कोविड संक्रमणाच्या दोन वर्षाच्या काळात मोठ्यांबरोबर लहान मुलांनीदेखील कित्येक नवीन गोष्टी शिकून घेतल्या. शाळेत जाऊन मौज मजा करत शिक्षणाचा आनंद घेण्याऐवजी घरात बसूनच त्यांनी शाळेची दोन वर्ष पूर्ण केली. पालकांच्या आणि शाळेच्या शिस्त लावण्याच्या प्रयत्नात मुले काही ना काही शक्कल लढवत होतीच. त्यातूनच अभ्यासाला बसण्याच्या नवीन पद्धती मुलांनी शोधून काढल्या. पालकांना नको असले तरी शिक्षणाचा भाग म्हणून मोबाइल, लॅपटॉप, टॅब आणि कॉम्पुटर समोर बरेच तास बसणे गरजेचे भासू लागले.
याचाच परिणाम म्हणून की काय मुलांच्या शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा सर्वांगीण विकास पूर्वीच्या पद्धती पेक्षा अधिक वेगळ्या पद्धतीने होऊ लागला. त्या सगळ्याचे परिणाम आता संक्रमण काळ उलटून गेल्यावर आणि दैनिदिन आयुष्य जवळजवळ पूर्ववत झाल्यावर दिसून येताना आढळत आहेत. ज्याप्रमाणे संक्रमण काळात शरीराची हालचाल मर्यादित झाल्याने पाठीचा ताठ असणारा कणा वाकत जात असल्याचे अनेक मुलांच्या बाबतीत जाणवू लागले. फाइन मोटर स्किल्स म्हणजे हाताच्या बोटांच्या हालचाली कमी झाल्याने त्यांच्या हातून होत जाणाऱ्या लिखाणाचा स्पीड कमी होताना आढळतो आहे. पटांगणवरील मैदानी खेळांऐवजी बंद दरवाज्यामध्ये बैठे खेळ खेळावे लागल्याने इम्युनिटी कमी झालेली दिसून येत आहे. मुलांच्या खाण्या पिण्याच्या सवयी आणिवेळाही बदलत गेल्याने त्यांच्या पोटाच्या तक्रारी वाढल्याचे दिसू लागले आहे.
या सर्व परिस्थितीचा सरासार विचार करता,मुलांच्या पोश्चर वरदेखील परिणाम होताना निश्चितपणे जाणवतो आहे. आपल्या प्रत्येकाच्या पाठीच्या कण्यातून शरीराला अंतर्बाह्य संवेदनांचा पुरवठा होत असतो. यातील एखाद्या मणक्यावर चुकून जरी वेडा वाकडा जोर किंवा दाब पडला तर शरीराच्या त्या ठराविक भागात त्याचे दुष्परिणाम आणि लक्षणे दिसू लागतात.
सुरुवातीला लक्षणांचा जोर कमी असतो. मात्र दैनंदिन जीवनातील बसणे, उभे राहणे, चालणे आणि झोपणे या गोष्टी चुकीच्या पध्दतीमध्येझाल्याने तक्रारींचा जोर नक्कीच वाढतो. आपले शरीर आणि मन हे एकसंध आहे. एकाला त्रास झाला की दुसरा देखील दुष्परिणामाची लक्षणे दाखवू लागतो. शरीर जेव्हा चुकीच्या पद्धतीमध्ये असते तेव्हा मनाची चंचलता सुरू होते.
अशा वेळी मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, लक्षात न राहणे, आत्मविश्वास कमी होणे त्याच प्रमाणेक्रिएटीव्हिटी कमी होताना आढळते. तर काही मुलांच्या बाबतीतत्यांचा स्वभाव काहीसा घाबरट होणे या आणि अशा प्रकारच्या तत्सम तक्रारी हळूहळू सुरू होतात. म्हणूनच योग्य वेळी आणि योग्य वयातच त्यांच्या शरीराच्या पोश्चर वर लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. शेवटी गमतीने म्हणावे लागेल की, वाकलेला कणा असणाऱ्या माकडाचा ताठ कण्याचा माणूस झाला पण आता सतत पुढे वाकून काम करण्याच्या पद्धतीमुळे पुन्हा माणसाचा माकड व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.
The post फिटनेस : किशोरवयीन पोश्चर appeared first on Dainik Prabhat.