पावसाळा चालू झाला आहे आणि संपूर्ण देशभरात पावसाची बरसात सुरू आहे. पावसाळ्यात इतर ऋतूंपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
खाण्या-पिण्याकडे थोडे देखील दुर्लक्ष झाले तरी अडचण निर्माण होऊ शकते. पावसात भिजण्याचा आनंद घ्या, पण थोड्या वेळासाठीच. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य दिवसभर पावसात भिजत राहणार नाही, याची काळजी घ्या.
काम नसेल तर घराबाहेर पडू नका. पावसात बाहेर पडायचे असल्यास रेनकोट घालून किंवा छत्री घेऊनच बाहेर पडा. पावसाळ्यात तहान लागत नाही म्हणून अनेक जण पाणी कमी पितात. परंतु शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याकडे लक्ष द्या.
यासाठी थोड्या थोड्या अंतराने पाणी प्यावे. पावसाळ्यात लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलांना पावसात भिजल्यानंतर सर्दी ताप असे वरचे वर लहानसहान आजार होतात याकडे दुर्लक्ष करू नका. मुले पावसात भिजण्याचा हट्ट करीत असतील तर संपूर्ण अंगावर रेनकोट घालूनच त्यांना घराबाहेर पाठवा. घरातील वृद्ध मंडळींचीही पावसाळ्यात खास काळजी घ्यावी लागते.