शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाला दररोज पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी प्यायल्याने शरीराला डिहायड्रेशन टाळून कार्य करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्या होणे सामान्य आहे.पण फक्त पाण्याचे केवळ फायदेच आहेत की त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात? पाण्याचे दुष्परिणाम ऐकायला विचित्र वाटेल, पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनात संशोधकांनी अशाच एका मोठ्या समस्येबद्दल सांगितले आहे.
सामान्यत: ब्लड प्रेशर वाढल्यावर लोकांना पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, पण तुम्हाला माहित आहे का की पाण्यामुळे हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाबदेखील होऊ शकतो. हायपरटेन्शन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे की पाण्यामुळे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये उच्च रक्तदाब होऊ शकतो. पाण्यात काही रसायने आढळून आली आहेत, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
पाण्यात रसायनांचे प्रमाण वाढले आहे
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, मानवनिर्मित रसायनांचे प्रमाण वाढत असल्याने ते अन्न, पाणी आणि हवा दूषित करत आहेत. पॉलीफ्लुरोआल्किल पदार्थ (पीएफएएस) आणि परफ्लुरोआल्काइल यांसारखी रसायने जी सहजपणे मोडत नाहीत, मध्यमवयीन महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढवू शकतात. हा धोका लक्षात घेऊन सर्वांनी स्वच्छ पाणी आणि हवेबाबत विशेष दक्षता दाखवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पॉलीफ्लुरोआल्किल पदार्थांबद्दल जाणून घ्या
पॉलीफ्लुरोआल्किल पदार्थ प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने, वैयक्तिक काळजी उत्पादने जसे की शॅम्पू, शेव्हिंग क्रीम, नॉन-स्टिक भांडी आणि घरगुती वस्तू जसे की स्वयंपाकाच्या आवश्यक वस्तूंमध्ये आढळतात. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे पदार्थ पाण्यासोबत वातावरणात दीर्घकाळ राहू शकतात. अशा परिस्थितीत अशुद्ध पाण्याचे सेवन केल्याने तुमच्यामध्ये उच्च रक्तदाबासह अनेक समस्या वाढू शकतात.
अभ्यासात काय आढळले?
या अभ्यासासाठी, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी 45-56 वयोगटातील 1000 हून अधिक महिलांच्या डेटाचे विश्लेषण केले. जवळपास 20 वर्षे शास्त्रज्ञांनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले होते. अभ्यासाच्या सुरुवातीला सर्व सहभागींचा रक्तदाब सामान्य होता. तथापि, 2017 च्या अभ्यासाअंती, यापैकी 470 महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले. संशोधकांना असे आढळून आले की ज्या महिलांच्या रक्तात पीएफएएसचे प्रमाण जास्त होते त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका 71 टक्के जास्त असतो.
संशोधक काय म्हणतात?
मिशिगन विद्यापीठातील महामारीविज्ञान आणि पर्यावरण विज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ अभ्यासक सुंग क्युन पार्क म्हणतात की, धोका लक्षात घेऊन काही देशांनी फूड पॅकेजिंग आणि कॉस्मेटिक्स उत्पादनांमध्ये पीएफएएसच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणाही केली आहे. आमचे निष्कर्ष हे दाखवतात की जेनेरिक उत्पादनांमध्ये झऋचा वापर मर्यादित केल्याने उच्च रक्तदाबाचा वाढता जागतिक धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.