
टेनिस एल्बो : म्हणजे नक्की काय आहे?
July 27th, 8:45amJuly 27th, 8:45am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
साधारणपणे बाहू किंवा मनगट यांच्या सततच्या कष्टप्रद हालचालीमुळे कोपरामधील स्नायूबंधांवर अतिरिक्त भार आल्याने उद्भवणारी नाजूक स्थिती म्हणजे टेनिस एल्बो. तांत्रिकदृष्टया या दुखण्याला लॅटरल एपिकॉन्डायलिटिस म्हणूनही ओळखले जाते.
कोपराच्या सांध्याच्या अगदी वरच व बाहूच्या बाहेरच्या भागामध्ये सूज आल्याने ही स्थिती निर्माण होते. अशावेळी कोपर आणि कोपरापासून मनगटापर्यंतचा हात (फोरआर्म) या परिसरातही वेदना जाणवू शकतात. हे स्नायू टेनिस खेळामध्ये जास्त वापरले जात असल्याने याला “टेनिस एल्बो’ म्हणत असावेत.
बोटे ताठ करणे, मनगट वरच्या बाजूला दुमडणे आणि तळहाताची बाजू वर येईल, अशा पद्धतीने फोरआर्म दुमडणे अशा क्रियांसाठी हे स्नायू वापरले जातात. अचानक झालेल्या हालचालींचा परिणाम म्हणून तसेच लहान स्वरूपाचा भार सातत्याने पडत राहिल्यामुळे अखेर एखादा दोर वापरून वापरून झिजावा तशाप्रकारे कोपराच्या भागातील उतींना हानी पोहोचते. या उतींना पूर्ववत होण्यासाठी पुरेसा आराम आणि वेळ दिला गेला नाही, तर आधीच ताण सहन करणारे स्नायूबंध कायमचे कमकुवत होऊन जातात. त्यामुळे एखादी गोष्ट पकडण्याची आपली क्षमताही कमकुवत होऊन जाते.
बहुतेक मंडळी दीर्घकाळापर्यंत अशा दुखण्याकडे दुर्लक्ष करतात आणि वैद्यकीय मदत घेण्यास विलंब करतात. अनेकदा या दुखण्याची लक्षणे अतिशय सौम्य असतात व थोडीशी विश्रांती घेतली की, नाहीशी होतात. स्वत:हूनच जवळच्या दुकानांमध्ये मिळणारी वेदनाशामक औषधे घेतल्याने सुरुवातीच्या टप्प्यावर बरेही वाटते; त्यामुळे या दुखण्याचा दैनंदिन कामामध्ये अडथळा होऊ लागतो व वेदना असह्य होऊ लागतात तेव्हा कुठे डॉक्टरची आठवण होते.
टेनिस एल्बोसाठी कारणीभूत ठरत असतील, अशी कामे ओळखा आणि त्यात सुधारणा करा, म्हणजे गंभीर दुखापतीचा धोका टळू शकेल. जोरदार हालचालींची गरज असलेली कामे करण्यासाठी वारंवार बोटे, मनगट आणि फोरआर्म यांचा सातत्याने अतिवापर करणे, शरीर अवघडलेल्या स्थितीत असणे आणि विश्रांतीचा अभाव यासुद्धा काळजीच्या बाबी आहेत. तुमच्या हातांच्या सकयूंवर अति भार देणारी किंवा खूप ताण देणारी कामे टाळा. वेळीच लक्ष दिल्यामुळे गंभीर समस्या तयार होण्याची शक्यता कमी होते.
कोपरातील वेदनेला कारणीभूत ठरणाऱ्या क्रिया टाळणे हे टेनिस एल्बोवरील उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. हे दुखणे सेल्फ लिमिटिंग म्हणजे आपणहूनच बरे होणारे असल्याने वेदनांना कारणीभूत ठरणाऱ्या कृती टाळल्या किंवा बदलल्या की, वेदना आणि अवघडलेपणा अखेर नाहीसा होतो.
टेनिस एल्बो : अशी घ्या काळजी…
आपल्याला अडचणीत आणू शकतील, अशी कामे ओळखा व टाळा. शरीराची ढब व हालचालींत सुधारणा घडवून आणा. सूज किंवा वेदना कमी करण्यासाठी आइस पॅक किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेल्या नॉन-स्टेरॉइडल, अँटी-इन्फ्लेमेटरी औषधांसारखी तोंडावाटे घ्यायची नाही, तर दुखणाऱ्या जागेवर लावायची औषधे घ्या. हलके स्ट्रेचेस, एक्सेंट्रिक आणि कॉनसेन्ट्रिक स्ट्रेंदनिंग अशा व्यायामपद्धती वापरा. दुखणे बरे होण्याच्या प्रक्रियेला बळ देण्यासाठी, कोपराची उच्चतम कार्यक्षमता पूर्ववत व्हावी यासाठी व व्यक्तीला पुन्हा कामाला लागण्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी फिजिओथेरपीची मदत घ्या.