
निरोगी जीवनशैली
June 22nd, 9:23amJune 22nd, 9:23am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
आहार, विहार आणि निद्रा यावरच सर्व शरीरक्रिया, आरोग्य अवलंबून आहे. अन्न हे प्राणधारण करणाऱ्यांचा प्राण आहे. म्हणून ह्या सृष्टीतील सर्व सजीव अन्नामागे धावत असतात. शरीराचं बळ, वर्ण, पुष्टी, बुद्धी आणि सुख अन्नावरच अवलंबून आहे.
आपण अन्नाचं ग्रहण करताना खरंच ह्या बाबींचा विचार करतो का? अन्नाची निवड करताना काय खावं आणि काय खाऊ नये, हे समजून घेतो का? ते काही वेळा माहीत असूनही आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अन्न का घेत नाही? समजून न घेण्याइतकी आपल्यात उणीव का असते? ह्या अन्नावरच सगळं जीवन अवलंबून असतं.
त्यामुळे आहारात काय घ्यावं? कसं घ्यावं? किती घ्यावं? ह्या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.
सगळ्यांनी असा आहार सेवन करायला हवा की, जो आपल्या शरीराचं स्वास्थ्य टिकवून ठेवेल आणि रोग उत्पन्न होऊ देणार नाही. गरम, स्निग्ध, योग्य मात्रेत, पहिलं अन्न पचल्यावर, मनाला आवडेल अशा ठिकाणी सर्व योग्य सामग्रीसह, फार भरभर नाही आणि हळूही नाही, असं न बोलता हसत आनंदी वातावरणांत, जेवणाकडे पूर्ण लक्ष देऊन अन्न घ्यावं.
आपल्या पचनक्रियेसाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं, म्हणूनच अधिक जरुरीचं असतं. सद्य:स्थितीत धावपळीच्या युगात वेळी अवेळी काम करत राहावे लागते. त्यामुळे जेवणाच्या वेळाही वारंवार बदलतात. हल्ली अनेकांचा कल फास्टफूड खाण्याकडे आहे. फास्टफूड खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, अतिवजन वाढणे, किडनीवर परिणाम होणे असे आजार उद्भवतात.
ह्याची आपल्याला ते खाताना जाणीवच राहात नाही.रस्त्यावरील गाड्यांवर, बाहेरचं खाण्याने जुलाब, उलट्या, टायफाईड, कावीळ, कॉलरा, अन्नातून विषबाधा, पोटदुखी आदी विकार जडतात. अशा ठिकाणच्या पदार्थांचा दर्जा, तेथे असलेली अस्वच्छता ह्याचा देखील विचार करणं जरुरीचं असतं.
रोजच्या आहारात किमान 5 ते 10 थेंब गायीचे तूप वापरलं पाहिजे. रोज किमान एक ग्लास दूध प्यायलं पाहिजे, त्यातून प्रथिने मिळण्यास मदत होते. दिवसातून चार वेळा आहार घेणे महत्त्वाचं असून यामध्ये दोन वेळा नाश्ता आणि दोन वेळा जेवण यांचा समावेश असावा. नाष्ट्यामध्ये दूध, फळ, मोड आलेली कडधान्ये, गुळ-शेंगदाण्याचे लाडू आदींचा समावेश असावा. त्याचप्रमाणे जेवणामध्ये समतोल आहार म्हणजेच वरणभात, भाजीपोळी, आमटी, ताक यांचा समावेश असावा.
जेवणापूर्वी सलाड आणि जेवताना कोशिंबिरीचादेखील वापर असावा. अलीकडच्या काळात काळजीपूर्वक आहार घेण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं दिसतं. जसा आहार महत्त्वाचा, तसाच विहारदेखील महत्त्वाचा असतो. दिवसातील किती वेळ आपण विहाराला देतो? मोकळ्या हवेतील विहाराचं महत्त्व आपल्याला माहितीच नाही का? परंतु त्याच्याकडे सोयीस्करपणे आपण दुर्लक्ष करत आहोत, ह्याची साधी जाणीवही होत नसते.
विहार आपल्याला वाहनांतून करण्यांत अधिक स्वारस्य असतं. जे विहाराच्या बाबतीत, तेच निद्रेच्या बाबतीतही अनेकांकडून होत असतं. आवश्यक तितकी शारीरिक आणि मानसिक विश्रांती ही केवळ निद्रेच्याच माध्यमातून योग्यरित्या मिळत असते.
अपुऱ्या झोपेचा परिणाम सर्वप्रथम आपल्या मनावर आणि कालांतराने शरीरावर व्हायला सुरुवात होते. शांत झोप न लागणं, ती न घेतली जाणं ही निश्चितच साधी व्याधी असू शकत नाही, हे लक्षात घ्यावे.