“मला कंटाळा आलाय’, “मला काहीच करायला जमत नाही’, “माझा काहीही उपयोग नाही’, असं तुम्ही स्वतःशी दिवसातून कितीवेळा बोलता? अशा नकारात्मक स्वसंवादांमुळे निराशा येण्याची शक्यता असते. याउलट घडलेल्या गोष्टींचा स्वीकार करून मनातल्या मनात सकारात्मक विचार करण्याला प्राधान्य द्या. “मला नक्की जमेल’, “मी पूर्ण प्रयत्न करणार’, असं स्वतःला समजवा आणि त्याप्रमाणे कृती करा. आयुष्य होईल सोपं!
तुम्ही खूप चिडचिड करत असाल तर मग जरा शांत होण्याचा प्रयत्न करा. थंड डोक्यानं थोडा विचार करा. कुटुंबियांशी मित्र-मैत्रिणींशी मनसोक्त गप्पा मारल्यात की सहज बोलता-बोलता अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. मनात काहीही साठवून ठेवू नका. त्याचा योग्य पद्धतीनं निचरा करा. तुमच्या जवळची मंडळी नेहमीच तुम्हाला मदत करतील. संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की, जर माणूस मानसिक ताणातून जात असेल तर त्याला शारीरिक दुखणंही आपोआप जडतं. टेन्शनमुळे डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखीसारख्या त्रासांना विनाकारण आमंत्रण मिळतं. कंटाळ्याला पळवून लावत तणावमुक्त कसं राहायचं यासाठीचे काही ऊर्जादायी मार्गदर्शक पर्याय.
दीर्घ श्वसन :
डोळे बंद करून शांत आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. असं पाच ते सात वेळा केल्यास सगळा थकवा दूर होईल आणि एकदम फ्रेश वाटू लागेल.
डोळ्यांना हाताची ऊब :
मांडी घालून जरा निवांत बसा. थोडा वेळ डोळे मिटा. हाताचे तळवे एकमेकांवर घासून त्याची ऊब डोळ्यांना द्या. दिवसातून कितीही वेळा ही क्रिया तुम्ही करू शकता. ताजेतवानं राहण्यास मदत होईल.
विचारांना प्रवाही ठेवा :
दोन मिनिटांसाठी डोळे मिटले तरी समोर अनेक विचार येतील… पण तुम्ही त्यांच्या मागे न जाता तो प्रवाह तसाच सुरू ठेवा. काही क्षणातच तुम्हाला छान मोकळं वाटेल.
व्यायामाला पर्याय नाही :
धावणं, जिना चढणं-उतरणं, मार्शल आर्टस किंवा मग चालणं यापैकी कोणताही व्यायाम प्रकार नित्यनेमाने करणं अतिशय महत्त्वाचं आहे. शरीराला व्यायाम मिळाला की मेंदूही आपोआप ताजातवाना होतो. नैराश्याशी निगडित असलेल्या कमी ऊर्जेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे सकाळी काही मिनिटांच्या स्ट्रेचिंगने सुरुवात करा आणि चार-पाच दिवसांसाठी ते नियमितपणे करण्याचे ध्येय ठेवा. कालांतराने तुम्हाला स्थूलपणावर नियंत्रण आल्याचे जाणवेल. तुम्ही सकारात्मक व्हाल. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी अधिक प्रेरित व्हाल.
तुम्हाला माहीत आहे का?
नैराश्य आल्यावर दिल्या जाणाऱ्या औषधांचं काम असतं मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा करणं. हेच मेंदूला रक्त पोहोचवण्याचं काम व्यायाम अतिशय उत्तम प्रकारे करतो. व्यायमामुळे शरीरात आनंदी रसायनांची निर्मिती होते आणि आपोआपच छान वाटू लागतं.
स्थूलपणा, नैराश्य म्हणजे
कंटाळ्याला निमंत्रण
सध्या स्थूलपणा आणि नैराश्य या दोन गंभीर सार्वजनिक समस्या आहेत. स्थूलपणा आणि नैराश्य यांचे प्रमाण वाढले आहे. हे दोन्ही आजार उच्च रक्तदाब, हृदयातील रक्तवाहिन्यांचे विकार आणि वाढत्या मृत्यूसाठी कारणीभूत आहेत. या संदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासानुसार स्थूल व्यक्तींना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत नैराश्य येण्याचे प्रमाण 18% अधिक असते.
स्थूलपणामुळे न्यूनगंड येतो, सामाजिकदृष्टया एकांतवासाला सामोरे जावे लागते आणि स्वत:बद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. त्याचप्रमाणे स्थूल व्यक्तींवर एक प्रकारचा शिक्का लागतो आणि त्यांना वाळीत टाकले जाते. स्थूल व्यक्तींच्या अतिरिक्त वजनामुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होते, तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांची लागण होऊ शकते. हे सर्व आजार नैराश्याशी जोडलेले आहेत. ज्या व्यक्तींनी स्थूलपणावर बॅरिअँट्रिक शस्त्रक्रिया करून घेतली आहे, त्यांना वजन कमी होण्यासोबतच त्यांचे नैराश्यही कमी झाल्याचा अनुभव आला आहे. शस्त्रक्रियेनंतर वर्षभराने रुग्णाचे 15% अतिरिक्त वजन कमी होऊ शकते आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात.
तरुण, महिला आणि अती स्थूल व्यक्ती ज्यांचे वजन कमी होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यांना नैराश्य येण्याची शक्यताही कमी असते. काही घटक स्थूलपणा आणि नैराश्य या दोहोंना चालना देतात. ज्या व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालीमध्ये (व्यायाम) सहभागी होत नाहीत, त्यांना स्थूलपणा किंवा नैराश्य जडण्याची शक्यता असते. तुमचे नैराश्याचे लक्षण आणि आहार यांच्यातील संबंध जाणून घ्या. तुमच्या वजनाबाबत असलेल्या तुमच्या भावना जाणून घ्या आणि तुम्ही आहार कसा घेताय आणि कधी घेताय यावर लक्ष द्या.
हळूहळू वाटचाल करा :
नैराश्य असलेल्या व्यक्ती आयुष्याबाबत खूपच संवेदनशील असतात, त्यामुळे वजन कमी करण्याच्या बाबतीत छोटासा प्रयत्न करण्याचे ध्येय समोर ठेवणे महत्त्वाचे असते. उदा. तुम्ही दर दिवशी साखरयुक्त पेये पित असाल तर आठवडाभर ती वर्ज्य करण्याचे ध्येय ठेवा. त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये तळलेले पदार्थ वर्ज्य करा.
हालचाल करा :
नैराश्य आणि स्थूलपणा असलेल्या व्यक्तींची शारीरिक हालचालसुद्धा कमी होते. पण तुम्ही नैराश्यात असताना टीव्ही पाहत दिवसाचे चार तास एका ठिकाणी बसून असाल तर ते अत्यंत घातक आहे. त्यामुळे तुमच्या चयापचयाचा दर कमी होईल. तर प्रत्येक शारीरिक हालचाल चयापचयास त्याची मदत करत असते. त्यामुळे या चाकोरीतून बाहेर पडून व्यायामास सुरुवात करा.