काळाबरोबर सगळ्याच गोष्टी बदलत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. आपल्याला होणारे आजारसुद्धा बदलतात. अनेक नवे आजार येतात, जुने आजार आपले स्वरूप बदलतात. याच गोष्टीचा आढावा घेत आज तरुण वर्गातील वाढता रक्तदाबाचा त्रास या विषयावर चर्चा करणार आहे.
तणावातून माणसाला रक्तदाब जडतो. त्यामुळे माणसाची चीडचीड होते. आवाज वाढतो. तो मोठ्याने बोलू लागतो. दोन हातांच्या अंतरावर असलेल्या माणसांशी आपण जेव्हा मोठ्याने बोलतो तेव्हा त्या रक्तदाबाचा अर्थ काय असतो? माणसे जर खूप लांब असतील तर त्यांना मोठ्याने बोलावे लागते, पण समोरासमोरची माणसे जेव्हा मोठ्याने बोलतात तेव्हा ती शरीराने जवळ असली तरी मनाने एकमेकांपासून दूर गेलेली असतात.
आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तणावाने, हायपर टेन्शनने ग्रस्त झालेला आहे. ही बदललेली जीवनशैली, वाढते ताणतणाव आणि आर्थिक कुत्तरओढ त्याला आजाराकडे घेऊन जाताना दिसते आहे. सगळ्यांचा संबंध पैशाशीच जोडलेला आहे. कारण जोवरी पैसा, तोवरी बैसा अशी म्हण आहे किंवा असतील शिते तर जमतील भुते अशी परिस्थिती असते. जवळ पैसा नसेल तर केवळ मित्र, आप्तच सोडून जात नाहीत तर आरोग्यही साथ देत नाही. कारण सुख-समाधान निघून गेलेले असते. अशा व्यक्तीला रक्तदाबाला सामोरे जावे लागते. कधीकधी तो इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याला हृदयविकाराचा झटका येतो. बघता बघता माणूस डोळ्यांसमोरून होत्याचा नव्हता होतो. दररोज अशा घटना ऐकतो. आपण हळहळतो. पण त्यामागे असलेल्या तणावावर कोणीच बोलत नाही.
तरुण वयात आपल्याला एखादा आजार झाला आहे हे मान्य करणे अनेकांना फार कठीण जाते. मान्य केलेच तरी त्याबद्दल काहीही उपाय करण्याचे अनेकदा टाळले जाते, पण अशा दुर्लक्ष करण्यामुळे, टाळाटाळीमुळे अनेकदा सहज बरा होऊ शकणारा आजार बळावत जातो. फार पूर्वी रक्तदाबाचा त्रास चुकूनच एखाद्याला व्हायचा. काही काळानंतर परिस्थिती बदलली आणि हा उतार वयातील किंवा पन्नाशीनंतरचा आजार म्हटला जायला लागला. पण आज आपल्याला जगभरात विशी आणि तिशीतील तरुणांमध्ये रक्तदाबाचा त्रास दिसू लागला आहे.
निरोगी माणसाचा रक्तदाब 120/80 असायला हवा. वरचा आकडा 120 ला सिस्टोलिक आणि खालचा आकडा 80 ला डायस्टोलिक असे म्हणतात. 120/80 ते 140/90च्या मध्ये कुठेही जर हे आकडे राहात असतील तर त्याला उच्च रक्तदाब असे म्हटले जाते.
आज तरुणांमध्ये वयाच्या विशीत आणि तिशीत रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. सुरुवातीला अनेकदा ह्या त्रासाची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत. म्हणून याला silent killer असेही म्हणतात, पण सतत रक्तदाब जास्त राहिल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे मग पुढे हृदयाचे विकार सुरू होण्याची शक्यता वाढते.
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊन रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, किडनीवर ताण येऊन किडनीचे आजार सुरू होणे, मेंदूला नीट रक्तप्रवाह न मिळाल्याने लकवा येणे, डायबिटीस होणे, लैंगिक जीवनात कमजोरी किंवा अडथळे येणे, आंधळेपणा येणे, घोरणे, म्हणजे झोपताना श्वास घेण्यात अडथळा येणे असे अनेक आजार दुर्लक्षित रक्तदाबामुळे होऊ शकतात.
रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याची अनेक कारणे आहेत. पण ही जवळजवळ सर्व कारणे बदललेले राहणीमान या महत्त्वाच्या घटकाकडे बोट दाखवताना दिसतात. उच्च रक्तदाब हा आजार वयस्कर व्यक्तींनाच होतो, हा गैरसमज असून सध्याच्या बदलत्या आणि धकाधकीच्या आयुष्यात तरुणांनाही या आजाराने ग्रासले आहे. लहान वयात उद्भवणाऱ्या या समस्येचे रूपांतर पुढे हृदयविकारात होत आहे. आजच्या युगात तरुणांना विश्रांती मिळत नाही.
याशिवाय रस्त्यावरचे उघडे पदार्थ, जंकफूड, चायनिज पदार्थ खाण्याची तरुणांना सवय असते. या पदार्थात मोठ्या प्रमाणात तेल आणि मीठ वापरण्यात येत असल्याने तरुणांना लहान वयातच उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. अधिक पैसे कमवण्याच्या हव्यासातून अनेक तरुण-तरुणी कॉल सेंटरचा पर्याय निवडतात, परंतु या कामांमुळे जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलत असल्याने त्याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. याशिवाय तणावग्रस्त जीवन, व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्या जाणवतात. अनुवंशिकता हेही एक कारण यामागे आहे. कुटुंबात एखाद्या व्यक्तीला ही समस्या असल्यास पुढच्या पिढीत ती दिसून येते.
तरुणांना किमान आठ तास झोप आवश्यक असते. इतकी झोप न मिळाल्यास अशाप्रकारचे आजार होऊ शकतात. मद्यपानही उच्च रक्तदाबाला कारभीभूत ठरते. महिला घर आणि काम अशा दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडत असल्याने त्यांच्यावर अधिक मानसिक ताण असतो. अशा महिलांतही रक्तदाबाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात रक्तदाब 120-139च्या वर आणि 80-89च्या खाली असेल तर संबंधित व्यक्तीला उच्च रक्तदाब असल्याचे कळते.
अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, नियमित व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही काही वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले होते की, 100 जणांपैकी 50 टक्के लोकांत रक्तदाबाची लक्षणे दिसून येतात. तर उर्वरित 50 टक्के लोकांचा रक्तदाब साधारण असतो. आरोग्यदायी वाटत असले तरी तरुणांनी दोन वर्षातून एकदा रक्तदाब तपासून घ्यावा. ज्यांच्या कुटुंबात अगोदरच्या पिढीतील सदस्याला उच्च रक्तदाब असेल त्यांनी पहिल्यांदा तपासणी करून घ्यावी. लहान मुलांनाही हा आजार होण्याची शक्यता असल्याने जोखीम न घेता उपचार केल्यास हा आजार टाळता येईल.
=========================
The post निरामय : तरुण वयात रक्तदाब appeared first on Dainik Prabhat.