पाणी व स्नायूंचे कार्य – पाण्यामध्ये अनेक खनिजे व जीवनसत्वे, विरघळून शरीरात पोहोचवली जातात. स्नायूंना उत्तम कार्यासाठी त्याची फार आवश्यकता असते. ही पोषकतत्वे पाण्यामार्फत जर स्नायूंना मिळाली नाहीत तर स्नायू पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाहीत.
पाण्यामुळे शरीरातील इतर शरीर द्रव्यांचे प्रमाण कायम राखले जाते – आपले शरीर 60 ते 70% पाण्याने बनले आहे. त्यामध्ये लाळ, वेगवेगळी पचनाला आवश्यक द्रव्ये यांचाही समावेश आहे. मेंदू व मज्जातंतू यांना बाहेरून सेरेब्रोस्पायनल फ्ल्युईड संरक्षण देते. अशा महत्त्वाच्या पातळ पदार्थांमुळे शरीर व्यवस्थित कार्य करू शकते. मेंदू हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील पाणी कमी झाल्याचा संदेश तो आपल्या देत असतो व मूत्रापिंडाला पाण्याच्या गरजेबद्दल सूचना देतो.
उष्मांक नियंत्रित करणारे पाणी – वजन कमी करणाऱ्यासाठी पाण्याचे काही वेगळेच महत्त्व आहे. भरपूर पाणी प्यायल्याने व्यायाम पूर्ण क्षमतेने केला जातो, ताजेतवाने वाटते, पोट भरल्याचे समाधान देणारे पाणी वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकांचे अमृतच आहे. शिवाय भरपूर सलाड, सूप, दूध, ताक इत्यादीमुळे शरीराला पाणी पुरवता येते. यामुळे पोटही भरते व वजन वाढण्याचीसुद्धा भीती नाही.
त्वचेचे आरोग्य पाणी सांभाळते – शरीरातून त्वचेवाटे घाम बाहेर पडतो. त्यामध्ये पाणी व इतर विषारी पदार्थ असतात. हे खूप महत्त्वाचे कार्य आहे. त्यामुळे शरीराचे तापमान राखले जाते. जर शरीराला पाण्याची सारखीच गरज भासू लागली तर निर्जलीकरणामुळे त्वचा कोरडी व सुरकुतलेली व चेहरा निस्तेज दिसतो.
पोट साफ होण्यास पाणी अत्यावश्यक – भरपूर पाण्यामुळे अन्न मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचते. चयापचयाची क्रिया पूर्ण होईपर्यंत आवश्यक पाणी मिळत राहिल्यास शौचास सुलभतेने होते, अन्यथा पाणी कमी पडल्यास आतडे त्या कामासाठी पाणी शोषते व पुढे शौच सुलभ होण्यास पाण्याची कमतरता भासते. पाण्यासोबत तंतुमय पदार्थसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत.
पाणी व मूत्रपिंडाचे कार्य – मूत्रपिंडामध्ये चहाच्या गाळण्याप्रमाणे रक्तातील अनावश्यक व विषारी पदार्थ व पाणी बाहेर काढले जाते. त्यातून मूत्र तयार होते. हे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मूत्रापडाला पाण्याची आवश्यकता असते. यामुळे आपले शरीर आतून अखंड स्वच्छ होत असते. पाणी कमी पिऊन आपण मूत्रपिंडावरचा कामाचा भार वाढवत असतो. त्याचा त्रास आपल्याला मूत्रखड्यांच्या आजाराच्या स्वरूपात भोगावा लागतो.
भरपूर व स्वच्छ पाणी पिणे गरजेचे – आपल्या मेंदूत 95% , रक्तात 82%, फुफ्फुसात 90% प्रमाण पाण्याचे असते. संस्कृतात पाण्याला जीवन म्हटले आहे ते उगाच नाही. त्यामुळे उत्तम आरोग्यदायी जीवन जगण्यास आवश्यक पाण्याचे प्रमाण ठेवणे आपल्याच हातात आहे.