
प्रसंगी विषही पचवणारे – मयूरासन
July 27th, 9:52amJuly 27th, 9:53am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
मयुरासन हे एक तोलात्मक आसन आहे. यामध्ये सर्व शरीर हे हातावर तोलले जाते. शरीराची अवस्था मोरासारखी होते.
-प्रथम गुडघ्यावर ओणवे व्हावे.
– दोन्ही गुडघ्यात अंतर ठेवावे
-तळहात व बोटे पायाच्या दिशेने पुढ वाकवून जमिनीवर टेकवावीत
– दोन्ही हात गुडघ्यांच्या मधील जागेत ठेवावेत.
– जमिनीवर पालथं झोपावे
– गुडघ्यात पाय दुमडून दोन्ही कोपरं जुळवून बेंबीपाशी येतील अशी ठेवावीत
-कोपरापासून पंजापर्यंतचे हात जमिनीवर ठेवावे.
– हाताचे पंजे पालथे असावेत
-आता पूर्ण शरीराचा भार कोपरांवर आणि हातांवर देऊन गुडघ्यापासून दोन्ही पाय हळूहळू वर उचलावेत आणि मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे मागे पसरावे
– मस्तक सरळ ठेवावे
– कोपरं बेंबीपाशीच रुतलेली असावीत
– आता पाय ताठ लंबरेषेत ठेवावेत
– मग जमिनीला समांतर शरीर वर उचलावे
जर दोन्ही पाय एकाच वेळेस उचलणे अवघड वाटत असेल तर एकेक पाय उचलावा. शरीराचा पुढचा भाग डोक्यापासून थोडा खाली वाकवावा.डोके, पाठ, नितंब, मांड्या, पाय, चवडे, सारेच सरळ व जमिनीला समांतर राहाते. आसन सोडताना प्रथम पाय जमिनीवर टेकवावेत. पाठीवर झोपून विश्रांती घ्यावी.
हे आसन कठीण असल्यामुळे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावे. अगदी तरुण वयापर्यंत म्हणजे 24-25 वयापर्यंतच्या लोकांनीच हे आसन करावे. शरीर वर उचलताना श्वास आत रोखावा आसन पूर्ण झाल्यावर श्वास बाहेर सोडावा. स्थूल व्यक्ती हे आसन पटकन करू शकत नाहीत. पाय लांब करताना शरीराला हिसका बसण्याची शक्यता असते. ताकदवान व्यक्ती मात्र हे आसन पटकन करू शकतात. पाच ते वीस सेकंदांपर्यंत हे आसन टिकविता येते. अत्यंत लवचिक शरीर आणि भरपूर सराव असणाऱ्यांनीच हे आसन करणं योग्य ठरेल.
या आसनामुळे दृष्टिदोष दूर होतात. या आसनामुळे डोकेदुखी कमी होते. केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं. दूरची किंवा जवळची दृष्टी सुधारण्याबरोबरच पोटशूळ, पोट फुगणं, पोटात गॅस धरणं, अपचन वगैरे पोटांच्या विकारावरही या आसनाचा उपयोग होतो. या आसनामुळे पचनसंस्था इतकी तंदुरुस्त होते की, प्रसंगी विषही पचवण्याची क्षमता पचनसंस्थेत येते, असे मानले जाते. या आसनामुळे पूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. पचनशक्ती सुधारते. वात, पित्त, कफ वाढल्यामुळे होणारे विकार या आसनाच्या सरावाने बरे होतात. डोके, मान, पाठ, हात, पाय, मांड्या, चौडे यांना व्यायाम मिळतो. मधुमेही आणि मूळव्याध असणाऱ्यांनी हे आसन नेहमी करावे. लठ्ठपणावर हे आसन उपयुक्त आहे. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, रक्तशुद्धी होते आणि शरीर सुडौल बनते.
===============