हल्ली डाएटिंगच्या ज्या काही प्रणाली प्रचलित आहेत, त्यात सुपरफूडचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. पण सुपरफूडचा फायदा जेव्हा तुम्ही संतुलीत आहाराबरोबर ते घेता तेव्हाच होतो. सुपरफूडच्या नादात संतुलित आहार घेण्याचे टाळू नका. त्याचबरोबर तुम्ही ज्या भागात राहता, तेथे सहजपणे जे सुपरफूड उपलब्ध आहे, तेच खा. सुपरफूडही बदलून बदलून खा, म्हणजे त्याचा फायदा संपूर्ण शरीराला होतो.
पौष्टीक आहारावर चर्चा खूप होते. पौष्टीक आहारात समाविष्ट होणाऱ्या पदार्थांची यादीही खूप मोठी आहे. पण यात असे अनेक पदार्थ असतात, जे जास्त फायदेशीर असतात. त्यांच्यात इतर पदार्थांच्या तुलनेत जास्त पोषक घटक असतात. मात्र सुपर फूडचा फायदा तुम्ही संतुलित आहार घेत असाल तरच होतो आणि सुपरफूडही बदलून बदलून घेतले पाहिजे. कारण यातील प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे फायदे आहेत. यातील काही सुपरफूडविषयी आपण जाणून घेऊ या.
बदाम
बदामात अनेक प्रकारचे पौष्टीक घटक आहेत, त्याचबरोबर विटॅमिन ई, कॅल्शियम, चांगले फॅट, फायबर, प्लांट प्रोटीन, लोह, झिंक वगैरे मोठ्या प्रमाणात असते.
कोलेस्टोरॉल कमी करण्यात याची मदत होते. यात असलेल्या मॅग्नेशियममुळे रक्तातील साखरेचा स्तर योग्य प्रमाणात राहतो.
बदामातील झिंकमुळे मेंदूला बळकटी मिळते आणि म्हातारपणात पार्किन्सन्ससारख्या आजारापासून बचाव करण्यास मदत होते. यातील मायक्रो-न्यूट्रीयंट केसांसाठी चांगले असतात.
मात्र अधिक प्रमाणात खाल्ले तर वजन वाढू शकते.
रोज बदाम किती खायचे ?
रोज किमान 11-12 बदाम खावेत. यापेक्षा कमी खाण्याचा फायदा नाही
आणि त्यापेक्षा जास्तही खाऊ नका. तुम्ही जर इतर सुकामेवा खात असाल तर त्या हिशोबाने बदामाचे प्रमाण कमी करा.
कसे खायचे?
बदाम सरळ तोंडात टाकून स्नॅकप्रमाणे खाऊ शकता. बदामाची पूड करून ती दुधात घालूनही घेऊ शकता. बदामाचे साल काढू नका. त्यात फायबर असते. उन्हाळ्यात बदाम भिजवून खा. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.