देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही त्याच दरम्यान एका नवीन आजाराची दहशत पसरली आहे. अन्नातून विषबाधा होण्याच्या अलीकडच्या घटनांमध्ये केरळच्या अनेक भागांमध्ये टोमॅटो फ्लू नावाचा एक नवीन विषाणू आढळून आला आहे. या नवीन विषाणूची माहिती समोर येताच ज्यांना ताप असल्याचे दिसून आले आहे. त्या सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत. या दुर्मिळ आजाराने आतापर्यंत राज्यात 5 वर्षांखालील 80 हून अधिक मुलांना ग्रासले आहे आणि आगामी काळात ही संख्या वाढू शकण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे.
काय आहे टोमॅटो फ्लू ?
टोमॅटो फ्लू हा एक अज्ञात ताप आहे, जो केरळमध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. फ्लूची लागण झालेल्या मुलाला पुरळ आणि फोड येऊ शकतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणूनच याला ‘टोमॅटो फ्लू’ किंवा ‘टोमॅटो फिव्हर’ म्हणतात. हा रोग फक्त केरळच्या काही भागात आढळला आहे. संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास हा विषाणू आणखी पसरू शकतो अशी चेतावणी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
ही आहेत टोमॅटो फ्लूची लक्षणे
टोमॅटो फ्लूच्या मुख्य लक्षणांमध्ये लाल पुरळ, फोड, त्वचेची जळजळ आणि शरीरावर निर्जलीकरण यांचा समावेश होतो. याशिवाय अति ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे व नाक वाहणे, हाताचा रंग बदलणे ही लक्षणे संसर्ग झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात.
टोमॅटो फ्लूचा सामना कसा करावा?
संसर्ग झालेल्या मुलावर पुरळ आणि फोड ओरबाडणार नाहीत याची काळजी घ्या. यासोबतच स्वच्छता राखा, जर एखाद्या मुलास टोमॅटो फ्लूची लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळोवेळी द्रवपदार्थ घेत राहण्याचा आणि योग्य विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.