नवी दिल्ली – बटर चिकन आणि दाल मखनी या खवय्यांच्या आवडत्या डिश आहेत. त्यांचा आस्वाद घेतल्याशिवाय बहुतेकांचे भोजन पूर्ण होत नाही. मात्र याच डिश राजधानी दिल्लीतील दोन हॉटेलमधील वादाचा मुद्दा ठरल्या आहेत. त्याचे कारण या दोन्ही डिशचा शोध आम्हीच लावल्याचा दावा या दोन्ही हॉटेल्सने केला असून आता हा वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
मोती महल आणि दरियागंज अशी दोन्ही रेस्टॉरंटची नावे आहेत आणि हे दोन्ही पदार्थ आमचेच असल्याचा दोघांचा दावा आहे. आपणच बटर चिकन आणि दाल मखनीचे शोधकर्ते असल्याचा दावा करत दरियागंज ग्राहकांची दिशाभूल करतो आहे असे म्हणत मोती महल कोर्टाची पायरी चढले आहे. पूर्वी आमचे दरियागंज भागात रेस्टॉरंट होते. त्यामुळेही ग्राहक संभ्रमीत होत आहेत असेही मोती महलचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पूर्वज कुंदनलाल गुजराल यांनीच या दोन्ही पदार्थांचा शोध लावला आणि संपूर्ण जगभर त्यांचा प्रसार केला.
तर दरियागंजच्या मालकांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पूर्वज कुंदनलाल जग्गी यांनीच सर्वप्रथम बटर चिकन आणि दाल मखनी ही संकल्पना आणली व ते पदार्थ तयार केले. मोती महलच्या मालकाच्या म्हणण्यानुसार कुंदनलाल गुजराल यांनी सगळ्यांत अगोदर तंदुरी चिकन बनवले, त्यानंतर बटर चिकन आणि नंतर दाल मखनी बनवले. भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर या पदार्थांची रेसीपी घेऊनच ते भारतात आले होते. त्यांच्या या दाव्याला दरियागंजने अद्याप उत्तर दिलेले नाही. मात्र त्यांच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार हे दावेच निराधार आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव नरूला यांच्यासमोर १६ जानेवारी रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी आले आहे. न्यायालयाने दोन्ही रेस्टॉरंटच्या मालकांना समन्स जारी केले असून एक महिन्यात त्यांच्याकडून लेखी उत्तर मागवले आहे. २९ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
The post बटर चिकन-दाल मखनीचा शोध कोणी लावला ? दोन हॉटेल्समध्ये सुरु झालेला वाद पोहचला दिल्ली उच्च न्यायालयात appeared first on Dainik Prabhat.