तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टी.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलीम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.
तंबाखू आरोग्याला घातक आहे. तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे माहीत असूनही अनेक तरुण आज तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत आणि धोके माहीत असूनही जात आहेत, हे चिंताजनक आहे.
आज युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन वाढत आहे. यात धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत तर दिवसागणिक वाढ होत आहे. हे व्यसन करणाऱ्यांपैकी 70 टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकाराने होतो. तंबाखूच्या वाढत्या व्यसनासह हृदयविकार व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. सिगारेटच्या व्यसनामुळे अचानक हार्टऍटॅकही येऊ शकतो. सिगारेटचा धूर हृदय जाळतोय अन् ज्यांचे हृदय जळतेय, त्याला ते माहीत नाही. सिगारेटच्या धुरात कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण जास्त असते. प्रदूषित हवेतून जेवढया प्रमाणात हा वायू शरीरात जाऊ शकतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात सिगारेटच्या धुरामुळे जातो. धुराबरोबर कार्बन मोनॉक्साइड वायू अधिक, तर प्राणवायू शरीरात कमी शोषला गेल्याने शरीरातील पेशींना प्राणवायू कमी मिळते, यामुळे धमनी-काठिण्य वाढते. रक्तवाहिन्या अशुद्ध होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.
सिगारेटच्या धुरातील कार्बनचे कण व इतर अपायकारक द्रव्यांमुळे श्वसनावर परिणाम होतो. पेशींना प्राणवायू कमी मिळतो. त्यामुळे वायुकोषांची लवचिकता कमी होते. कायमस्वरूपी खोकला व दम लागणे, श्वसनविकार, फुफ्फुसाचा कर्करोग असे आजार संभवतात. कर्करोग तज्ज्ञांच्या मते 50 टक्के लोकांना तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोग होतो. सध्या कर्करोग होण्याचे वय अलीकडे आले आहे. सध्या 25-30 या वयोगटातील तरुणांना कर्करोग होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. अगदी 9-10 वर्षांच्या मुलांनाही कर्करोग झाल्याचे वास्तव समोर येत आहे. याची कारणे शोधायची झाल्यास शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थाचे लागलेले वाढते व्यसन कारणीभूत आहे. शाळेच्या आवारात वा आवारापासून 100 मीटपर्यंत तंबाखू, गुटखा इत्यादींची विक्री न होऊ देण्यास कायदा अस्तित्वात आहे, पण तो फक्त कागदावर असल्याचे दिसत आहे. शाळेत जाता-येताना मुले सर्रास गुटखा, तंबाखूजन्य सुपारी वा अन्य उत्पादनांचा आस्वाद घेतात, याची पालकांना सुतराम कल्पना नसते व लक्षणे दिसू लागतात, तेव्हा उशीर झालेला असतो.
मित्र-मैत्रिणींच्या दबावाला बळी पडून वा नैराश्यामुळे तंबाखू सेवन करणा-यांचा वर्गही मोठा आहे. 25 टक्क्यांच्या जवळपास लोक तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करतात. एका स्वयंसेवी संस्थेने 15 वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांचे सर्वेक्षण केल्यावर त्यात असे समोर आले की, उत्तर प्रदेशातील प्रत्येक सहावी महिला धूम्रपान करत आहे. सध्या उत्तर प्रदेशामध्ये 2009-10 मध्ये झालेल्या सर्वेक्षणापेक्षा धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. तंबाखूजन्य उत्पादनांचा उपयोग करणाऱ्या पुरुषांची सरासरी संख्या 52 टक्के आहे, तर तेच प्रमाण महिलांमध्ये 17.7 टक्के इतके आहे. तंबाखूचा वा तिचे कोणत्यातरी स्वरूपाचे सेवन अहवालानुसार प्रत्येक सहावी महिला करत आहे. गुटखा, खैनी, बिडीचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये मजूर महिलांची संख्या जास्त असून सुरुवातीला शौक म्हणून केलेली सवय आता त्यांचे न सुटणारे व्यसन बनत चालल्याचे या अहवालातून समोर येत आहे.
पान मसाला, गुटखा, सुपारी, इ. सवयी पूर्णपणे थांबवाव्यात. यासाठी बंदीबरोबरच लोकशिक्षण करावे लागेल. तंबाखूमुळे शरीराची किती व कशी हानी होते, याच्या जाहिराती ठिकठिकाणी दिसतात, पण त्याचा परिणाम शून्य दिसतो. भारतात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या 27 कोटींपेक्षा जास्त आहे. जर योग्य खबरदारी घेतली नाही तर 2020 पर्यंत तंबाखूच्या पदार्थामुळे दरवर्षी मरण पावणाऱ्यांची संख्या सुमारे 911 कोटी असेल. इंटरनॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोजेक्टकडून (आयटीसीपी) हा इशारा देण्यात आला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून केल्या गेलेल्या एका सर्व्हेत असे आढळून आले की, तंबाखू, गुटखा, जर्दा, पानमसाला अशी चघळण्याची प्रॉडक्टस जास्त वापरली जातात. तंबाखूच्या अशा उत्पादनांमुळे तोंडाच्या कर्करोगासह अनेक इतर कर्करोग व हृदयरोग असे आजारही संभवतात. या सर्व्हेत असेही दिसले की, तंबाखूची उत्पादने वापरणाऱ्यांपैकी बहुसंख्य लोकांना दुष्परिणामांबाबत, त्यामुळे होणाऱ्या धोक्यांबाबत माहिती असते, पण तरी त्यांना व्यसन सोडण्याची इच्छा नसल्यामुळे अशी उत्पादने वापणाऱ्यांच्या संख्येत भर पडत आहे.
दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू
भारतात तंबाखू नियंत्रणासाठी कायदा आहे, पण कडक अंमलबजावणीअभावी तो फक्त कागदावरच राहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार तंबाखूमुळे जगात दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर हा आकडा 2030 पर्यंत 80 लाख होण्याची शक्यता आहे. जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणात (जीएटीएस-2) महाराष्ट्रातील अल्पवयीन व तरुणांमधील तंबाखू सेवनाबाबत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील प्रौढ मंडळींच्या तंबाखू सेवनात गेल्या सात वर्षात 31.4 टक्क्यांवरून 26.6 टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे, पण 15 ते 17 वयोगटातील नवतरुणांच्या तंबाखू सेवनात मात्र 2.9 टक्क्यांवरून 5.5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तंबाखू सेवनास सुरुवात करण्याचे सरासरी वयही 18.5 (जीएटीएस-1) वरून 17.4 वर्षावर (जीएटीएस-2) येऊन पोहोचले आहे.
धूम्रपान करणाऱ्या महिलांना धोक्याचा इशारा
जगभरात आता पुरुषांपेक्षा महिलांचे धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्लूएचओ) या संदर्भात अहवाल तयार केला आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून हे प्रमाण वाढल्याचे आणि पुरुषांचे धूम्रपानाचे प्रमाण कमी झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आजपर्यंत धूम्रपानामुळे पुनरुत्पादनाच्या दुष्परिणामांमध्ये पुरुषांचा सहभाग जास्त होता आता महिलांचे प्रमाण त्यामध्ये वाढले आहे.
भारतात ग्रामीण भागात महिलांचे बीडी पिण्याचे प्रमाण जास्त होते. काही भागात महिला या पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात बीडी पितात हे आधीच सर्वेक्षणातून पुढे आले आहे. याशिवाय ग्रामीण भागात महिलांचे तंबाखू खाण्याचे प्रमाणही पुरुषांच्या बरोबरीने आहे. मिशरी लावण्यात तर महिलांची आघाडीच आहे. मात्र आता हे लोण शहरी भागातही पसरले असून, धूम्रपानात महिलांची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. काही वर्षांपूर्वी “ग्लोबल अडल्ट टोबेको सर्व्हे’ (जीएटीएस) ने या संदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यातूनही ही माहिती पुढे आली आहे.
उशिरा लग्न, गर्भनिरोधक साधने, करियर, ताणतणाव, बदलेली जीवनशैली या सारख्या अनेक गोष्टी गर्भधारणा उशीरा होण्याला कारणीभूत होत्या. मात्र आता वाईट सवयींमुळे नैसर्गिक गर्भधारणेला अडथळा येण्याचे प्रमाणही वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.
धूम्रपानासारख्या सवयींमुळे स्त्री-पुरुषांमध्ये प्रजननासंबंधीत आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. यामुळे पुरुषांमध्ये “इरेक्टाइल डिसफंक्शन’ आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते तर महिलांमध्ये वंध्यत्व, एक्टोपिक गर्भधारणा, दिवस भरण्याआधीच बाळाचा जन्म, कमी वजनाचे बाळ किंवा गर्भपात अशा समस्या उद्भवू शकतात.
याशिवाय जे पुरुष धूम्रपान करतात त्यांच्या शुक्राणूंमध्ये डीएनएची क्षमता कमी होते. यामुळे प्रजननक्षमता कमी होऊ शकते. स्मोकिंग हे इरेक्टाइल डिसफंक्शनचे कारण असू शकते, जे लैंगिक संभोगाच्या वेळी इरेक्शन राखण्यात असमर्थ ठरते आणि पुनरुत्पादनावर परिणाम करते. हे सामान्य डिम्बग्रंथी कार्यात व्यत्यय आणते, मादींमध्ये अंड्यांची संख्या कमी करून फलित होऊ शकणाऱ्या परिपक्व अंड्यांची संख्या कमी करते. थोडक्यात, धूम्रपान करणाऱ्या स्त्रिया अकालीच रजोनिवृत्तीकडे वाटचाल करतात.
गर्भधारणेदरम्यान धूम्रपान केल्याने गर्भाच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते. यामुळे एक्टोपिक गर्भधारणा, अकाली जन्म, जन्म झालेल्या बाळाचे वजन कमी असणे, गर्भपात, बाळाची फुफ्फुस योग्यरित्या विकसित होऊ शकत नाही, जन्मजात दोष जसे की फाटलेले ओठ आणि/किंवा टाळू, किंवा गर्भपात होऊ शकतो. जन्मानंतर दुस-या पॅसिव्ह स्मोकींगच्या संपर्कात आलेल्या बालकांचा सडन इन्फंट डेथ सिंड्रोमने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त असते. ज्या स्त्रिया जास्त काळ धूम्रपान करतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. पुरुषांप्रमाणे त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची अधिक शक्यता असते. गर्भधारणेमध्ये अडचण, मादीच्या अंड्यांचा दर्जा खराब, अकाली प्रसूती, कमी वजनाची बाळं, हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचे आजार गर्भधारणा आणि प्रसूती प्रक्रियेत गुंतागुंत आदी समस्या उद्भवू शकतात. प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर धूम्रपान सोडण्याचा किंवा मर्यादित ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
==================