तुमच्या हेल्दी शरीरासाठी विविध हेल्थ टिप्स…
April 4th, 7:20amApril 3rd, 2:52pm
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
पाठीचे स्नायू दुखावले गेले किंवा ताणले गेले तर पाठ दुखते. ती बरेच दिवस दुखत राहते. विश्रांती घ्या. पाठ दुखत असेल तर पहिल्या दिवशी आराम करा.संपूर्ण विश्रांती घ्या. शारीरिक हालचाली कमीतकमी करा. पण जास्त दिवस आराम करू नका. तुमचे दुखणे किती गंभीर आहे त्यावर किती दिवस आराम करायचा हे ठरवावे. दोन दिवस आराम करूनही पाठदुखी कमी नाही झाली तर आणखी एक दिवस आराम करायला हरकत नाही, पण सामान्य नियम असा आहे की दुखणे थांबताच लगेच कामाला लागा. जास्त वेळ आराम करू नका.
बर्फाने शेका
पाठदुखी अचानक सुरू झाली तर ताबडतोब बर्फाने शेका. त्याने सूज उतरते आणि स्नायूंवरचा ताणही जातो. तत्काळ परिणाम हवा असेल तर बर्फाने मसाज करा. बर्फाची पिशवी दुखऱ्या भगावर ठेवा आणि हलक्या हाताने मसाज करा. सात ते आठ मिनिट मसाज केल्याने पाठदुखी थांबते, पण बर्फ डायरेक्ट दुखऱ्या भागावर लावू नका. नंतर गरम पाण्याने ेशाका.
दोन दिवस बर्फाने शेकूनही पाठ दुखणे थांबले नाही तर तिसऱ्या दिवशी काचेच्या बाटलीत गरम पाणी घेऊन त्याने शेका. पाणी खूप गरम असेल तर बाटली टॉवेलमध्ये गुंडाळा आणि मग शेका. पाणी थोडे थंड झाले की टॉवेल काढून टाका आणि बाटलीने शेका.
डॉक्टरांना केव्हा दाखवावे?
काहीही कारण नसताना पाठ दुखायला लागली, पाठदुखी सोबत ताप, पोट दुखत असेल, छाती दुखत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा ही कोणतीही लक्षणे नसतील व वेदनाशामक गोळ्या घेऊनही दोन दिवसात पाठदुखी थांबली नाही तर डॉक्टरांना दाखवा.
कीटक दंश
कीटक दंश फारसा त्रास देत नाहीत. त्या ठिकाणी आग होते आणि वेदना होतात. काहीवेळाने त्या आपोआप कमी होतात. नाहीच कमी झाल्या तर खालील उपाय करून बघा. आग आणि सूज असेल तर कीटकदंशामुळे खाज आणि सूज आली असेल तर ऍव्हीलची गोळी घ्या.कॅलामिन लोशन लावा. किंवा बर्फ लावा. मीठ पाण्यात कालवून त्याचा लेप लावा. किंवा एक ग्लास पाण्यात बेकिंग सोडा एक चमचा टाका. नीट मिसळा. रुमाल किंवा टॉवेल या मिश्रणात बुडवून तो दंशाच्या जागी ठेवा. इप्सम सॉल्टच्या पाण्यानेसुध्दा आग आणि सूज कमी होते.
कीटक चिकटला असेल तर
कीटक चिकटला असेल तर तो झटकून निघत नाही. ओढून काढला तर त्याची नांगी आतमध्ये राहून जाते. त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते. छोट्या चिमट्याने कीटकाचे डोके अलगद पकडा आणि सावकाश खालच्या बाजूने ओढत राहा. पूर्णच्या पूर्ण बाहेर निघेल असा प्रयत्न करा. नाहीच निघाला तर ती जागा डेटॉलच्या पाण्याने स्वच्छ धुवा. अँटीसेप्टीक मलम लावा. वरून कॉटन गॉझ लावा आणि बॅंडेज लावा.
कीटक दंश झाल्यानंतर आठ आठवड्यांनी लाइम डीसीज नावाचा एक रोग होऊ शकतो. दंशाच्या जागी मध्ये खड्डा असलेला फोड येतो. सर्दीसारखी लक्षणे दिसतात. थकवा येतो. थंडी वाजून येते. अंग दुखते.
कोणताही कीटक चावला तर तो कीटक एका बाटलीमध्ये ठेवा. दोन महिन्यांनी वर सांगितलेली लक्षणे दिसली तर बाटलीतला कीटक डॉक्टरांना दाखवा. म्हणजे डॉक्टरांना निदान करणे व उपचार करणे सोपे जाईल काहीजणांना कोणताही कीटक चावला तर मळमळ उलटी होते. चक्कर येते, रक्तदाब एकदम कमी होतो. श्वास घ्यायला त्रास होतो. तो बेशुध्द पडतो. ही सगळी ऍनाफिलॅक्टीक शॉची लक्षणे आहेत. अशा वेळेस अतिशय तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे आहे
कान दुखणे
हवेचे संतुलन राखण्यासाठी घसा आणि कान याना जोडणारी एक युस्टेशियन टयुब नावाची नलिका असते.ती पोकळ असते, पण सर्दीमुळे ती चोंदली असेल तर कान दुखायला लागतो. पोहताना पाणी कानात गेल्यामुळे कान दुखतो. विमान खूप उंचावरून उडत असेल तर काही प्रवाशांना कानदुखीचा त्रास होतो. समुद्रामध्ये खूप खोलवर डायव्हींग केले तर कान दुखतो. दात दुखत असेल, टॉन्सील सुजले असतील, घसा सुजला असेल, जिभेला किंवा जबड्याला वेदना होत असतील तर ते दुखणे कानातही पसरते.
कान दुखणे थांबण्यासाठी खालील उपाय करुन बघा
हेअर ड्रायर वापरा. घरी हेअर ड्रायर असेल तर तो सुरू करा. त्याची गरम वाफ कानात सोडा. कानदुखणे लगेच थांबते. ड्रायर अगदी स्लोवर ठेवा. हवा खूप गरम करायची नाही. ड्रायरचं नोझल कानापासून दीड दोन फूट अंतरावर ठेवून कानात गरम हवा सोडा.
नाक बंद करा
32000 फूटांवरून तुम्ही विमानाने प्रवास करीत आहात, अचानक कान दुखायला लागले तर नाक बंद करा. तोंडाने हवा भरून गाल फुगवा आणि तोंड बंद करून तोंडातली हवा बंद झालेल्या नाकावरची बोटं काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहात अशी कल्पना करून जोर लावा. कानातला हवेचा दाब आणि बाहेरच्या हवेचा दाब सारखा झाला की पॉप असा आवाज येतो व कानाचे दुखणेही बंद होते.
चुइंगम चघळा
विमान प्रवासात कानात दडे बसले तर चुइंगम चघळा. लगेच कान मोकळे होतात. पण हे विमानातच होते असे नाही. जमिनीवरही कानात दडे बसले तर चुइंगम चघळल्याने कान मोकळे होतात. चघळण्याच्या क्रियेने व स्नायूंच्या हालचालीने युस्टेशियन टयुब मोकळी होते.
जांभई द्या
जांभई दिल्याने स्नायूंच्या ज्या हालचाली होतात त्यामुळे बंद झालेली युस्टेशियन टयुब मोकळी होते.कानातले दडे मोकळे होतात. चुइंगम चघळण्यापेक्षा हे चांगले आहे.
विमान खाली उतरण्याच्यावेळेस झोपू नका
विमानात डुलकी किंवा झोप घ्यायची असेल तर ती विमानानं उड्डाण केल्यानंतरच्या प्रवासात करा. विमान खाली उतरायची वेळ झाल्यावर झोपू नका. आपण जागेपणी जेवढे आवंढे गिळतो तेवढे झोपेत गिळत नाही. त्यामुळे विमान खाली उतरताना हवेचा दाब कमी होत असल्यामुळे कानात दडे बसण्याची शक्यता जास्त असते.
फोड फोडावा की नाही
एखादा किडा घासल्यामुळे, भाजल्यामुळे किंवा जखम पिकल्यावर फोड येतो. त्यात पू असतो किंवा नितळ पाणी असते. त्यात कधी वेदना असते, कधी नसते. हा फोड फोडावा की नाही?
तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात जो फोड मोठा असतो आणि खूप दुखतो तो फोडायला हवा आणि जो फोड दुखत नसेल आणि लहान असेल तो फोडू नये.
फोड फोडायाचा असेल तर डॉक्टरांकडून फोडावा.किंवा मग घरातली सूई मेणबत्तीवर चांगली लाल होईपर्यंत तापवावी आणि त्याने फोडावा.
कधीकधी फोड आपोआप फुटतो. त्यातले पाणी किंवा पू थोडासा दाब देऊन पूर्णपणे काढावे. पण वरची त्वचा अजिबात काढू नये. काढल्यास जखमेचा आकार वाढतो आणि जखम बरी व्हायला वेळ लागतो.
फोड फोडल्यावर डेटॉलच्या पाण्याने स्वच्छ धुवावा.अँटीबायोटिक मलम किंवा पावडर टाकून वर गॉझ ठेवून बॅंडेजने बांधवा. एक दिवसाआड ड्रेसिंग करावे.
सुई निर्जंतुक कशी करावी
ते वर सांगितले आहेच. काही जणांचे मत असे आहे की सुई अल्कोहलमध्ये बुडवावी. मग फोड फोडावा. पण अल्कोहल सर्वांच्या घरात असतेच असे नाही. पण आफ्टरशेव्ह लोशनमध्ये अल्कोहल असते. त्यात सूई बुडवली तरी हरकत नाही.
पण अल्कोहलमध्ये सूई बुडवल्याने ती पूर्ण निर्जंतुक होईल याची खात्री देता येत नाही. त्यापेक्षा सूई लाल होईपर्यंत तापवणे हे सर्वात चांगले. उष्णतेमुळे सर्वच बॅक्टेरिया खात्रीने मरतात.
चिकटपट्टी लावावी की बॅंडेज बांधावे?
फोड लहान असेल तर ड्रेसिंग केल्यावर म्हणजे मलम किंवा पावडर लावल्यावर वर गॉझ लावल्यावर चिकटपट्टी लावायला हरकत नाही. जखम मोठी असेल तर चिकटपट्टी लावू नये. एकतर ती नीट चिकटत नाही. किंवा चिकटली तर ड्रेसिंग बदलताना काढायची असेल तर ओढून काढावी लागते. त्याने चांगल्या त्वचेला इजा होऊ शकते. म्हणून फोड मोठा असेल तर बॅंडेजच बांधावे.
ड्रेसिंग नेहमी एकदिवसाआड बदलावे
सर्व डॉक्टरांचे हेच मत आहे. त्याला कारण असे आहे की जखम भरून येताना जी नवीन त्वचा खालून वर येत असते ती खूप नाजूक असते. रोज ड्रेसिंग केले तर नवीन त्वचा जखम पुसताना निघून जाते.मग पुन्हा नवीन त्वचा यायला आणखी एक दिवस लागतो. त्वचा नविन तयार झाली की ती निबर व्हायला दोन दिवस लागतात.म्हणून ड्रेसिंग एक दिवसा आड करावे. म्हणजे जखम लवकर भरून येते.
– डॉ. अरुण गद्रे