पुणे -“डोक खूप दुखतंय…अक्षरश: ठणठणतंय…ती लाइट बंद करा…कोणीही आवाज करू नका’ असा त्रास होत असल्यास घरातील एखादी डोकेदुखील कमी करणारी गोळी घेऊन झोपायचे. त्यानंतर तात्पुरता आराम मिळतो. पण, ही डोकेदुखी मायग्रेन तर नाही ना? याची वेळीच तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
वारंवार आणि तीव्र वेदनादायक डोकेदुखी असेल, तर आजची आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असा सल्ला मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. भूषण जोशी यांनी दिला. सामान्य डोकेदुखीमध्ये डोक्यात कोणीतरी सतत ढोल वाजवत असल्यासारखी वेदना होते. थोडी विश्रांती घेतल्यावर किंवा एखादी गोळी घेतली तर लगेच डोकेदुखी थांबते. तर दुसरीकडे, संपूर्ण ढोल-ताशा पथक तुमच्या डोक्यात वाजते अशा वेदनने व्यक्ती अस्वस्थ होतो. उलटी होणे, प्रकाश, आवाज सहन न होणे यांसारखी विविध लक्षणे दिसतात.
मात्र, यावेळी त्या अस्वस्थ व्यक्तीला मायग्रेनचा त्रास असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच फरक सर्वसामान्य डोकेदुखी आणि मायग्रेनमध्ये दिसून येतो. काही कुटुंबांमध्ये मायग्रेन असल्याचे दिसते, ज्यावरून ते अनुवंशिक असल्याचे सूचित होते. विशेषत: महिलांच्या शरीरात संप्रेरकांमध्ये होणारे बदल मायग्रेनचे कारण बनतात. अनेक महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेस हा अनुभव येतो, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
मायग्रेनची कारणे
तेजस्वी प्रकाश, मोठा आवाज, तीव्र वास आणि हवेतील बदल तर अल्कोहोल, कॅफिन, जुने झालेले चीज, प्रक्रिया केलेले अन्न यांसारखे खाद्यपदार्थ आणि शीतपेये मायग्रेनला आमंत्रण देतात. खूप जास्त तणाव, अपूर्ण झोप, गर्भनिरोधक गोळ्या किंवा औषधांचा भडिमार यामुळे मायग्रेन सुरू होऊ शकतो.
डोकेदुखीचे व्यवस्थापन कसे असावे
जीवनशैलीतील बदल करणे, डोकेदुखीची कारणे शोधावी
झोपेचे वेळापत्रक नियमित ठेवणे
तणावाचे व्यवस्थापन, विशेषत: विश्रांती देणारा व्यायाम, योगनिद्रा
संतुलित आहार, पुरेसे पाणी प्यावे
The post तुम्हाला मायग्रेनचा त्रास तर नाही ना…? तीव्र डोकेदुखी ठरू शकते कारण appeared first on Dainik Prabhat.