
जाणून घ्या… स्वास्थदायी हास्ययोगाचे फायदे
June 15th, 10:06amJune 15th, 10:06am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
आपण खेळाशी संबंधित काही हास्यप्रकार पाहणार आहोत. मुख्यत: क्रिकेट हास्य पाहणार आहोत. खेळण्यात हसणे असावे, तसे हसण्यातही खेळ असावेत असे मला वाटते. कारण हसण्याचा आणि खेळाचाही जवळचा संबंध आहे. खेळताना हारजित ही असतेच.
पण हार किंवा पराभवदेखील खिलाडू वृत्तीने आणि हसतमुखाने स्वीकारायला खेळ शिकवतात. मग ते खेळ कोणतेही असोत. भारतीय वा परदेशी; मैदानी वा बैठे. त्यातला आनंद घ्यायचा असेल तर खिलाडू वृत्ती ही अनिवार्य आहे.
आजकाल क्रिकेटचे वारे जोरात वाहत आहेत. तसे ते नेहमीच वाहत असतात. कारण वर्षभर कोठे ना कोठे क्रिकेट चालू असतेच. क्रिकेटमध्ये भारताची विजयी घोडदौड सर्वत्रच चालू असल्याने सर्व क्रिकेटप्रेमी अतिशय खुशीत आहेत. तेव्हा या वेळी क्रिकेट आणि इतरही काही खेळांशी संबंधित हास्यप्रकार पाहणे औचित्यपूर्ण आहे. क्रिकेटप्रमाणे बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग आणि लेझीम यांच्याशी संबंधित हास्यप्रकार आपण पाहणार आहोत.
क्रिकेट हास्य
(Cricket Laughter)
क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. त्यात दोन संघात सामना चालू असतो. तेव्हा क्रिकेट हास्य करताना आपण सभासदांच्या संख्येनुसार त्यांचे दोन वा चार गट करून म्हणजे दोन वा चार टीम करून दोन रांगात एकमेकांकडे तोंड करून उभे राहावे. एक गट बॅटिंग करील तर दुसरा फिल्डिंग करील.
एका गटातील सर्वांनी हातात बॅट धरली आहे असे समजून बॅटिंग करण्यासाठी योग्य तो पवित्रा घेऊन उभे रहा. विरुद्ध गटातील सर्वांनी आपापल्या हातात चेंडू घेतला आहे असे समजून बॉलिंग व फिल्डिंग करण्यासाठी तयार व्हा.
या गटातील प्रत्येकाने थोडे पळत येऊन हा।।। असे म्हणत हात गोल फिरवून चेंडू टाकल्याचा अभिनय करा. समोरील गटातील सर्वांनी आपापल्या बॅटीने चेंडू जोराने मारल्याचा अभिनय करून हा हा हा हा असे म्हणत पळत जाऊन धाव काढा. पुन्हा दुसऱ्यांदा चेंडू टाकून तो बॅटने मारल्यावर गोलंदाजी करणाऱ्यांनी तो चेंडू झेलल्याचे दाखवून आ।ऊट असे ओरडून हास्याचा गजर करा.
नंतर दोन्ही गटातील लोकांनी आपापल्या भूमिका बदलून बॅतिंग करणारांनी फील्डिंग करावी आणि फिल्डींग करणारांनी बॅटिंग करावी आणि अशा तर्हेने पुन्हा क्रिकेट खेळल्याचा आनंद वरीलप्रमाणे कृती करून घ्या. नंतर सर्वांनी मिळून हास्याचा स्फोट करून झालेला आनंद साजरा करा.
मुष्टियुद्ध हास्य
(Boxing Laughter)
या हास्य प्रकारात मुष्टियुद्ध खेळताना हातापायाच्या किंवहुना सर्व शरीराच्या जशा जोशपूर्ण हालचाली होतात तशा करून, नंतर हास्याचा निनाद करायचा आहे. प्रथम जोड्या करा. जोडीतील दोघांनी एकमेकांकडे तोंड करून हाताच्या अंतरावर उभे राहा. एक पाय पुढे टाकत, हात कोपरात दुमडून मुठी वळून छातीजवळ घ्या. नंतर हा, हा असे म्हणत.
मुष्टियोद्धे करतात तसा आविर्भाव करत, हातापायांच्या पुढे मागे अशा विशिष्ट हालचाली करत, छोट्या छोट्या उड्या मारत, इकडे तिकडे वळत, गोल फिरत, एकमेकांना हाताने ठोसे मारल्याचा आविर्भाव करा. नंतर दोन्ही हातांनी भराभर ठोसे मारा. नंतर हो ।।। असे म्हणत शेवटचा निर्णायक ठोसा मारा व हात उंचावून हाहाहा ।।। असे विजयी हास्य करा.
या हास्य प्रकारामध्ये सर्व शरीराच्या, विशेषतः हाता-पायांच्या होणाऱ्या विशिष्ट जलद हालचालीतून उत्तम व्यायाम साधला जातो व मुष्टियुद्ध खेळल्याचा आनंदही मिळतो. अनेक जोड्या अशा रीतीने मुष्टियुद्ध खेळत असल्याचे दृश्य फारच प्रेक्षणीय वाटते व सर्व वातावरण चैतन्यमय होते.
वजन उचलणे हास्य
(Weight Lifting Laughter)
या हास्यप्रकारामध्ये आपल्याला वजन उचलण्याचा अभिनय करून हास्यानंद मिळवायचा आहे, तसेच व्यायाम साधायचा आहे. जमिनीवर ठेवलेल्या लोखंडी दांड्यामध्ये दोन्ही टोकांना योग्य ती वजने अडकवली असून ती आपल्याला उचलावयाची आहेत असे समजून दोन्ही पायात अंतर ठेवून उभे रहा. पुढे वाकत दोन्ही हातांनी दांडा धरा.
नंतर जोरदार श्वास घेऊन तो रोखून ठेवत गुडघे वाकवून हो।।। असे म्हणत दोन्ही हातांनी वजन थोडे उचलून पुन्हा खाली ठेवा. असे 2-3 वेळा केल्यानंतर हो।।। हा असे पुन्हा म्हणत वजन उचलून ते छातीजवळ घेत गुडघे वाकवत खाली बसा.
नंतर पुन्हा हा।।। हा असे म्हणत जोर लावल्याचा अभिनय करीत दोन्ही हात एका झटक्यात उंचावून वजन वर उचलून ते सहजपणे तोलून धरल्याचा अभिनय करा. नंतर ते वजन पुढच्या बाजूला धाडकन खाली आपटा व विजयी हास्याचा गजर करा.
या हास्यामुळे वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन विक्रमी वजन उचलून बक्षीस मिळवायची आपल्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होऊन मनाला इच्छापूर्तीचा आनंद तर होतोच पण हात, पाय, खांदे, गुडघे इ. अवयवांना होणाऱ्या उत्तम व्यायामाचा बोनसही मिळकतो. हास्य संघातील सर्वांनी एकाचवेळी हा हास्य प्रकार केल्याने सगळीकडे उत्साहाचे व आनंदाचे चैतन्यमय वातावरण तयार होते.