सध्याच्या धावपळीच्या काळात लोकांचे केस गळण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत खूप वाढले आहे. अगदी लहान वयातच लोकांना केस पांढरे होण्याच्या आणि केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते, ज्याची अनेक कारणे असू शकतात. पण एक प्रमुख कारण म्हणजे लोकांकडे केसांची काळजी घेण्यासाठी वेळ नसणे, हा आहे. यावर एकच मार्ग उरतो, तो म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट अर्थात केस प्रत्यारोपणाचा. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत हेअर ट्रान्सप्लांट उद्योगही झपाट्याने वाढत आहे. मात्र, यासाठी लोकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्याचबरोबर केस प्रत्यारोपणाचे दरही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे ठरवले जातात.
यासाठी लोकांना हजारो रुपयांपासून लाखो रुपये खर्च करावे लागतात. केस प्रत्यारोपणासाठी अनेक देश प्रसिद्ध आहेत, जिथे परवडणारी किंमत आणि उत्तम काम केले जाते. चला तर, जाणून घेऊयात कोणत्या देशात केशारोपणाची सर्वोत्तम ऑफर दिली जाते.
अलीकडील आकडेवारीनुसार, हेअर ट्रान्सप्लांटसाठी तुर्की हे सर्वोत्तम ठिकाण असल्याचे सिद्ध होत आहे. अहवालानुसार, गेल्या काही काळापासून केस प्रत्यारोपण करू इच्छिणारे बहुतेक लोक तुर्कीकडे वळताना दिसत आहेत, जेथे परदेशातूनही मोठ्या संख्येने लोक केस प्रत्यारोपणासाठी येतात.
तुर्कीमध्ये केस प्रत्यारोपणासाठी परदेशातून येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, त्यामागील मुख्य कारण म्हणजे इथे अत्यंत स्वस्तात टक्कल पडलेल्या लोकांच्या डोक्यावर केस लावले जात आहेत. तसेच, हे केस प्रत्यारोपणाची सर्वोत्तम प्रक्रिया असल्याचे सांगितले जात आहे.
एका क्लिनिकनुसार, तुर्कीमधील नामांकित क्लिनिकमध्ये केस प्रत्यारोपणाची सरासरी किंमत १.५ लाख ते ६.५० लाख रुपयांपर्यंत असू शकते. तथापि, ही किंमत अनेक घटकांवर देखील अवलंबून असते, ज्यामुळे त्याची किंमत वाढते किंवा कमी होते.
केशारोपणासाठी नेमक्या किती कलमांची (Grafts) गरज आहे, कोणती तंत्रे आणि पद्धती वापरावी लागतील, तसेच सर्जन आणि त्यांच्या टीमचा अनुभव, हे सर्व घटक केस प्रत्यारोपणाच्या खर्चावर परिणाम करतात. अहवालानुसार, यूकेसह बहुतेक पश्चिम युरोपीय देशांमध्ये केस प्रत्यारोपणाची किंमत तुर्कीमधील दरापेक्षा खूप जास्त आहे.
वास्तविक, तुर्कीमध्ये केस प्रत्यारोपणासाठी इस्तंबूल सर्वात लोकप्रिय आहे. येथील केस प्रत्यारोपण दवाखाने आणि सर्जन अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित आहेत. येथे FUE म्हणजेच फॉलिक्युलर युनिट एक्सट्रॅक्शन ही सामान्यतः वापरली जाणारी प्रक्रिया आहे.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जे लोक तुर्कीमध्ये केस प्रत्यारोपणासाठी येतात त्यांना उत्तम पॅकेज दिले जाते. ज्यामध्ये विमानतळावरून लोकांना घेणे, आलिशान हॉटेल्समध्ये त्यांची सोय करणे अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.