[[{“value”:”
पुण्यातील अॅना सॅबेस्टाइन पेराइल या सीए असणाऱ्या २६ वर्षाच्या युवतीचा मागील महिन्यात रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिला अस्वस्थ वाटत असल्यामुळे आणि थकवा आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्न्स्ट अँड यंग ग्लोबल या कंपनीशी निगडित असलेल्या एसआर बाटलीबॉय या कंपनीत ती चार महिन्यांपासून सीए म्हणून नोकरी करत होती.
तिचा मृत्यू हा कामाच्या अति ताणामुळे झाला असल्याचा आरोप तिची आई अनिता सॅबेस्टाईन यांनी केलेला आहे त्यांनी लिहिलेले पत्र मंगळवारी व्हायरल झालेले आहे. मात्र अर्न्स्ट अँड यंग या कंपनीने हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. कंपनीने म्हटले आहे, की आमच्याकडे सुमारे एक लाख लोक काम करतात आणि प्रत्येक जण कठोर मेहनत करत असतो. अना ही आमच्याकडे केवळ चार महिने नोकरी करत होती आणि ज्या पद्धतीने अन्य कर्मचाऱ्यांना काम दिले जाते तसेच तिला दिले होते. त्यामुळे कामाच्या अति ताणाने तिचा मृत्यू झाला यावर आमचा विश्वास नाही.
अॅनाच्या आईने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की त्यांची मुलगी अतिशय हुशार आणि बुद्धिमान होती शाळेत आणि कॉलेजमध्ये ती नेहमीच टॉपर होती सीए ची परीक्षा देखील ती विशेष गुणवत्ता प्राप्त करून उत्तीर्ण झालेली होती. आतापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीत तिने चांगली कामगिरी केलेली होती. मात्र तरीही ती नोकरीच्या ठिकाणी असलेल्या कामाच्या ताण आणि दबाव कसा मॅनेज करायचा हे नीट उमगले नाही. त्याचा परिणाम तिच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर झाला.
अनिता सॅबेस्टाईन यांनी लिहिलेल्या पत्रात ही बाब अधोरेखित केली आहे, की कामाच्या अति दबावामुळे यापूर्वी अनेकांनी अर्न्स्ट अँड यंग कंपनीतून राजीनामे दिलेले आहेत. त्यांनी म्हटले आहे, की तिचा मॅनेजर तिला सांगत असायचा की तू ठाम रहा आणि आपल्या टीम बद्दलचे सगळ्यांचे मत बदलण्यासाठी काम करत रहा. त्या म्हणतात नव्याने नोकरीवर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यावर पाठीचा कणा मोडेल एवढा कामाचा लोड टाकणे, त्यांना रात्रंदिवस अगदी रविवारी ही कामाला लावणे हे योग्य नाही. या घटनेवरून प्रत्येकाने काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण नोकरी सोडण्याबाबत आपल्याला काही लक्षणे दिसू लागलेली असतात. ती कोणती याविषयी….
एचबीआर गाईड टू क्राफ्टिंग युवर पर्पज या पुस्तकाचे लेखक जॉन कोलमन यांनी म्हटले आहे, की तुमच्या नोकरीमुळे जर का तुम्हाला नीट झोप लागत नसेल, झोप उडाली असेल, अंगदुखी, पोटदुखी डोकेदुखी किंवा ताण-तणावाची लक्षणे दिसत असतील तुम्ही लक्षात घेतले पाहिजे की तुमची नोकरी ही तुमच्यासाठी विखारी बनत असल्याचे हे निदर्शक आहे. या सगळ्याला सामोरे जाण्याचा मार्ग म्हणजे त्या नोकरीतून बाहेर पडणे.
तुमची नोकरी विखारी स्वरूपाची असल्याची लक्षणे
१) शारीरिक ताण – जर का तुम्हाला रात्री शांत व गाढ झोप लागत नसेल, सतत अधून मधून जाग येत असेल, डोके दुखत असेल, थकल्यासारखे वाटत असेल तर तुमचा जॉब हा विखारी स्वरूपाचा असून तो तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे हे लक्षात घ्या.
२) कमी लेखले जात असल्याची भावना – जेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्ही कंपनीसाठी जे योगदान देत आहात त्या तुलनेत तुम्हाला रास्त वेतन मिळत नाही तर ती नोकरी सोडणे योग्य ठरते. विशेषतः तुमच्या वेतनात आणि सहकाऱ्यांच्या वेतनामध्ये जर का मोठा फरक असेल तर ही बाब आणखीनच अधोरेखित होते.
३) वरिष्ठ पदाची आकांक्षा नसणे – जर का तुम्हाला कंपनीत नोकरी करताना वरिष्ठ पद मिळावे असे वाटत नसेल आणि आत्ताच या पदावर काम करताना कामाचा प्रचंड दबाव आणि ताण असल्याचे दिसत असेल तर तुम्ही करिअरमध्ये बदल करावा याचे हे निदर्शक असते.
४) रोज कामाची भीती वाटत राहणे – कामाचा आनंद आणि समाधान मिळण्याऐवजी रोजच्या कामाची तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही कामात बदल करणे आवश्यक ठरते.
५) वेळेवर नियंत्रण नसणे – तुमच्या वैयक्तिक नियोजनामध्ये कामाच्या ठिकाणच्या डेडलाईन्स आणि कमिटमेंट मुळे अडथळे येत असतील तर तुम्ही नोकरी बदलण्याबाबत विचार करणे योग्य ठरते.
६) कंटाळवाणी परिस्थिती आणि प्रगतीचा अभाव – नोकरीमध्ये तुमच्या समोर कुठलीच आव्हाने नसतील आणि स्थिरता आली असेल तर याचाच अर्थ तुम्ही नोकरी बदलणे आवश्यक आहे.
अर्थात नोकरी करत असताना काही प्रमाणात ताण हा चांगला असतो. नवी आव्हाने, नवी टार्गेट, डेडलाईन्स हे सगळे चांगल्या कामगिरीसाठी आवश्यक असते. मात्र जेव्हा यातील माणूसपण हरवून केवळ सतत वाढीव टार्गेट, कंपनीचा टर्नओव्हर आणि प्रॉफिटच्या भाषेत सातत्याने प्रेझेंटेशन आणि मेल्स येऊन आदळत असतात तेव्हा आपण नेमके काय केले पाहिजे आणि नोकरी नेमकी कशासाठी करतो आहोत याचा विचार केला पाहिजे.
The post नोकरीतील वाढता ताण-तणाव कसा ओळखावा? appeared first on Dainik Prabhat.
“}]]
