मनाली – उन्हाळा म्हटले की पर्यटकांना हिमाचल प्रदेश आणि काश्मीरची आठवण होते. हिमाचल प्रदेशात गेल्यावर पर्यटक हमखास मनालीला जातात. मात्र मनालीजवळची मनाला भुरळ पाडणारी आणखी काही ठिकाणे आहेत. त्याबाबत पर्यटक अनेकदा अनभिज्ञ असतात. मनालीजवळच्या अशाच काही सुंदर पर्यटनस्थळांविषयी…
हिमाचल प्रदेश म्हणजे बर्फाने आच्छादलेल्या डोंगररांगा, आल्हाददायक हवामान, खळखऴत वाहणारे झरे, उंच डोंगर, प्राचीन मंदिरे, बौद्ध मठ यामुळे हा परिसर पवित्र असण्याबरोबरच निसर्गसुंदर असा आहे. आवाज, गर्दी, गोंधळ यापासून दूर चार दिवस निवांत राहण्यासाठी पर्यटकांची पावले हिमाचल प्रदेशकडे वळतात. या राज्यात मनाली, धर्मशाला, डलहौसी, कसौली अशी थंड हवेची ठिकाणे पर्यटकांची सगळी थकावट दूर करतात. हिमाचल प्रदेशात प्रवेश करताच पीर पंजाल आणि धौलाधार पर्वतरांगेतील बर्फाच्छादित डोंगररांगा दिसू लागतात. मनाली हे देशातील सर्वात लोकप्रिय थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. उन्हाळ्यातही बर्फाखाली झाकून गेलेले 13050 फूट उंचीवरील रोहतांगचा निसर्गही पर्यटकांना खुणावत असतो. निसर्गातील सौंदर्याबरोबरच ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, राफ्टिंग अशा साहसी क्रीडाप्रकारांच्या सुविधा असल्याने तरुणवर्गाचीही हिमाचल प्रदेशला पसंती असते. त्यामुळे कुलू-मनाली आणि लाहुलमध्ये फिरून आल्यानंतर
आणखी काही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता…
रोहतांग खोरे –
13050 फूट उंचीवर असणारे रोहतांग खोऱ्यात उन्हाळ्यातही बर्फवृष्टी होत असते. या खोऱ्यातील निसर्गसुंदर दृश्ये तुमच्या मनाला मोहित करतील. याठिकाणी रोज पर्यटकांची सुमारे पाच हजार वाहने येत असतात यावरून रोहतांगची लोकप्रियता लक्षात येईल. आता राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशानुसार रोज फक्त 1200 वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे. मनालीपासून रोहतांग खोरे फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे.
हिडिम्बा, मनू ऋषी आणि वसिष्ठ ऋषी मंदिर –
मनालीच्या आसपास असणारी ही सगळी मंदिरे मनाली दर्शनचा भाग आहेत. हिडिम्बा मंदिर भीमाची पत्नी हिडिम्बेच्या नावाने आहे. अन्य मंदिरांच्या तुलनेत याची रचना अगदी वेगळी आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार लाकडाचे आहे आणि छत हे छत्रीच्या आकाराचे आहे. मनु ऋषी मंदिरही पाहण्यासारखे आहे. असे सांगितले जाते की, पृथ्वीवर प्रलय आला तेव्हा मनु महाराजांची नाव मनालीला येऊन थांबली होती. वसिष्ठ ऋषींनी या परिसरात तपश्चर्या केल्यामुळे त्यांचे या ठिकाणी मंदिर आहे. ही सगळी मंदिरे मनालीपासून दोन-तीन किलोमीटरच्या अंतरात आहेत.
सोलंग घाट –
मनालीत आल्यावर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सोलंगला फिरून येण्याचा आनंद घेऊ शकता. याठिकाणी पॅराग्लायडिंग, अश्वारोहण, रोपवे, माऊंटन बाईक, स्नो स्कूटर अशा साहसिक खेळांचा आनंद घेता येतो. मनालीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलंग घाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येऊन गेले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी याठिकाणी पॅराग्लायडिंगचा आनंदही लुटला.
मणिकर्ण –
पार्वती नदीच्या किनारी वसलेल्या या गावातील गुरूद्वारा हिंदू आणि शीख समाजाचे पवित्र ठिकाण मानले जाते. इथल्या उबदार पाण्यातील कुंडात बुडी मारून स्नान केल्यावर इथल्या पावित्र्याची अनुभूती येते. याठिकाणी शिव आणि पार्वती रहात होते असे सांगितले जाते. इथले वातावरण अतिशय शांत आणि अध्यात्मिक स्वरुपाचे आहे. कुलूपासून मणिकर्ण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.
नग्गर –
कुल्लू जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या नग्गरला पर्यटक मोठ्या प्रमाआवर येतात. जगत पट्ट आणि करोडो देवीचा याठिकाणी निवास असल्याचे सांगितले जाते. याठिकाणची निकोलस रौरिक आर्ट गॅलरी देखील प्रसिद्ध आहे.
अटल बोगदा –
रोहतांग खोऱ्यातील पीर पंजाल डोंगर खोदून अटल बोगदा तयार करण्यात आला आहे. भारतीय अभियांत्रिकीच्या कौशल्याचे उदाहरण म्हणून अटल बोगद्याकडे पाहिले जाते. नऊ किलोमीटर अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ लागतो. इथे थांबून या बोगद्याच्या बांधकामाची माहिती घेता येते. हा बोगदा झाल्यामुळे कुलूच्या निसर्ग सुंदर प्रदेशातून पर्यटक दहा मिनिटात लाहुलच्या आणखी सुंदर प्रदेशात पोचतात. मनालीपासून अटल बोगदा 18 किलोमीटर अंतरावर आहे.
त्रिलोकीनाथ आणि मृकुला मंदिर
अटल बोगदा झाल्यामुळे त्रिलोकीनाथ आणि मृकुला मंदिराला भेट देणे सोपे झाले आहे. त्रिलोकीनाथ मंदिर बौद्ध आणि हिंदू धर्मीय अशा दोघांसाठी पवित्र आहे. गावातील एका टेकडीवर हे मंदिर आहे. तिथून किशोरी गाव ओलांडून माता मृकूला मंदिरात पोचता येते. मनालीपासून ही मंदिरे 110 किलोमीटर अंतरावर आहेत.
चंद्रताल आणि कुंजम दर्रा –
लाहूल स्पिती जवळील चंद्रताल आणि कुजुंम ह ठिकाणे अगदी जवळजवळ आहेत. चंद्रताल तलाव हा हिमालयातील 4300 मीटर उंचीवर असून सुंदर तलावांपैकी तो एक आहे. कुंजुम येथून चंद्रतालपर्यं नऊ किलोमीटरचे ट्रेकिंगही करता येऊ शकते. कुंजुम येथे बारा-शिगरी हा ग्लेशियर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब ग्लेशियर आहे. चंद्रताल मनालीपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी तुम्ही एका दिवसांत जाऊन येऊ शकता.
काजा –
हे ठिकाण स्पिती जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अतिशय सुंदर आणि रमणीय परिसर आहे. याठिकाणी आल्यावर पर्यटकांना शांत वातावरणाची अनुभूती येते. स्पितीमधील सर्व पर्यटनस्थळे काजाच्या आसपास आहेत.
पिन व्हॅली –
लाहूल आणि स्पिती जिल्ह्याच्या थंड वाळवंटी प्रदेशात पिन व्हॅली नॅशनल पार्क आहे. साहसी खेळांची आवढ असणाऱ्यांसाठी पिन व्हॅली नॅशनल ट्रॅक सर्वोत्कृष्ठ आहे. 1987 मध्ये या परिसराला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. विविध प्राण्यांबरोबरच पिन व्हॅलीमध्ये नैसर्गिक सुंदरता भरपूर आहे. याठिकाणी जाण्यासाठी प्रवासासाठी पुरेसा वेळ काढून जावे लागते.