बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा धोका
April 25th, 8:13amApril 25th, 8:13am
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
पुणे (अंजली खमितकर) – हृदय, मेंदूनंतर शरीरातील सगळ्यात महत्त्वाचे काम यकृताचे आहे. हे यकृत शरीरातील 700 हून अधिक वेगवेगळी कामे करते. थोडक्यात शरीराचे प्रधानपद या यकृताकडे असते. त्यामुळे यकृताची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. “जागतिक यकृत दिन’ साजरा करताना “फॅटी लिव्हर’ या यकृताला जडलेल्या रोगाचा उहापोह करण्यात आला. मात्र, या वाढत्या आणि सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेल्या रोगप्रकाराचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
यकृताच्या आजारासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात पण त्यातील सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणारे कारण म्हणजे “फॅटी लिव्हर’, म्हणजे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे. यामुळे किडनीला इजा पोहोचू शकते. गेल्या काही दशकांमध्ये जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयींमुळे “फॅटी लिव्हर’च्या समस्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
अल्कोहोलमुळे यकृतामध्ये चरबी साठणे हा “अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर’ या आजाराचा एक भाग आहे, ज्यातून यकृताची आणखी हानी होऊ शकते. अल्कोहोलचे फारसे सेवन केले जात नसूनही यकृताच्या उतींमध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या स्थितीला “नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर’ असे म्हणतात. मानवी शरीर अल्कोहोलशी कशाप्रकारे जुळवून घेईल याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असू शकते. अल्कोहोलच्या चयापचयाच्या कार्यात यकृत हे प्रामुख्याने सहभागी असते व या प्रक्रियेमध्ये काही हानीकारक घटक निर्माण होतात आणि ज्या व्यक्तींमध्ये अल्कोहोलमुळे यकृताला होणाऱ्या इजेचा धोका निसर्गत: अधिक असतो त्यांच्या यकृताची यामुळे हानी होऊ शकते.
एकीकडे अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीराला मिळणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजमुळे यकृताच्या अंतर्भागात चरबी साठवली जाऊ लागते तर दुसरीकडे अल्कोहोल पचवण्याच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या विषद्रव्यांमुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह इजेच्या परिणामी चरबीच्या साठवणुकीचे प्रमाण वाढते आणि यकृताच्या पेशींना इजा पोहोचते. दुसऱ्या बाजूला नॉन-अल्कोहोलिक “फॅटी लिव्हर’ आजार हा प्रामुख्याने अतिरिक्त कॅलरींचे सेवन, व्यायामाचा अभाव आणि आधुनिक जीवनशैलीशी निगडित समस्यांमुळे उद्भवतात.
जेव्हा हा आजार “एनएएफएलडी’ किंवा नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर या प्रकारात मोडतो तेव्हा यकृतात साठलेल्या चरबीमुळे कदाचित कोणतीही हानी होत नाही, तर काही व्यक्तींच्या बाबतीत त्यामुळे यकृताला इजा पोहोचू शकते किंवा त्याला सूज येऊ शकते. याला “एनएएसएच’ असे म्हणतात आणि हा नॉन-अल्कोहॉलिक स्टॅटो-हेपटायटिसचा एक प्रकार आहे. फॅटी लिव्हर असलेल्या जवळ-जवळ 20 टक्के रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येते.
ही स्थिती बळावत गेल्यास त्याचा यकृताच्या पेशींवर थेट हल्ला होतो, ज्यामुळे या इंद्रियाला कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत हानी होण्याचा धोका वाढतो. यकृताच्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्याच्या कामी आपल्या जीवनशैलीविषयक निवडी आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा थेट संबंध असतो. बैठी जीवनशैली असणाऱ्या आणि कमीत कमी शारीरिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींना फॅटी लिव्हर आजार होण्याचा धोका अधिक असतो, असे दिसून आले आहे. प्रक्रिया केलेले, कर्बोदकांचे उच्च प्रमाण असलेले खाद्यपदार्थ आणि अवेळी कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करणे या गोष्टी या समस्येला कारणीभूत ठरताना दिसतात.
ही समस्या असलेल्या रुग्णांची वाढती संख्या ही अत्यंत धक्कादायक आहे, कारण आता तरुणांमध्येही तिचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे.
भारतामध्ये दरवर्षी 1 लाखांहून अधिक लोकांचा “फॅटी लिव्हर’ आजारामुळे मृत्यू होतो. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर त्याची लक्षणे ओळखणे अत्यंत कठीण असते ही गोष्ट अधिकच भयंकर आहे. यकृत हे एक मोठे इंद्रिय आहे, ज्याच्याकडे भरपूर राखीव क्षमता असते. त्यामुळे खूपच जास्त प्रमाणात हानी होईपर्यंत कोणतीही लक्षणे न दिसण्याची शक्यताच जास्त असते. वेळेत केलेली स्क्रिनिंग्ज आणि चाचण्यामुळे ही समस्या ओळखण्यास मदत होऊ शकते आणि केवळ योग्य चिकित्सात्मक निदानाच्या मदतीनेच ही समस्या सोडवण्यासाठी योग्य ती पावले उचलता येतात.
– डॉ. हर्षल राजेकर, सल्लागार हेपॅटोबिलरी आणि गॅस्ट्रो-सर्जन
हे उपाय करा…
वजन नियंत्रणात ठेवा
आहारामध्ये ताज्या आणि संपूर्ण पोषण देणाऱ्या पदार्थांचा समावेश करा
यकृतामधील पाण्याचे प्रमाण जपण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे.
मद्यपान टाळा
नियमित शरीर तपासणी करा
औषधोपचारांचे काटेकोर पालन करा