पुणे – राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. एन. सोमशेखर यांच्या माहितीनुसार, भारतात 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाच्या विषाणूचा संसर्ग आढळतो, मात्र केवळ 10 टक्के लोकांनाच क्षयरोगाची लागण होते. एवढेच नव्हे तर जगातील क्षयरोगाच्या एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण एकट्या भारतात आहेत.
24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त एका वेबिनारचे आयोजन पत्र सूचना कार्यालयाने केले होते. त्यानिमित्ताने क्षयरोगासंबंधी माहितीचा ऊहापोह करण्यात आला. यामध्ये डॉ. सोमशेखर त्यांच्याशिवाय राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. रविचंद्र यांनी देखील सहभाग घेतला होता. क्षयरोग अत्यंत संसर्गजन्य आहे, वेळेत उपचार केले नाहीत; तर मृत्यूही ओढवतो. क्षयरोग हा “मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसिस’ नावाच्या जीवाणूमुळे होतो जो बहुतांशवेळा फुफ्फुसांवर परिणाम करतो.
संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याच्यावेळी तोंडातून बाहेर पडणाऱ्या थेंबांतून क्षयरोग सहज पसरू शकतो, ज्यामुळे हा आजार अतिशय संसर्गजन्य बनतो. जगातील एक तृतीयांश लोकांमध्ये क्षयरोगाचे संक्रमण दिसून येते; परंतु याचा अर्थ असा नाही, की ते सगळे क्षयरोगी आहेत. भारताच्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जीवाणू असतात, पण त्यांना क्षयरोगाचे संक्रमण झालेले नसू शकते. यापैकी केवळ 10 टक्के व्यक्तींना क्षयरोग होण्याची शक्यता असते, असे मत यावेळी मांडण्यात आले होते.
खालावलेली रोगप्रतिकार शक्ती हे क्षयरोग होण्याचे एक सर्वसामान्य कारण समजले जाते, ज्यामुळे क्षयरोग संक्रमण हे क्षयरोगात परिवर्तीत होते. एचआयव्ही, तणाव, मधुमेह, फुफ्फुसांचा आजार असलेले, मद्यपान करणारे, धूम्रपान करणारे, ज्यांची एकूणच प्रकृती खालावलेली असते अशा लोकांना क्षयरोग होण्याची अधिक शक्यता असते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या टप्प्यावर या गटातील लोकांमध्ये ही लक्षणे तीव्रपणे दिसून येतात.
एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे क्षयरोग. एचआयव्ही रुग्णांमध्ये सर्वात मोठे संक्रमण असते ते क्षयरोग विषाणूचे. नखे आणि केस या व्यतिरिक्त शरीराच्या कुठल्याही अवयवावर क्षयरोगाचा परिणाम होऊ शकतो. शरीरात जेथे रक्त पोचते त्या सर्व भागांवर त्याचा परिणाम होतो.
क्षयरोगाचे प्रकार आणि लक्षणे
ढोबळमानाने क्षयरोगाचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये फुफ्फुसांचा क्षयरोग (पल्मनरी ट्युबरक्युलोसीस) – याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो आणि एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस – याचा परिणाम फुफ्फुसांसोबतच इतर अवयवांवर देखील होतो.
क्षयरोगाचे लक्षणेदेखील दोन प्रकारांत विभागली जाऊ शकतात – सामान्य लक्षणे आणि अवयव विशिष्ट लक्षणे. दोन आठवड्यांपेक्षा जास्त असलेला खोकला हे सर्वात जास्त आढळून येणारे लक्षण आहे. वजन कमी होणे, भूक न लागणे, रात्री ताप येणे ही सर्व प्रकारच्या क्षयरोगाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. छाती दुखणे, थकवा, झपाट्याने वजन कमी होणे, थुंकित रक्त येणे, ही “एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलॉसिस’च्या रुग्णांत आढळणारी इतर लक्षणे आहेत.
क्षयरोगाचे आणखी दोन गंभीर प्रकार आहेत – मिलीअरी क्षयरोग आणि क्षयरोग मेंदूज्वर.
मिलीअरी क्षयरोग – याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.
क्षयरोग मेंदूज्वर – याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. यामुळे डोकेदुखी, ग्लानी, गुंगी अशी लक्षणे दिसतात. “लीम्फ नोड क्षयरोग’ हा सर्वात जास्त आढळून येणारा एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस आहे. यात मानेवर सूज येते आणि किशोरवयीन मुलींमध्ये हा आजार सर्वाधिक दिसून येतो.
क्षयरोगाचे दुर्मिळ प्रकार म्हणजे त्वचेचा क्षयरोग, डोळ्याचा क्षयरोग. क्षयरोगाचे इतरही प्रकार आहेत ज्यांचा परिणाम हृदयाचे आवरण, आतडे आणि हाडांवर देखील होतो. आपल्या देशात वंध्यत्वाचे सर्वात मोठे कारण हे क्षयरोग देखील आहे. भारताच्या सुधारित राष्ट्रीय
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा उद्देश, देशाला 2030 पर्यंत क्षयरोग मुक्त करणे हा आहे. भारताने संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टांवर स्वाक्षरी केली आहे. वर्ष 2030 पर्यंत जगाला क्षयरोग मुक्त करणे हे उद्दिष्ट असल्याचे या चर्चेतून अधोरेखित करण्यात आले होते.
शब्दांकन- अंजली खमितकर