[[{“value”:”
दुबईमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने आश्चर्यकारक आणि नव्या कल्पनांसह अनेक गोष्टी निर्माण केल्या जात असतात. दुबईतील मिरॅकल गार्डन ( dubai miracle garden ) म्हणजे अशीच एक अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे. दुबईच्या वाळवंटात एक असं गार्डन आहे ते पाहताच तुम्ही त्याच्या प्रेमात पडता.
वाळवंटात सुंदर फुलांनी फुललेले, हिरवाईने नटलेलं गार्डन म्हणजे ‘मिरॅकल गार्डन’ ( dubai miracle garden ). मिरॅकल गार्डनमधील फुलांपासून बनविण्यात आलेल्या निरनिराळ्या रचना, सुंदर कलाकुसर आणि जोडीला नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण असलेल्या या गार्डनचं सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडतं.
या पुष्पोद्यानाची रचना गोलाकार असून परिघ जवळजवळ एक किमी. लांबीचा आहे. अंतर्भागात ४ किमी. लांबीचे पदपथ असून विविध प्रकारच्या एकूण ४ कोटी फुलझाडांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
‘मिरॅकल गार्डन’ ( dubai miracle garden ) म्हणजे अगदी नावाप्रमाणेच दुबईच्या वाळवंटात फुललेलं अघटितच..! नेत्रसुखद, नेत्रदीपक.. डोळय़ांबरोबर मनाला आणि आत्म्याला सुखावणारं.. आगळंवेगळं अद्वितीय असं काहीसं..! खरेच.. निसर्गाच्या कॅनव्हासवर मनात भरणाऱ्या अप्रतिम रंगांनी रंगलेलं एक अत्यंत देखणं असं ते चित्र डोळय़ात साठवताना तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे डोळे अक्षरशः सुखावतात.
फुलझाडांच्या असंख्य विविध रचना येथे पाहायला मिळतात. दर्शनी भागात स्वागतासाठी विविधरंगी फुलांनी सजवलेल्या अनेक भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेली मनमोहक फुलं, सात कमानी, सात चांदण्या, पिसारा फुलवलेले मोर, लहान मोठी फुलांची घरे, पिरॅमिडच्या आकारात फुललेली विविध प्रजातीची फुले अत्यंत मोहक आहेत.
मिरॅकल गार्डनच्या ( dubai miracle garden ) प्रवेशद्वारावर बांबूपासून भल्या मोठ्या फुलदान्या बनवून त्यामध्ये रंग-बेरंगी फुलांचा ताटवा उभा केला आहे. जणू हा बाग पहायला येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी फुलांचा गुच्छ होय. आतमध्ये सुरुवातीलाच दोन्ही बाजूला दोन अश्वमुखाची भल्यामोठ्या प्रतिकृती हिरव्यागार वनस्पतींनी साकारली आहे.
त्या दोघांच्यामध्ये अगदी पुराण-पुरुष भासावा, अशा वटवृक्षाची कल्पक प्रतिकृती सिमेंटमध्ये बनवून त्यावर हिरव्या विविध झाडांची उगवण, त्यावर रंगीत फुलांचा ताटवा आणि टोकावर बसूनही जमिनीवर फुलांनी बहरलेला त्याचा पिसारा, असे दोन मोर लक्ष वेधून घेतात.
अगदी खरोखरीचं चक्क विमानच बागेत ठेवलं असून, त्यावरही फुलांची झाडे वाढवली आहेत. हे वेगळंच आकर्षण होय. हिरवाळलेले मोठाले उभे पेंग्विन, फुलांची घरे, भोवताली मिनार, विविधरंगी छत्र्यांच्या सजावटीच्या कमानी, जागोजागीचे पाण्याचे झरे, प्रपात, छोटेखानी तलाव, हत्ती, फुलपाखरांच्या प्रतिकृतीतून फुलांचा फुलोरा सारंच कसं वाळवंटी उष्म्यात सुखद गारवा देणारं नयनरम्य, आल्हाददायक आहे.
बागेतून फिरताना काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं.. फुलांचे रंग तर इतके आकर्षक आहेत की आनंदातिशयाने डोळे मिटून घ्यावंसं वाटत होतं.. जणू डोळय़ात काठोकाठ साठवून घेतलेले सुंदर सुंदर फुलांचे रंग सांडू नयेत असं वाटत होतं. संपूर्ण बागेची रचना, त्यामध्ये निर्मिलेले विविध आकार पाहून मन थक्क झालं.
सात हृदये, सात कमानी, सात चांदण्या, पिसारा फुलवलेले मोर, लहान मोठी फुलांची घरे, पिरॅमिड आणि पायवाटांच्या दुतर्फा फुललेले फुलांचे ताटवे.. उत्कृष्ट रचना करून जागोजागी लटकणाऱ्या फुलांच्या कुंडय़ातून ओसंडून फुललेली फुले.. हे सगळं आपल्या डोळय़ांना त्रिमितीचा अनोखा अनुभव देऊन जाते.
दुबईस्थित ‘आकार लँड स्केपिंग सर्विसेस अँड अॅग्रीकल्चर’ या कंपनीने ‘मिरॅकल गार्डन’ची ( dubai miracle garden ) ही अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. मिरॅकल पुष्पोद्यान या प्रकल्पाची सुरुवात १४ फेब्रुवारी २०१३ मध्ये झाली. त्यासाठी मध्यवर्ती भागात दुबईलॅंड येथे अंदाजे ७ लक्ष २१ हजार चौ. फूट जागा विकसित करण्यात आली. फक्त २ महिन्याच्या कालावधीत ४०० मजुरांच्या अथक परिश्रमातून मिरॅकल पुष्पोद्यानाची निर्मिती झाली. उद्यानासाठी ४० मिलियन दिरहॅम म्हणजे अंदाजे ६० कोटी रुपये खर्च आला.
दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यापर्यंत मिरॅकल पुष्पोद्यान सर्वांसाठी खुले असते. त्यानंतर दुबईतील तीव्र उष्ण तापमानामुळे मे पासून सप्टेंबरपर्यंत पाच महिने बंद असते. परंतु याच कालावधीत आगामी वर्षीच्या नवीन रचनांची तयारी केली जाते. उद्यानात दरवर्षी फुलांच्या रचना केल्या जातात.
फुले टवटवीत ठेवण्यासाठी आणि देखभालीसाठी प्रतिदिन अंदाजे ७ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. यासाठी पर्यावरणपूरक जलसिंचन प्रणाली अवलंबण्यात आली आहे. पाण्याचा पुनर्वापर करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जातो. दुबईतील अनेक पर्यटनस्थळांपैकी मिरॅकल पुष्पोद्यानाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे उद्यानाच्या निर्मितीपासून दरवर्षी अंदाजे १० लाख पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत.
The post दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’ जिथे वाळवंटातही करोडो फुलं फुलतात appeared first on Dainik Prabhat.
“}]]