नेत्रदान करताना संपूर्ण डोळा उपयोगाला येत नाही. डोळ्यातला आयरीस नावाचा भाग असतो त्याचा कॉर्निया नावाचा पारदर्शक भाग वापरतात. मोतिबिंदू झालेल्या किंवा चष्मा वापरणाऱ्या माणसानेसुद्धा नेत्रदान केले तरी चालते. मृत माणसाचे डोळे काढल्यानंतर चेहरा विकृत दिसत नाही. एका माणसाचा अवयव दुसऱ्या माणसाला चालत नाही. तो अव्हेरला जातो. पण कॉर्निया हा असा अवयव आहे ज्याला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे तो कोणत्याही माणसाकडून अव्हेरला जात नाही. एड्स, कावीळ, रॅबीज, सिफीलीस, टिटॅनस, सेप्टीसेमिया आणि व्हायरल जंतुसंसर्ग झालेल्या माणसाचे डोळे चालत नाहीत मधुमेह असलेल्या माणसाने नेत्रदान करायला हरकत नाही. कॉर्नियाचे आरोपण केल्याने सर्वच आंधळ्यांना दृष्टी येत नाही. फक्त कॉर्निया खराब झाला असेल तरंच कॉर्निया नवीन बसवल्यावर दृष्टी येते.
मृत पावल्यावर लवकरात लवकर नेत्रदान करावे. सहा तासांपेक्षा जास्त उशीर लावू नये. नेत्रदान करण्याची सूचना दिल्यावर आयबॅंकचे डॉक्टर घरी येऊन डोळे काढून घेऊन जातात. मृत माणसाला आयबॅंकेत घेऊन जाण्याची गरज नसते. डोळे काढायला साधारण अर्धा तास लागतो नेत्रदान करायचे असेल तर जवळच्या आयबॅंकेत जाऊन स्वत:चे नाव नोंदवून घ्या. नाव नोंदवायची तशी गरज नसते. पण आधी जाहीर केलेले चांगले असते. याबाबत जवळच्या मित्राला किंवा नातेवाइकाला मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली तरी पुरेसे असते. पण नाव नोंदवलेले असेल तर चांगले. नाव नोंदवल्यावर आयबॅंक तुम्हाला कार्ड देते.
ते घरात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावा. म्हणजे मृत्यूनंतर कार्ड शोधण्याची गरज पडणार नाही. नाव नोंदवल्यावर तुमची बदली झाली किंवा गाव बदलावे लागले तर आयबॅंकेला तसे कळवावे. नवीन पत्ता, फोन नंबर कळवावा. मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर अशांच्या नातेवाइकांनी त्याच्या मरणानंतर आयबॅंकेला तशी सूचना द्यावी. ते नातेवाइकाचे कर्तव्य आहे. ज्या बॅंकेत नाव नोंदवले असेल त्याच बॅंकेला कळवावे लागते असेही नाही. सर्वांत जवळची जी आयबॅंक असेल तिला कळवले तरी चालते. आयकार्ड दाखवावे. मेल्यानंतर डोळे बंद करावे डोळ्यावर ओलसर कापसाचे बोळे ठेवावे पंखा बंद करावा. एसी असेल तर तो चालू ठेवावा. मृत माणसाचे डोके दोन तीन उशा घेऊन त्यावर ठेवावे.
मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला असेल तरंच नेत्रदान करता येते आणि तसा अर्ज भरला नसेल तर नेत्रदान करता येत नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याचे समजते. खरे तर तसे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला नसेल तरीही त्याच्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाइकांनी ठरवले तर ते जवळच्या नेत्रपेढीला नुसता एक दूरध्वनी करून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात. मृत्यूनंतर एक किंवा दोन तासांतच नेत्रदान केले पाहिजे असे सांगितले जाते, पण त्यात तथ्य नाही. सहा तासांपर्यंत नेत्रदान होऊ शकते. काही दिवसांच्या बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींचे नेत्रदान केले जाऊ शकते. डोळे काढून घेतल्यानंतर पूर्ण डोळ्याचे रोपण केले जात नाही तर डोळ्यातील पारपटलाचे रोपण केले जाते.