेल्सच्या विद्यार्थ्याच्या कानावर पडली. मॉर्टननं मग वेल्सला बोस्टनला बोलावलं आणि वेदनारहित पद्धतीनं दात काढण्याचं प्रात्यक्षिक ठेवलं. दुर्दैवाने ते अयशस्वी ठरलं आणि वेल्सनं या सगळ्यातून अंग काढून घेतलं.
मॉंर्टन मात्र या अपयशामुळे खचला नाही. वेदनारहित पद्धतीनं दात काढण्याचं संशोधन त्याने सुरूच ठेवलं. हास्यवायूच्या अपयशी प्रयोगानंतर त्याने आपला मोर्चा परत इथरकडे वळवला. इथरचा वापर आधी प्राण्यांवर आणि नंतर माणसांवर केला आणि वेदनारहित पद्धतीनं दात काढण्याचं प्रात्यक्षिक त्याने इथरचा वापर करून दाखवलं. पाठोपाठ 1846 मध्ये त्याने इतर शल्यचिकित्सकाच्या सहाय्याने इथरचा वापर ट्यूमरच्या शस्त्रक्रियेमध्ये यशस्वीरीत्या करून दाखवला. तरीही दंतवैद्य आणि शल्यचिकित्सक भूल देण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. इथरचा वापर करण्यापूर्वी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण खूप आरडाओरडा करीत, हात पाय झाडत. भूल दिल्यानंतर छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया शांततेने होऊ लागल्या, आजूबाजूचा कोलाहल संपून गेला आणि नेमकी हीच गोष्ट शल्यचिकित्सकांच्या सवयीची नव्हती!
ईथर आणि नायट्रस ऑक्साईड या भुलीच्या औषधांचं महत्व वैद्यक व्यावसायिकांना पटलं. त्यानंतर मात्र या औषधांच्या वापरातले बारकावे समजू लागले. जास्त सुरक्षित औषधं शोधली गेली, एकाहून अधिक औषधं एकत्र वापरण्याची पद्धत रुळली. पुढे अधिक गुंतागुंतीची रचना असणारी औषधं भूल देण्यासाठी वापरात आली आणि ती शस्त्रक्रियेचा अविभाज्य भाग बनून गेली. याच दोन्ही औषधांच्या पायावर आजच्या भूलशास्त्राचा डोलारा उभा आहे. याशिवाय मानवनिर्मित औषधांच्या वापराचं पर्व सुरु झालं ते ईथर आणि हास्यवायूच्या वापरामुळे. त्यामुळे आज फारशा वापरल्या न जाणाऱ्या या दोन औषधांची आठवण, पूर्वसूरींना नमन म्हणून.
The post भूल देऊन शस्त्रक्रिया शोधायचे विविध टप्पे appeared first on Dainik Prabhat.