प्रभात ऑनलाइन – सध्या लोक आपल्या आरोग्याबाबत सजग झाले असून व्यायाम करण्याकडे वळू लागले आहेत. आपल्या सोयीनुसार बरेचजण वर्कआउटच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असतात. त्यातही जिममध्ये जाण्याला अनेकजण पसंती देतात. पण सुदृढ शरीर आणि मांसपेशींसाठी वर्कआउट करत असाल तर पायऱ्या चढणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.
एका सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे की, एक तास जिममध्ये घाम गाळण्याने तुम्हाला जितका फायदा मिळतो, तितकाच तुम्हाला १५ मिनिटे पायऱ्या चढल्याने मिळू शकतो. सर्व्हेनुसार, तुम्ही जर रोज केवळ एका माळ्यावर पायऱ्यांनी घरी किंवा ऑफिसला जात असाल तर ही एक्सरसाइज तुमच्या अर्धा किलोमीटर ट्रेडमीलवर चालण्यासारखीच होईल. जर तुम्ही २ ते ३ वेळा पायऱ्या चढलात आणि उतरलात तर तुम्हाला यानंतर जिमला जाण्याचीही गरज पडणार नाही. पाहुयात, पायऱ्या चढण्याच्या व्यायामामुळे आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात.
1. इन्स्टंट एनर्जी मिळते :
पायऱ्या चढल्याने लगेच एनर्जी मिळते, जी जिममध्ये ५ ते ७ मिनिटे एक्सरसाइज करण्याच्या बरोबर असते. इतकेच नाही तर पायऱ्या चढण्या-उतरण्याने हृदय आणि फुफ्फुसांसाठीही फायदेशीर ठरतं. तज्ज्ञ सांगतात की, पायऱ्या चढणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे. इतकेच नाही तर संपूर्ण शरीराच्या फिटनेससाठीही पायऱ्या चढणे फार फायदेशीर आहे. यानंतर तुम्हाला सांधेदुखी, हाडांचं दुखणं अशा समस्या होत नाहीत.
2. हार्मोन्स सक्रीय होतात :
पायऱ्या चढण्या-उतरण्याने एड्रेनलिन हार्मोन सक्रीय राहतात. या हार्मोन्समुळे हृदयाच्या मांसपेशीपर्यंत रक्ताभिसरण आणि हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यासाठी फार फायदा होतो. पायऱ्या वर चढून जाताना शरीराचा ७०-८५ डिग्री असा अँगल तयार होतो. अशाप्रकारे शरीराचं वाकणं एक चांगली आणि फायदेशीर कार्डियो एक्सरसाइज आहे. याद्वारे एका तासात जवळपास ७०० कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही ट्रेडमिलवर धावाल तर तुम्ही एका तासात केवळ ३०० कॅलरी बर्न करु शकता.
3. मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर :
पायऱ्या चढण्याची एक्सरसाइज केल्याने मसल्समध्ये फॅट जमा होत नाही आणि शरीर व्यवस्थित शेपमध्ये राहतं. याने तणाव दूर करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यासही मदत मिळते. असं नियमीत केल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासही मदत मिळते. तसेच रोजची कामे करण्यासाठी एकाग्रता मिळण्यासाठी मदत होते.
* हळूहळू सवय करा :
अनेकदा लोक पहिल्याच दिवशी जास्त पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांना जास्त थकवा आणि पायांमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीचे दोन-तीन दिवस ३ ते ४ मजले पायऱ्यांनी चढून जाण्यापेक्षा हळूहळू ही संख्या वाढवा. पायऱ्या चढण्याची ही सवय तेव्हाच फायदेशीर ठरु शकते, जेव्हा तुम्ही हे नियमीत कराल. १५ दिवस किंवा एक महिना करुन ही एक्सरसाइज सोडली तर तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्यामुळे या व्यायामाला रुटीनचा भाग करा.
* सर्वांसाठी उपयुक्त व्यायाम :
हा व्यायाम १२ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ७० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत कुणीही करु शकतात. यात व्यक्तीला त्यांची पूर्ण एनर्जी लावावी लागते. तसेच यासाठी ना तुम्हाला पैसे खर्च करावे लागत ना कोणत्या साहित्याची गरज पडत. फिट राहण्यासोबतच या एक्सरसाइजचा फायदा हा आहे की, ही एक्सरसाइज हृदयरोग आणि डायबिटीजचे रुग्ण सहजपणे करु शकतात. हृदयरोगाने ग्रस्त लोकांना जड एक्सरसाइज न करण्याचा सल्ला दिला जातो, पण हळूहळू पायऱ्या चढणे कोणत्याही रुग्णांसाठी परफेक्ट एक्सरसाइज आहे.