पुणे – डायरिया म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, आपण त्याला अतिसार म्हणतो. अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे आणि मलाचे प्रमाण वाढणे ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. अतिसार म्हणजे अन्ननलिकेची पोट साफ करण्यासाठीची अति हालचाल.
वैद्यकीय व्याख्येनुसार तीनशे ग्रॅम हून अधिक शौच म्हणजे अतिसार. यातील 60-65 टक्के पाणी असते. या व्याख्येनुसार अतिसार म्हणजे शौचास अधिक वेळा जावे लागणे किंवा शौच स्वतःच्या नियंत्रणाशिवाय अधिक वेळा होणे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तीव्र अतिसार एक आठवड्यांचा आणि दीर्घ म्हणजे 2-3 आठवड्यांचा. विषाणुजन्य आणि जिवाणुजन्य संसर्ग हे अतिसाराचे प्रमुख कारण आहे. ज्यावेळी मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याची यंत्रणा कोलमडून पडते त्यावेळी अतिसार होतो.
अतिसार बहुधा संसर्ग किंवा अशा आजाराचा परिणाम आहे. मोठ्या आतड्यातील काही द्रव्ये उदाहरणार्थ मेद आणि पित्त आम्ले जल शोषणामध्ये अडथळा आणतात. अशा वेळी अतिसार होतो. मोठ्या आतड्यातून एखादा पदार्थ जेव्हा नेहमीपेक्षा वेगाने जातो त्यावेळी सुद्धा अतिसाराची लक्षणे दिसतात. अतिसारसंबंधी लक्षणे सामान्यपणे अन्न मार्गाशी जोडलेली आहेत.
उदाहरणार्थ ताप, मळमळ, उलट्या आणि पोटात दुखणे वेदना. एका दिवसात वीस वेळा शौचास जावे लागणे अतिसाराच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. काही रुग्णामध्ये शौचावाटे रक्त किंवा पू जातो. शौचावाटे जाणाऱ्या रक्तामुळे शौचाचा रंग काळा होतो. शौच फ्लशच्या पाण्यावर तरंगणे म्हणजे शौचामध्ये न पचलेले अन्नद्रव्य शिल्लक आहे. अपचनामुळे बहुधा असे होते. सर्वात नेहमीचे अतिसाराचे कारण म्हणजे जंतुसंसर्ग.
अतिसाराची लक्षणे –
पोटात दुखणे, शरीरात पाण्याची आणि मीठाची कमतरता, उल्टी, ताप अणि अंग दुखणे, अशक्तपणा जाणवणे , सतत चक्कर येणे विशेषकरून उन्हाळ्यात अतिसारामुळे अनेकजण त्रस्त असतात. अतिसाराने फक्त पोटाच्या समस्या वाढत नाहीत, तर शरीरात अशक्तपणा जाणवतो. उन्हाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात डोके वर काढते. जंक फूड्स आणि तेलकट पदार्थांच्या अती सेवनाने डायरिया होण्याची शक्यता असते. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानेही हा त्रास होऊ शकतो. लोकांची पाचक शक्ती कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवते.
त्यासाठी साधे उपाय-
नारळपाणी प्यावे : उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीरास अनेक फायदे होतात. डायरियारग्रस्त रुग्णांसाठी नारळपाणी अतिशय प्रभावशाली आहे. कारण नारळ पाण्यात जीवनसत्त्व आणि मिनरल्स योग्य प्रमाणात असतात.
ओआरएस प्यावे : उन्हाळ्याच्या दिवसात ओआरएस आरोग्यासाठी लाभदायक असतो. डायरियाच्या रुग्णांनी ओआरएस प्यायल्याने त्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मीठ आणि साखर एकत्र करून थोड्या थोड्या वेळाने त्याचे सेवन करावे.