प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये त्या निमित्याने सुख संवाद साधला जावा, या गोष्टी रात्रीच्या एकत्र भोजन घ्यावे अथवा व्हावे ह्या कल्पने मागचा हेतू असतो. रात्रीचे एकत्र जेवण ही एक कौटुंबिक स्नेहवर्धनाची संधी असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सर्वांनी एकत्र बसून जेवण्यात जो आनंद आहे, तो खानावळी सारखे एकेकटयांनी जेवण्यात मजा नाही.
रात्रीचे हे जेवण सर्वांनी जसे एकत्र घ्यायला हवे हे कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आणि महत्वाचे आहे. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृती नुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही.
रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टीक आणि समतोल आहार हा संकल्पना निदान ह्या वेळच्या जेवणात तरी प्रयत्नपूर्वक पूर्ण करण्याचा गृहिणी वर्गाचा कटाक्ष असतो.
त्यामुळेच रात्रीच्या जेवणात वरण भात भाजी पोळी, आमटी, चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड, दही, ताक ह्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. तसेच आवडी नुसार पानावर काही तरी थोडेसे का होईना पण गोड पदार्थ वाढण्याकडे गृहिणीचा कल असतो. त्यामागचा हेतू हाच की मानवी शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणारी प्रथिने, जीवनसत्वे, विविध प्रकारचे रस हे या जेवणाच्या माध्यमातून प्रत्येकाला उपलब्ध व्हावेत.
बऱ्याच घरातून वयस्कर,जेष्ठ व्यक्ती, आजारी व्यक्ती ह्यांचा रात्रीचा आहार हा हलका, सहज पचणारा, तसेच तो प्रमाणशीर घेण्याकडेच कल असतो. त्याला कारण असते ती त्यांची कमी झालेली भूक, मंदावलेली पचन शक्ती, अपचनाची भीती, ऍसिडीटीचा संभाव्य त्रास, निद्रा नाशाची भीती आणि त्यामुळे बिघडणारे शारीरिक आरोग्य.
त्यामुळे अशा व्यक्तीना त्यांच्या मना प्रमाणेच हवा तेव्हढाच रात्रीचा आहार घेऊ द्यावा. आपला आग्रह किंवा प्रेमाचा दुसऱ्यास त्रास होणार नाही ह्याची आपणच काळजी घ्यावी. रात्रीच्या जेवणात जर जास्त मसालेदार तेलकट तुपकट भाज्या वा खाद्य पदार्थ असतील तर ते निश्चितच आरोग्यास पूरक न ठरता अपाय कारक ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ वारंवार जेवणात असणार नाहीत ह्याची काळजी घ्यायला लागते.
कितीही आवडीचे आणि आग्रहाचे असले तरी रात्रीचे जेवण घेताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे
आरोग्यदृष्ट्या फार महत्वाचे असते.
रात्रीच्या जेवणात पोळी ऐवजी भाकरीचा पर्याय निवडावा
सततच्या वरण भाताचे जागी मुगाची खिचडी, मसाले भात हे पर्याय निवडावेत.
फळ भाजा आणि पालेभाज्यांची अदलाबदल करीत राहावे.
ज्या व्यक्तींना दही, दूध, ताक, खाण्याची सवय आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात शेवटचा भात हा आमटी भात न खाता तो ताक भात दही भात कढी भात खावा. दूध भात हा तर अधिक उत्तम.
रात्रीचा आहार हा दोन घासांची भूक राखूनच घ्यावा.
रात्रीच्या जेवणानंतर पचनास मदत करणारी सुपारी, बडीशेप, सुपारी, विना सुपारी पान, आवळा सुपारी ह्या सारख्या पाचक वस्तूंचा वापर करावा
जेवणा नंतर लगेच न झोपता थोडी शतपावली करावी वा चक्क फिरून यावे.
जेष्ठ व्यक्तींनी आपापल्या क्षमतेनुसार तसेच आवड आणि गरज ह्या नुसार हा आहार घ्यावा. ज्या पदार्थांची सेवनाने आपल्याला त्रास होईल असे पदार्थ खाणे टाळावे.
तसेच आहार हा फारच कमीही घेतला जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कारण प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी घेतलेला आहार आपल्या झोपेवर परिणाम करतो हे विसरू नये.
रात्रीचे जेवण घेताना पचनास जड असणारे पदार्थ न खाणेच हिताचे असते. रात्री जास्त तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
रात्रीच्या जेवणाची वेऴ सुद्धा निश्चित करून ती फार मागे पुढे होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
तसेच आरोग्याचा विचार करता कोणीही अनावश्यक असे जागरण करू नये.
आपणच आपल्या खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली, खबरदारी पाळली तर आपलेच आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल हे विसरून चालणार नाही.
भोजनोत्तर फिरणे…
संध्याकाळच्या फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने निवृत्त मंडळी, ज्येष्ठ नागरिक, ह्यांचे प्रमाण जास्त असते. त्यांच्या दृष्टीने तोच एक शारीरिक आणि मानसिक उत्साह ताकद आणि उर्जा देणार एक सोपा उपाय असतो. संध्याकाळच्या फिरण्यात सकाळच्या फिरण्या इतकी जलदगती नसते किंवा ती अभिप्रेतही नसते. सकाळचे चालणे हे जलदगतीचे असायला हवे, तर संध्याकाळचे चालणे हे मध्यम गतीचे सुखकारक आणि अवती भवतीचा अस्वाद घेत घेत चालणे होय. साधारणपणे अशा फिरण्यासाठी लोक सहसा एकटे दुकटे न जाता चार चौघांच्या समुहाने फिरायला जातात. अशा संध्याकाळच्या फिरण्याचे अनेक शारीरिक वैयक्तिक आणि कौटुंबिक फायदे आहेत. अर्थात ते लक्षात घेऊन त्यानुसार ते अंमलात आणणेही तितकेच गरजेचे असते.
संध्याकाळच्या फिरण्याचे शारीरिक फायदे
वयोमानानुसार कमी होणाऱ्या किंवा झोप न येणाऱ्या तक्रारीवर चालणे हा उपाय फायदेशीर ठरतो. झोप शांत व चांगली लागते. शारीरिक स्वास्थ चांगले राहते.
शरीराचे वाढत असलेले वजन नियंत्रित राखण्यासाठी, कमी करण्यासाठी चालण्याचा चांगला उपयोग होतो.
दिवसभराच्या कामाने शारिरावर आणि
मनावर येणारा ताण तणाव, थकवा,
दमल्याची भावना दूर होते.
पाठदुखी कमी होते
रक्तदाब मर्यादित राहतो
मन प्रसन्न राहते. विचार सकारात्मक होतात
चालण्याच्या व्यायामाने स्नायू बळकट होतात, शारीरिक क्षमता वाढते.
पचनक्रिया सुधारते.
संध्याकाळी वातावरण शांत प्रसन्न असते.त्याचा आपल्या मनावर परिणाम होऊन मन प्रसन्न आणि उल्हासदायक होते.
चार-चौघांच्यात मिसळल्याने व्यक्तीचा एकटेपणा, घरात बसून आलेला कंटाळा मरगळही दूर होते. समवयस्क मंडळी भेटत असल्याने परस्परांत एक कळत-नकळत संवाद साधण्याची संधी मिळते. एकमेकांची बोलले, मन मोकळ्या गप्पा मारलेल्या, हास्य विनोद केले की, मनावर आलेला ताण तणाव दूर होण्यास मदत होते.
यावेळी आपण कोणाबरोबर आणि कुठे फिरायला जातो ह्यावरही आपल्या मनाला होणारा आनंद अवलंबून असतो. उदा. मैत्रीणींबरोबर आपण फिरायला गेलो तर मने मोकळी होतात. मुला नातवंडांच्या सोबत बागेत फिरायला गेले तर त्यांना तिथे हसता खेळताना पाहून आपल्यालाही आपल्या वयाचा प्रसंगी काही शारीरिक त्रासांचा थोड्या वेळासाठी तरी विसर पडतो.
फिरायला जाण्याबरोबर सहज करता येणारी काही छोटी कामे आवर्जून केली तर घरातल्या लोकांना मदत होते. उदा. भाजी आणणे, दूध आणणे, औषधे आणणे. एखादा महत्वाचा निरोप देणे.
कधी न भेटणाऱ्या व्यक्ती भेटल्या की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. या फिरण्याच्या कार्यक्रमात फिरण्या बरोबरच देवदर्शन सतसंग किंवा कथा कीर्तनाच्या कार्यक्रमाची ह्याच्याशी सांगड घातली तर वेळ अधिक चांगला सत्कारणी लागतो.
मनाचे आरोग्य म्हणजे मन शुद्धी, संकुचितपणा, स्वार्थ, लोभ ह्या सारख्या गोष्टी दूर व्हायला मदत होते.
अशाप्रकारे संध्याकाळचे फिरायला जाणे हे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे.
The post तुम्ही सुद्धा रात्री जेवण उशिरा घेता, तर ‘ही’ स्पेशल बातमी नक्की वाचा… appeared first on Dainik Prabhat.