
पालक व्यस्त असणे मारक
May 30th, 2:14pmMay 30th, 2:14pm
प्रभात वृत्तसेवाlatest-news
लहान मुलांच्या निकोप विकासासाठी काय करावे, याबाबत सल्लागार म्हणून काम करत असलेल्या सूनृता सहस्रबुद्धे यांचा हा विशेष लेख षरलशलेज्ञ.लो/ींहशषळीीींहीशश.र्िीपश येथे प्रसिद्ध झाला आहे. करोनाच्या काळातील लहान मुलांचे भावविश्व समजून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल…
अनिश्चितता आणि भीती या आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत. रोजचा दिवस काय घेऊन येईल, अशी चिंता जेव्हा आपल्याला वाटत असते, तेव्हा ती आपल्या मुलांपर्यंतही झिरपत असते. आपल्या घरातलं, ओळखीचं कोणीतरी आजारी पडणं, कोणीतरी कोव्हीडमुळे मरण पावणं, हॉस्पिटलमध्ये भरती होतानाचे ताण, औषधं मिळवण्यासाठीची धावपळ अशा अनेक प्रसंगांची, आपली मुलं साक्षीदार आहेत.
त्यांनी या धावपळीत प्रत्यक्ष भाग घेतला नसला, तरी आपले फोन, घरातल्या चर्चा, मोठ्यांच्या चेहऱ्यावरच्या आठ्या यामधून मुलं हे प्रसंग जगत आहेत. अशा वेळेला, या सगळ्याचा अर्थ लावण्यासाठी आपण मुलांना कशी मदत करायला हवी, हे इथे बघूया.
आजूबाजूला जे सुरू आहे, त्याबद्दल मुलाच्या वयानुसार मुलाशी नेहमीच बोलायला हवं. बोलताना दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात – माहिती सोपी करून सांगायची आहे आणि “यातून नक्की वाट निघणार आहे’ या आशावादाकडे आपल्याला मुलांना न्यायचं आहे. हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणं घेऊ…
समजा, शेजारच्या आजी ऍडमिट झाल्या, तर त्याबद्दल असं काहीसं बोलता येईल : “शेजारच्या आजीला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. तिला श्वास घ्यायला जरा त्रास होत होता. मग डॉक्टरमावशी म्हणाली की, आमच्याकडे एक यंत्र आहे, ते आज्जीला मदत करेल श्वास घ्यायला. मग आज्जीला बरं वाटेल. तर तुम्ही इकडेच घेऊन येता का तिला? म्हणून मग प्रवीणमामा आजीला घेऊन हॉस्पिटलला गेला आहे. आता तिथे डॉक्टरमावशी तिला बरं व्हायला सगळी मदत करणार आहे!’
“अमका-तमका कोव्हीड टेस्ट करायला गेलाय’, “त्याची टेस्ट निगेटिव्ह आली’ अशा गोष्टी मुलांच्या कानावर पडतायत. हा प्रकार नेमका काय आहे, हे मुलांना सोपं करून सांगता येईल.
आपण असं म्हणू शकू : “तो करोना व्हायरस इतका छोटा असतो, की तो आपल्याला साध्या डोळ्याला दिसूच शकत नाही. एका यंत्रातून तो आपल्या घशात किंवा नाकात लपून बसला आहे का ते बघता येतं. काका-काकू तेच बघायला गेलेत. त्यांच्या घशात कोणी लपून बसलं नाहीये, असं कळलं की, ते लगेच तुझ्याशी खेळायला येणार!’
आपण बातम्या ऐकतो-वाचतो आहोत. त्याबद्दल एकमेकांशी बोलतो आहोत. समजा, “टीव्हीवर आत्ता ते काका काय म्हणले?’ असं मुलानी विचारलं तर आपण म्हणू शकू : “आजारी पडल्यावर काही जणांना घरी राहून औषध घ्यायला सांगितलंय आणि काही जणांना औषध घ्यायला हॉस्पिटलला जावं लागतंय. या काकांना त्यांच्या नातेवाईकाला घेऊन हॉस्पिटलला जावं लागलं. खूप जण एकदम हॉस्पिटलला पोचले, त्यामुळे एका हॉस्पिटलमधल्या सगळ्या जागा संपल्या. या काकांना जागा मिळालीच नाही. आता त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला जावं लागणार. त्याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं, म्हणून ते टीव्हीवरचे काका तक्रार करत होते. ते पण दमले असतील ना…’
समाजातली वेगवेगळी माणसं या लढ्याला खंबीरपणे तोंड देत आहेत. त्यांचा आपल्याला आधार वाटतो आहे. या माणसांच्या कामाबद्दलही आपण छोट्यांशी बोलू शकलो तर? हॉस्पिटलचं जग आपण असं सोपं करू शकू :
“हॉस्पिटलमधे पेशंटला बरं वाटावं म्हणून खूप जण काम करतात. डॉक्टर, नर्स, महत्त्वाचं साहित्य इकडून तिकडे नेणारे, झाडपूस करणारे मावशी-दादा, वॉचमनकाका. आत्ता टीव्हीवर सांगत होते, की ते सगळे खूप दमलेत. कधी कधी त्यांना जेवायलाच वेळ मिळत नाही. झोपायला घरीही जाता येत नाही. पण ते सगळे किती शूर आहेत माहितीये? ते म्हणतायत, की आम्ही सगळ्यांना बरं वाटावं म्हणून प्रयत्न करणार आहोत! किती भारी आहेत ना ते?’
शहराची, बिल्डिंगची स्वच्छता करणारी मंडळी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांइतकीच महत्त्वाची आहेत. त्यांच्याबद्दलही आपल्याला सोप्या भाषेत मुलांशी बोलता येईल.
आपल्याला असं म्हणता येईल : “मला आणि आईला ऑफिसला येऊ नका सांगितलंय ना सध्या, मग आम्ही कम्प्युटरवरून काम करतो. पण सगळ्यांना असं त्यांच्या घरून काम नाही करता येत. आपला रस्ता झाडायला जी ताई येते, तिला रस्ता झाडायचं काम कम्प्युटरवरून करता येईल का? पण आपली ताई किती भारी आहे माहितीये? ती म्हणाली की, मी जर गेले नाही, तर रस्त्यावर कचरा साठेल. मग तर सगळे आणखी आजारी पडतील! तसं झालं तर मला वाईट वाटेल. म्हणून ती शूरवीरपणे रोज रस्ता झाडायला येते.’
आपल्या शेजारी-पाजारी पेशंट्ससाठी डबा करून देण्यासारखी महत्त्वाची कामं करणारी मंडळी आहेत, त्याबद्दलही बोलता येईल. मुलांना असं सांगता येईल : “खूप जणांना बरं नाहीये ना, मग त्यांच्या शरीरातली शक्ती कमी होतीये. त्यांना शिवाय स्वैपाक करायला लागला तर ते दमून जातील ना? म्हणून मग समोरच्या गौरीमावशीला काय आयडिया सुचली माहितीये? ती आता अशा पेशंट्ससाठी डबा करून देते! मग गौरीमावशीचा डबा खाऊन त्यांना हळूहळू बरं वाटायला मदत होत असणार. कसली भारी आहे ना आपली गौरीमावशी?’
भाज्या खाऊन, भरपूर खेळून आपण आपल्या शरीराला कोव्हीडशी भांडायची शक्ती देतो, याबद्दलही मुलांशी बोलूया. आपणच हे युद्ध जिंकणार आहोत आणि आपण जिंकलो रे जिंकलो की आपल्याला परत शाळेत, ग्राउंडवर जायला मिळणार आहे, यावर आपण विश्वास ठेऊया आणि आपल्या लहानग्यांपर्यंतही ते पोचवूया.
कोव्हीडची साथ फक्त मोठ्यांच्या जगात आलेली नाही. आपली मुलंही या अवघड परिस्थितीला तोंड देत आहेत. “नेमकं काय चालू आहे’ हा प्रश्न जसा आपल्याला त्रास देतो, तसाच तो त्यांनाही देतो. त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना माहिती मिळणं, हा त्यांचा अधिकार आहे! “त्यांना काय कळतंय?’ असं न म्हणता, आजूबाजूला काय चाललं आहे, याचा अर्थ लावायला आपण त्यांना मदत करूया.
तुमच्या मुलांनी असे काही प्रश्न विचारले असतील, ज्याची उत्तरं देणं तुम्हाला अवघड गेलं असेल तर ते जरूर लिहा. सोप्या भाषेतली उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न करू! काही किस्से शेअर करावेसे वाटले तरी आमच्या फेसबुक पेजवर जरूर शेअर करा!