
पावसाळ्यातील फूड पॉइजनिंग टाळण्यासाठी ‘हे’ खाऊ नका!
August 3rd, 5:56pmAugust 3rd, 5:56pm
प्रभात वृत्तसेवाlatest-news
आपण दिवसभरात सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक आरोग्यदायी पदार्थ खातो. पण कधीकधी अशा अनेक गोष्टी आपल्या आहारात येतात, ज्यामुळे आपल्याला विषबाधा होऊ शकते. विशेषतः पावसाळ्यात हा प्रकार अनेकदा होतो. त्यामुळे आपण ऋतूनुसार आहार घेतला पाहिजे, अन्यथा विशिष्ट खाद्यपदार्थ आपल्याला हानी पोहोचवू शकतात. पावसाळ्यात आपली पचनसंस्था कमकुवत होते आणि अनेक वेळा पदार्थ नीट पचत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात आपण कोणते पदार्थ खाणे कटाक्षाने टाळले पाहिजेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.
– कच्ची अंडी खाणे
अंड्याचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते, परंतु पावसाळ्यात कच्च्या अंड्यांचे सेवन केल्याने काही वेळा अन्न विषबाधा होते. जेव्हा आपण कच्च्या अंड्यांचे सेवन करतो, तेव्हा साल्मोनेला बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करू शकते, ज्यामुळे आपल्याला समस्या येऊ शकतात. त्यामुळे अंडी व्यवस्थित शिजवल्यानंतरच खा.
– अर्धे शिजवलेले मांस
अर्धवट अथवा कच्च्या शिजवलेल्या मांसाचे सेवन कोणत्याही हंगामात करू नये, परंतु विशेषतः पावसाळ्यात अर्ध्या कच्च्या चिकनचे सेवन केल्याने अन्न विषबाधा होऊ शकते. म्हणून, मांसामधील जीवाणू पूर्णपणे नष्ट होईपर्यंत शिजवा. यासाठी आपल्याला योग्य तापमानावर मांस शिजवणे आवश्यक आहे.
– अनपेश्चराइज्ड डेअरी उत्पादने वापरणे
कच्च्या दुधाचे सेवन या हंगामात धोकादायक ठरू शकते, कारण ते शरीरात बॅक्टेरिया निर्माण करू शकते, जे तुम्हाला खूप आजारी पाडण्यासाठी पुरेसे आहे. जे लोक जिममध्ये जातात, ते कच्चे दूध, चीज किंवा न शिजवलेले दुग्धजन्य पदार्थ जास्त वापरतात. या हंगामात आपण अनपेश्चराइज्ड डेअरी पदार्थांचे सेवन टाळावे.
– भाज्या आणि फळे न धुता खाणे
भाज्या आणि फळांमध्ये साल्मोनेला, ई.कोलाई आणि लिस्टेरियासह इतर अनेक जीवाणू असू शकतात आणि हे विशेषतः पावसाळ्यात सामान्य असतात. हे विशेषतः हिरव्या भाज्या, कोबी, पालक आणि टोमॅटो सारख्या भाज्यांमध्ये असू शकते. म्हणूनच फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.