पुणे – जगात दर एक हजार लोकांमागे एक हायपर पॅराथायरॉइडिझमचा रुग्ण असतो. मात्र, दुर्दैवाने भारतात 25 टक्के रुग्णांमध्ये विकाराचे निदानच होत नाही. केवळ एक टक्का रुग्णांना उपचार मिळतात, तेही निदान वेळेवर न झाल्यामुळे उशिरानेच. हा विकार स्त्रियांमध्ये अधिक आढळतो.
सहसा मानवी शरीरामध्ये चार पॅराथायरॉइड ग्रंथी असतात. त्या आकाराने लहान असतात आणि सर्व मानेमध्ये असतात. हायपर पॅराथायरॉइडिझम या विकारामध्ये या चार ग्रंथींपैकी एक किंवा अधिक ग्रंथी अतिरिक्त प्रमाणात पॅराथायरॉइड हार्मोन (पीटीएच)निर्माण करतात. या पीटीएच हार्मोनचे मुख्य काम म्हणजे हाडांमधील कॅल्शिअम बाहेर काढून हाडे मोकळी करणे. हे काम अपेक्षेप्रमाणे झाल्यास शरीरात कॅल्शिअमचा समतोल सहजपणे राखला जातो.
मात्र, पीटीएच अतिरिक्त झाल्यास हाडांतून अतिरिक्त प्रमाणात कॅल्शिअम बाहेर काढले जाते. यामुळे हाडे कमजोर व ठिसूळ होत जातात. त्याचप्रमाणे रक्तात कॅल्शिअम जास्त झाल्यास ते मूत्रिपडांमध्ये जाते आणि मूतखडयासारखे विकार होतात किंवा हे अतिरिक्त कॅल्शिअम स्वादुपिडांत जाऊन पॅंक्रियाएटिससारखे स्वादुपिडांचे विकार होतात.
अतिरिक्त कॅल्शिअम जठरात शिरल्यास आम्ल तयार होते आणि खूप मोठया प्रमाणात पित्त होऊ शकते. हे लक्षण रुग्णांमध्ये मोठया प्रमाणात दिसून येते. पित्तामुळे मनोविकारही होण्याची शक्यता असते. म्हणूनच मूतखडयाचे निदान झालेल्या रुग्णांनी, त्याचबरोबर रक्तातील कॅल्शिअम आणि पीटीएचही तपासून घेणे आवश्यक आहे. यामुळे मूतखडा तयार होण्याचे नेमके निदान होऊ शकेल आणि त्या दृष्टीने उपचारही करता येतील.
खात्रीलायक निदान झाल्याशिवाय शस्त्रक्रिया करता येत नाही. चारपैकी केवळ एकच ग्रंथी सुजलेली किंवा आकाराने मोठी झालेली असेल, तर किमान शस्त्रकर्माने ती काढून टाकता येते. मात्र, एकाहून अधिक ग्रंथी अतिरिक्त स्रवत असल्यास चारही ग्रंथी तपासून बघणे आवश्यक असते. डॉक्टर सर्व ग्रंथी तपासून कोणत्या काढायच्या तो निर्णय घेतात.
पॅराथायरॉइड शस्त्रक्रियेसाठी अत्यंत निष्णांत व तज्ज्ञ शल्यविशारदाची आवश्यकता असते. एण्डोक्राइन सर्जनच हे काम करू शकतात. कारण मुळात या तांदळाच्या दाण्याएवढया लहान असलेल्या ग्रंथी शोधून काढणे हेच आव्हानात्मक काम आहे.