
पुणे : करोनामुक्तांना फटाक्यांच्या प्रदूषणामुळे धोका
धुरामुळे त्रास होण्याची भीती : श्वसनयंत्रणा सांभाळण्याची गरज
November 4th, 9:18amNovember 4th, 9:18am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
पुणे – दिवाळी म्हटले की फटाके हे समीकरण आहेच: परंतु फटाक्यांच्या धुरामुळे फुफ्फुसाचे आरोग्य मात्र पूर्णपणे बिघडवते हे देखील तितकेच खरे आहे. त्यातून करोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचलेल्यांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी याविषयीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
फटाके वाजवताना श्वसनयंत्रणा सांभाळण्याची गरज आहे. हल्ली एकूणच प्रदूषण वाढले आहे. त्यात फटाक्यांच्या धुराने आवाजाने होणारे प्रदूषणाची भर पडते. या प्रदूषणामुळे श्वसनविकारांचा आलेख वाढत आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळे वायुप्रदूषण प्रचंड होते. घसा खवखवणे, डोळ्यात पाणी येणे कानात बधीरता येणे, अंगावर खाज येणे अशी लक्षणेदेखील फटाक्यांच्या धुरामुळे दिसतात.
कोविड फायब्रोसिसचे रुग्णांना धोका फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फरडाय ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रेस ऑक्साइडसह अन्य विषारी द्रव्य असतात. त्यामुळे सर्दी-खोकला, दमा, सीओपीडीचा धोका निर्माण होतो.
ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनाचा त्रास नव्हता. या दिवसांत रुग्णांची संख्या तीनपट अधिक असते. लहान मुलांची फुफुसे छोटी असल्याने त्यांना फटाक्यांचा धुराचा अधिक त्रास होतो. प्रदूषित हवेमुळे न्यूमोनिया आणि क्षयरोगाच्या प्रमाणात वाढ होत असून मधुमेहाच्या रुग्णांना याचा सर्वाधिक धोका असतो. सुतळी बॉम्ब, रॉकेट, सुरसुरीचा रस्सीसारखा प्रकार यामधून मोठ्या प्रमाणात धूर येतो. यामध्ये काळ्या रंगाची गोळी (ज्याला सापाची गोळी म्हटले जाते) पेटवल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर येतो. यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. आकाशात सोडलेले फटाके फुटल्यानंतर त्यातील सेंद्रिय संयुगे हवेत मिसळतात. ते प्राणघातक ठरू शकते. अस्थमाच्या रुग्णांनाच नव्हे, तर इतरांनाही यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
कोविड होऊन गेलेले रुग्ण, त्यातूनही ज्यांना
कोविड फायब्रोसिसचा त्रास झाला आहे, अशांना फटाक्यांच्या धुरामुळे फुफ्फुसाशी आणि श्वसनाशी संबंधित त्रास नक्कीच होऊ शकतो. म्हणूनच अशा व्यक्तींना धुरापासून दूर राहिले पाहिजे. एकूणच सीओपीडी आणि दम्याच्या रुग्णांनी फटाक्यांच्या धुरापासून स्वत:ला दूर ठेवावे.
– डॉ. नितीन अभ्यंकर, उरो रोग तज्ज्ञ.